शेणॉय, बी. आर. (Shenoy, B. R.) : (३ जून १९०५ – ८ फेब्रुवारी १९७८). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ. पूर्ण नाव बेल्लीकोट रघुनाथ जनार्दन शेणॉय. त्यांचा जन्म कर्नाटकातील मंगळूरजवळील बेल्लीकोट या गावी झाला. इ. स. १९२० मध्ये उच्च श्रेणीत माध्यमिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या पालकांना त्यांनी आय. सी. एस. सारख्या प्रतिष्ठित परीक्षेसाठी प्रयत्न करावा असे वाटत होते; मात्र त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. इ. स. १९२३ मध्ये त्यांना नागपूरच्या तुरुंगात ठेवले गेले. हा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा होता; कारण त्यांच्याच खोलीत ख्यातनाम विचारवंत पंडित मदनमोहन मालवीय होते. त्या वेळी शेणॉय पंडितजींच्या विचारांनी प्रभावीत झाले. हा प्रभाव शेणॉय यांच्या संपूर्ण आयुष्यभर टिकून राहिला. पुढे इ. स. १९२९ मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठातून प्रथम श्रेणीत एम. ए. ही पदवी प्राप्त केली. नंतर एम. एससी. करिता लंडन सकुलमध्ये गुरुमुख निहाल सिंग या भारतीय शिक्षकाकडे रुजू झाले.

इसवी सन १९३० हा काळ अर्थशास्त्राच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा होता. या वेळी शेणॉय यांच्यावर त्यांचे शिक्षक फ्रेडरिक हाईक यांचा प्रभाव अधिक प्रमाणात होता. हाईक यांनी त्यांना ऑस्ट्रियन सिद्धांत शिकविले. याच काळात प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांचे ट्रीटीज ऑन मनी हे क्रांतिकारक पुस्तक प्रसिद्ध झाले. मौद्रिक धोरण, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, राजकीय उदारवाद आणि सामाजिक तत्त्वज्ञान अशा विस्तारित अभ्यास शाखांचा परिचय शेणॉय यांना झाला. त्यामुळे सिद्धांत मांडणीसाठी आवश्यक असणारी त्यांची वैचारिक बैठक तयार झाली. पुढे अखेरपर्यंत हाईक विचारसरणीची, उदारमतवाद आणि निर्हस्तक्षेप धोरण या तीन विचारांवरील त्यांची पकड मजबूत होती. या वेळी शेणॉय यांनी केन्स यांच्या पुस्तकावरील प्रतिक्रिया व त्रुटी दर्शविणारे लेख लिहिले. त्यामुळे त्यांना प्रचंड आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळून ‘तरुण  बुद्धिवान मौद्रीक धोरणवादी संशोधक’ असे मानाचे बिरुद त्यांच्या नावामागे लागले.

इसवी सन १९३२ मध्ये भारतात परतल्यानंतर शेणॉय हे पुणे, अहमदाबाद आणि नंतर श्रीलंका येथे अध्यापन केले. त्याचबरोबर या काळात मोठ्या उद्योजकांनी मांडलेल्या सुप्रसिद्ध ‘बॉम्बे प्लॅन’चे त्यांनी परीक्षण केले. इ. स. १९४५ मध्ये ते रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. इ. स. १९५३ पर्यंत त्यांनी आयएमएफ, आयबीआरडी अशा आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समित्यांवर आपले वैचारिक योगदान दिले. इ. स. १९५४ मध्ये ते पुन्हा गुजरात विद्यापीठात रुजू झाले. तेथे त्यांनी ‘स्कूल ऑफ सोशल सायन्स’ ही सामाजिक संशोधनाची विशेष संस्था सुरू करून तिचे संस्थापक संचालक झाले.

शेणॉय हे भारत सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षित योजनेमध्ये तज्ज्ञ सदस्य होते; मात्र त्यांनी या योजनेच्या आराखड्याला विरोध केला होता. त्यांनी धनंजयराव गाडगीळ, बी. एन. गांगुली अशा नामवंत तज्ज्ञांच्या समोर ४,३०० कोटी रुपयांची दुसरी महत्त्वाकांक्षी योजना नाकारणे हे त्यांनी केलेले अभूतपूर्व धाडसच होते. दुसऱ्या योजनेत एकूण १,२०० कोटी रुपयांचा तुटीचा अर्थभरणा होता. या प्रचंड तुटीला शेणॉय यांचा विरोध होता. नियोजन ही एकमेव जीवनपद्धती नाही. किंमत स्थैर्यासाठी १८० ते २३५ कोटी रुपयांच्या तुटीची मर्यादा पाळलीच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता; मात्र त्यांचे विचार तेव्हा सर्वमान्य झाले नाहीत किंवा शासकीय पातळीवरही स्वीकारले गेले नाहीत. त्यामुळे नंतरच्या काळात प्रचंड प्रमाणातील तुटीच्या अर्थभरण्याचे दुष्परिणाम भारताला भोगावे लागले. तसेच देशाच्या आर्थिक विकासावरही विपरीत परिणाम झाला होता. १९५७ मध्ये ‘इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन’च्या नागपूर येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून रुपयाचे अवमूल्यन करण्याची आणि तरंगता विनिमयदर स्वीकारण्याची सूचना केली; परंतु त्यांचा हाही विचार अमान्य ठरला. १९६० मध्ये फोर्च्यून या जगप्रसिद्ध नियतकालिकात त्यांची संभावना उपेक्षित विचारवंत (सिंड्रेला अमाँग इकॉनॉमिस्ट) अशी करण्यात आली; परंतु हार न मानता शेणॉय यांनी वेळो वेळी टाईम्स ऑफ इंडिया, हिंदू, फोर्च्यून, इकॉनॉमिस्ट, फार इस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यू, वॉल स्ट्रिट जर्नल  इत्यादी नामवंत नियतकालिकांमधून ते आपल्या विचारांचे प्रतिपादन करित राहिले.

शेणॉय यांनी खुल्या अर्थव्यवस्थेत काही अंगभूत संतुलनाचे घटक कार्यरत असतात, असे मत मांडले. खुल्या वातावरणात जास्तीत जास्त उत्पादनाची  प्रेरणा वाढीला लागते. उत्पादन खर्च किमान करून स्पर्धेला तोंड देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपोआपच कमी दर्जाचे, कमी पातळीतले उत्पादन बंद पडून उच्च दर्जाचे, किमान खर्चाचे कमाल उत्पादन घेता येते. खुल्या अर्थव्यवस्थेतून केवळ आर्थिक विकास अधिक प्रमाणात होतो असे नाही, तर सामाजिक न्यायही साधला जातो. आर्थिक स्वातंत्र्य नसणे हा विकासाचा मार्ग असू शकत नाही, असे त्यांनी परखडपणे म्हटले. भारत सरकारने परकीय साह्य न घेता खुल्या धोरणाचे व मुक्त बाजाराचे तत्त्व स्वीकारावे, असे त्यांचे मत होते. त्यांचा सुलभीकरणावर भर होता.

शेणॉय आपल्या अध्यापन कारकीर्दीत विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. यांना भारताचे ॲडम स्मिथ अशी उपमा मिळाली होती. त्यांना गणिताच्या माध्यमातून अर्थशास्त्रीय तत्त्वे मांडण्यात अजिबात रुची नव्हती. अध्यापन करताना ते गणिती समीकरणे, प्रतिमाने यांचा वापर न करता साध्या, सोप्या अर्थशास्त्रीय तर्कमीमांसेद्वारे आपले विचार स्पष्ट करित असत. निगमनात्मक तर्कमीमांसा पद्धतीवर त्यांचा गाढा अभ्यास होता. कितीही क्लिष्ट, गुंतागुंतीची आर्थिक तत्त्वे हे गणिताशिवाय परिणामकारक रित्या शिकवीत. त्यांच्या मते ‘गणितीय व संख्याशास्त्रीय तंत्रे ही केवळ साधने असून ती कधीही अंतिम साध्य असू शकत नाहीत’. त्यांनी प्रादेशिक विषमता ही महत्त्वपूर्ण संकल्पना बिहार, उत्तरप्रदेश इत्यादी राज्ये आर्थिक विकासापासून वंचित आहेत याद्वारे दाखवून दिले.

शेणॉय यांचे विचार तत्कालीन अर्थव्यवस्थेत रुजले नसले, तरी त्यांचा निःपक्षपाती दृष्टीकोन व आपला विचार शास्रशुद्ध रितीने इतरांपर्यंत पोहोचविण्याचा मार्ग निश्चितच स्तिमित करणारा आहे. त्यांनी आर्थिक नियोजन, तुटीच्या अर्थभरण्याचे दुष्परिणाम, अवजड उद्योगांवरील अवाजवी प्राधान्यक्रम इत्यादी मुलभूत बाबींवर उपस्थित केलेले प्रश्न आजही विचार करण्यास भाग पाडतात. त्या वेळी त्यांनी मांडलेल आर्थिक विचार प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध होते; मात्र ते काळाच्या पुढे होते. त्यांनी लिहिलेली ‘नोट ऑफ डिसेंट’ आजही सुप्रसिद्ध आहे.

शेणॉय यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत. सायक्लोन करन्सी अँड बँकिंग (१९४१); दी स्टर्लिंग असेट्स ऑफ दी रिझर्व बँक ऑफ इंडिया, १९४६; प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, १९५८; स्टॅबिलिटी ऑफ दी इंडियन रुपी, १९५९; इंडियन प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, १९६३; इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी, १९६८; पीएल ४८० एड अँड इंडियाज फूड प्रॉब्लेम, १९७४; दी बेसिक ट्रुथ अबाउट इन्फ्लेशन, १९७७ इत्यादी.

संदर्भ :

  • Dutt, Bhabatosh, Indian Economic Thought – 20th century Perspective 1900-1950, New Delhi, 1978.
  • Ganguli, B. N., Indian Economic Thought, New Delhi, 1977.
  • Das, Debendra Kumar, Great Indian Economists- Their Creative Vision for Socio-Economic Development, Vol. 6, New Delhi, 2004.
  • Musmade, Manjusha, Magova Arthavicharancha, Junnar (Pune), 2013.

 

समीक्षक : श्रीनिवास खांदेवाले