सिसमाँडी, जीन चार्ल्स लिओनार्ड द (Sismondi, Jean Charles Léonard de) : (९ मे १७७३ – २५ जून १८४२). प्रसिद्ध फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ व इतिहासकार. सिसमाँडी यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे एका श्रीमंत खानदानी कुटुंबात झाला. शिक्षणानंतर ते एक व्यावसायिक बनावे या हेतूने त्यांच्या कुटुंबाने त्यांना एका बँकेमध्ये लिपिक म्हणून कामास पाठविले; मात्र त्यांची इच्छा साहित्यिक बनण्याची होती. कालांतराने काही कारणास्तव त्यांचे कुटुंब फ्रान्सला गेले. तेथील राज्यक्रांतीनंतर त्यांनी तेथूनही पलायन केले आणि इंग्लंडला जाऊन तेथे स्थायिक झाले. इंग्लंडला गेल्यावर सिसमाँडी यांना परंपरावादी शिक्षण मिळाले.

सिसमाँडी हे तत्कालीन अर्थशास्त्रीय विचारांनी प्रभावित झाले होते; तर दुसऱ्या बाजूने औद्योगिक क्रांती व तिचे दुष्परिणाम त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर सनातनवादी अर्थशास्त्राचा प्रभाव दिसून येतो; तर दुसऱ्या बाजूने भांडवलशाहीच्या मूलभूत दोषांमुळे ते तिच्या विरोधात दिसतात. त्यांचा मुक्त व्यापारावर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी मुक्त व्यापार, निर्हस्तक्षेपाचे तत्त्व, व्यक्ती व समाज या दोन्हीच्या हितसंबंधातील एकवाक्यता यांबाबत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांची विचारसरणी योग्य असल्याचे मान्य केले.

सिसमाँडी हे सुधारणावादी होते. त्यांनी सामाजिक दृष्टिकोण आणि नैतिक भूमिका स्वीकारून आपले आर्थिक विचार मांडले. अर्थशास्त्र हे केवळ सत्यशोधक व वास्तव निदर्शकशास्त्र नसून केवळ असलेली परिस्थिती मांडण्याचे कार्य अर्थशास्त्राने करावे, हे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या मते, अर्थशास्त्र हे मूल्यशोधक अथवा आदर्शनिष्ठ शास्त्र असल्यामुळे सामाजिक सुख, कल्याण इत्यादींचा विचार करून अर्थशास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच त्यांनी संपत्तीचा विचार करण्याऐवजी मानवाच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. सिसमाँडी यांनी संपत्तीपेक्षा कल्याणाला अधिक महत्त्व दिले. त्यांनी ‘राष्ट्रीय कल्याणाच्या वृद्धीची कला’ अशी अर्थशास्त्राची व्याख्या केली. सनातनवादावर टीका करून त्यांनी आपले आर्थिक विचार मांडले. सनातनवाद्यांनी संपत्तीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले; परंतु त्यांनी संपत्तीच्या उत्पादनाइतकेच विभाजनालाही महत्त्व दिले. संपत्तीची वाटणी योग्य झाली पाहिजे, देशातील गरीब वर्गालासुद्धा सुख-समाधानाने जगता आले पाहिजे, असा सिसमाँडी यांचा आग्रह होता.

सिसमाँडी यांना भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील शासनाच्या हस्तक्षेपाचे धोरण मान्य नव्हते. त्यांनी भांडवलशाहीचे दोष दाखविण्याचा प्रयत्न केला. जर संपत्तीमुळे नागरिकांना सुख मिळत असेल, तर ते मिळाले पाहिजे, तरच लोकांचे कल्याण होईल; मात्र शासनाचा हस्तक्षेपही आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी व खासगी मालमत्तेचा हक्क कमी करण्यासाठी सरकारचा अर्थव्यवस्थेवरील हस्तक्षेप आवश्यक आहे, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सरकारने कल्याणाच्या योजना आखाव्यात, असेही त्यांचे मत होते.

सनातनवाद्यांनी यांत्रिकीकरणाचा पुरस्कार केला; परंतु सिसमाँडी यांनी यांत्रिकीकरणातील दोष मांडले. यांत्रिकीकरणामुळे होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळे काही ठराविक भांडवलदार श्रीमंत होतात आणि बहुसंख्य लोक गरीब राहतात. त्यासाठी छोटे उद्योग व शेती करणे योग्य ठरेल. त्याने बेकारी वाढणार नाही, उपभोगसुद्धा घटणार नाही आणि आर्थिक संकटाची तीव्रता कमी होईल, असे मत त्यांनी मांडले. यांत्रिकीकरणामुळे खरेदीदार देशांवर दारिद्र्याचे ओझे ढकलले जाते. त्यासाठी त्यांनी इंग्लडचे उदाहरण दिले. सिसमाँडी हे पूर्णतः भांडवलशाहीच्या विरुद्ध नव्हते. त्यांनी भांडवलशाहीतील मूठभर भांडवलदारांच्या मक्तेदारीला विरोध केला. त्यासाठी त्यांनी व्यवसायाच्या विकेंद्रीकरणावर भर दिला. त्यांनी श्रमाला संपत्तीचे जनक मानून श्रमिकांच्या कल्याणासाठी उपाय सांगितले. मानवाच्या कल्याणाचा विचार हा अर्थशास्त्रीय विवेचन पद्धतीचा प्रमुख हेतू असावा. तसेच संपत्ती विभाजन हे कल्याणाच्या दृष्टीने संपत्तीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मत होते.

सिसमाँडी यांच्यावर स्मिथ आणि भांडवलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या इतर अर्थशास्त्रज्ञांचा प्रभाव असल्याचे दिसून येते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ कार्ल कौत्स्की यांनी भांडवलशाही व श्रमिक यांवरील सिसमाँडी यांच्या विचारांचे ऋण मान्य केले. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मागणीच्या कमतरतेमुळे आर्थिक अरिष्ट वारंवार येण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट केले. त्यांची आर्थिक अरिष्टाची कारणमीमांसा पुरेशी ठरत नसली, तरी समाजवादी दृष्टिकोणातून आर्थिक अरिष्टाची चर्चा करणारा सिसमाँडी हा पहिला अर्थतज्ज्ञ होता. त्यांच्या समाजवादी व इतर विचारसरणींचा प्रभाव कार्ल, डेनिस रॉबर्टसन, ब्लॅक, रॉबर्ट ओएन इत्यादी विचारवंतांवर पडला. या अर्थतज्ज्ञांच्या अनेक सिद्धांताची उभारणी सिसमाँडी यांच्या कल्पनांवर आधारित होती. सिसमाँडी यांनी मांडलेल्या कल्याणाच्या कल्पनेचा उपयोग ॲल्फ्रेड मार्शल, आर्थर सेसिल पिगू इत्यादी अर्थतज्ज्ञांनी केला.

सिसमाँडी यांनी ऐतिहासिक पद्धतीचा पुरस्कार केल्याने अप्रत्यक्षपणे ऐतिहासिक संप्रदायाच्या स्थापनेला त्यांचा हातभार लागला. मागणी व पुरवठा यांच्यातील समतोल विचारांमुळे समग्र अर्थशास्त्राच्या निर्मितीच्या दृष्टीने अर्थशास्त्राला एक वेगळे वळण लागले. सिसमाँडी यांच्या अनेक सुधारणा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी मान्य केल्या. त्यावरून त्यांच्या सुधारणांचे महत्त्व लक्षात येते. त्यांनी अर्थशास्त्राच्या विकासाच्या दृष्टीने उत्तम कामगिरी केली. जरी त्यांनी नवीन संप्रदाय निर्माण केला नसला, तरी अर्थशास्त्राच्या इतिहासात सिसमाँडी यांना महत्त्वाचे स्थान दिले जाते.

सिसमाँडी यांनी आपल्या ऐतिहासिक लेखनात मध्ययुगीन इटालीयन शहरांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा इतिहास बोनापार्टिस्ट विरुद्ध प्रजासत्ताक म्हणून लिहिला. त्यांनी द कमर्शिअल वेल्थ, १८०३; द न्यू प्रिंसिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी, १८१९; हिस्टोरिकल व्ह्युव ऑफ द लिट्रेचर ऑफ द साउथ ऑफ यूरोप या पुस्तकांचे लेखन केले आहे.

संदर्भ :

  • कुलकर्णी, बी. डी.; ढमढेरे, एस. व्ही., आर्थिक विचार व विचारवंत, पुणे २००८.
  • Gide, Charles; Rist, Charles, A History of Economic Doctrines, London, 1948.
  • Roll, Eric, A History of Economic Thought, Boston, 1992.

समीक्षक : मंजुषा मुसमाडे