वस्तू, सेवा आणि उत्पादन या घटकांच्या आयात व निर्यात यांवर असलेले निर्बंध म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था होय. बंदिस्त अर्थव्यवस्था ही आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत या दोनही स्वरूपाची असू शकते. आंतरराष्ट्रीय बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या देशाचा जगातील दुसऱ्या कोणत्याही देशाशी कोणत्याही आर्थिक स्वरूपाचा व्यापार म्हणजेच आयात-निर्यात होत नसतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या देशातील एखाद्या राज्याचा दुसऱ्या कोणत्याही राज्याशी कोणत्याही आर्थिक स्वरूपाचा व्यापार होत नसतो. थोडक्यात, बंदिस्त अर्थव्यवस्था ही एक स्वयंपूर्ण व्यवस्था असून त्यामध्ये कोणत्याही वस्तू अथवा सेवांची आयात व निर्यात होत नाही. देशाच्या सिमांतर्गत उपभोक्त्यांच्या गरजांची पूर्तता देशातच वस्तू व सेवा यांचे उत्पादन करून करणे, हा बंदिस्त अर्थव्यवस्थेच्या प्रारूपाचा प्रमुख हेतू असतो. स्वावलंबनाच्या संकल्पनेतून बंदिस्त अर्थव्यवस्थेचे प्रारूप तयार केले जाते. महात्मा गांधींनी हीच संकल्पना छोट्या प्रारूपात ‘स्वयंपूर्ण खेडी’ अशी स्पष्ट केली आहे.

बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये परिस्थिती किंवा स्थिती अस्तित्वात असते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापाराच्या दृष्टीकोनातून अर्थव्यवस्थेचे बंदिस्त अर्थव्यवस्था आणि मुक्त अर्थव्यवस्था असे प्रमुख दोन प्रकार पडतात. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या देशाची अर्थव्यवस्था वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जगातील इतर देशांना मुक्त असते आणि त्या देशाकडून आयात व निर्यात यांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावले जात नाहीत. बंदिस्त अर्थव्यवस्था आणि मुक्त अर्थव्यवस्था एकमेकांच्या विरुद्ध स्थिती दर्शविणाऱ्या संकल्पना आहेत.

सद्यस्थितीत वाढत्या मानवी गरजांची पूर्णपणे पूर्तता करणारा जगात कोणताही देश स्वयंपूर्ण नाही. त्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगात पूर्णत: बंदिस्त अर्थव्यवस्था असलेला एकही देश आढळून येत नाही. विकसित देश कच्च्या मालासाठी विकसनशील देशांवर अवलंबून असतात, तर विकसनशील आणि अविकसित राष्ट्रे भांडवली वस्तुंसाठी विकसित राष्ट्रांवर अवलंबून असतात. ब्राझील हा देश त्याच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सर्वांत कमी वस्तू व सेवा यांची आयात करतो. त्या अर्थाने जगातील सर्वांत जास्त बंदिस्त अर्थव्यवस्था ब्राझीलची आहे; परंतु ही तुलनात्मक स्वरूपाची बंदिस्तता असून ती निरपेक्ष नाही. याचा प्रतिकूल परिणाम म्हणजे ब्राझीलमधील उद्योगांची स्पर्धात्मकता इतर देशांच्या तुलनेने कमी आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या केवळ लाभ सिद्धांतापूर्वी (१७७६) आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात व्यापारवादी दृष्टीकोन अस्तित्वात होता. त्यांच्या मते, ‘राष्ट्राने जास्तीत जास्त निर्यात करावी व आयात टाळावी’. असे धोरण प्रत्येक देशाने अंगीकारल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संकोच होऊन बंदिस्त अर्थव्यवस्थांची निर्मिती होण्यास प्रेरणा मिळाली. इ. स. १९२९ ते १९३५ या जागतिक महामंदीच्या काळात जगातील अर्थव्यवस्थांनी आयातीवर निर्बंध घालून बंदिस्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार अप्रत्यक्षपणे केलेला दिसून येतो.

भारत देश १ जानेवारी १९९५ पासून जागतिक व्यापाराचा विस्तार करण्यासाठी स्थापन झालेल्या जागतिक व्यापार संघटनेचा (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) संस्थापक सदस्य देश आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त अर्थव्यवस्था नाही. सद्या (२०२०) जागतिक व्यापार संघटनेचे १५९ देश सदस्य असून या सर्व देशांनी मुक्त व्यापार धोरण अंगीकारले आहे; परंतु वास्तवत: एकही अर्थव्यवस्था पूर्णत: मुक्त अथवा पूर्णत: बंदिस्त नाही. या संघटनेमधील काही देश संस्थात्मक नियमांच्या अधीन राहून आयात व निर्यात यांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्बंध आणण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामध्ये ते आयात-निर्यातीवरील प्रशुल्क, संख्यात्मक निर्बंध भाग (कोटा) इत्यादी पारंपरिक निर्बंध आकारणे. तसेच उत्पादनामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, उत्पादन प्रक्रियेत बालकामगारांचा वापर, उत्पादनातील घटकांमुळे आरोग्यास हानीकारकता इत्यादी कारणे दाखवून विकसित व तुलनात्मक दृष्ट्या मुक्त अर्थव्यवस्था आयातीवर निर्बंध आणतात. उदा., जगात आंब्याच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर असून जगातील एकूण उत्पादनाच्या ५०% उत्पादन भारतात होते; मात्र जगातील एकूण आंबा निर्यातीत भारताचा केवळ ५% इतकाच वाटा आहे. भारतीय आंबा, तांदूळ या उत्पादनात किटकनाशकांचा अधिक वापर होत असल्यामुळे अमेरिका व जपान यांसारखे विकसित देश त्यांची आयात करीत नाहीत. तसेच भारतीय मांस, सागरी अन्न, फुले, चहा, दूध उत्पादने, लाल मिरची पावडर, मसाले इत्यादी वस्तुंच्या आयातीवर काही विकसित देशांनी निर्बंध घातले असून काही देश चलनाचे सातत्याने अवमूल्यन करून आयात निर्बंधित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

सद्यस्थितीत जगामध्ये निरपेक्ष स्वरूपाने पूर्ण बंदिस्त आणि पूर्ण मुक्त अशी एकही अर्थव्यवस्था अस्तित्वात नाही. या संकल्पनांना आधुनिक काळात तुलनात्मक स्वरूप प्राप्त झालेले आहे. बंदिस्त अर्थव्यवस्थेत स्वयंपूर्णतेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न होत असला, तरी आधुनिक काळात आणि त्यापूर्वीही तुलनेने मुक्त अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा जास्त विकास झालेला आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स आणि केन्सेत्तर अर्थशास्त्रज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह इत्यादींबाबतचे सिद्धांत मांडताना बंदिस्त अर्थव्यवस्था गृहीत धरूनच विश्लेषण केलेले आहे. देशाचे स्थूल देशांतर्गत उत्पादन हे राष्ट्रीय उत्पन्नाचे माप बंदिस्त अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे निदर्शक आहे.

समीक्षक : पी. बी. कुलकर्णी