एमस : (इ.स.पू. आठवे शतक). एक ज्यू प्रेषित. जुन्या करारातील ‘बुक ऑफ एमस’ प्रसिद्ध आहे. दक्षिण पॅलेस्टाइनमधील टीकोआचे ते मेंढपाळ. भ्रष्टाचार व पाप वाढल्यामुळे तत्कालीन ज्यू राज्य लवकरच नष्ट होणार, असा ईश्वरी साक्षात्कार आपणास झाल्याचे ते जाहीरपणे सांगू लागले. त्यामुळे त्यांना तो प्रदेश सोडून जावे लागले. यानंतर त्यांनी जाहीर प्रवचनांऐवजी लेखनाचा मार्ग अवलंबिला. स्वत:स झालेला ईश्वरी साक्षात्कार लेखनबद्ध करून ठेवणारे ते पहिलेच ज्यू प्रेषित होय. त्यांची गणना महाप्रेषितांत केली जात नाही, तर दुय्यम प्रेषितांत केली जाते; कारण जुन्या करारातील त्यांची रचना केवळ नऊ प्रकरणेच आहे. त्यांची भाषा (हिब्रू) शुद्ध, प्रासादिक व काव्यात्म आहे. एमस यांची ईश्वरविषयक उदात्त कल्पना, नैतिक आचरणावरील त्यांची अचल श्रद्धा आणि धर्माबाबतचा त्यांचा विशाल दृष्टिकोन नंतरच्या प्रेषितांना अनुकरणीय ठरला. पापाचरणामुळे इझ्राएलचा नाश होणार, हे कटू सत्य जाहीरपणे बोलून दाखविण्याचे धार्ष्ट्य त्यांनी दाखविले.

आपल्या पापाचा लोकांना पश्चात्ताप झाला, तर ईश्वर त्यांना क्षमाही करतो, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व शिकवणुकीचा प्रभाव त्यांच्या नंतर होऊन गेलेल्या प्रेषितांवर अधिक होता.

संदर्भ :

  • Cripps, R. S. A critical and Exegetical Commentary on the book of Amos, London, 1955.
  • Morgenstern, Julian, Amos Studies, vol. I, New York, 1941.