यहुदी (ज्यू) धर्मग्रंथ तनक ह्या नावाने ओळखला जातो. त्यामध्ये ‘तोरा’ (नियमशास्त्र), ‘नबीईम’ (संदेष्ट्यांचे ग्रंथ) आणि ‘केतुबीम’ (इतर साहित्य) ह्यांचा समावेश होतो. हाच धर्मग्रंथ ख्रिस्ती धर्मातील ‘जुना करार’ ह्या नावाने ओळखला जातो. मूळ हिब्रू धर्मग्रंथातील संदेष्ट्यांचे ग्रंथ आठ गुंडाळ्यांच्या (Scrolls) रूपाने अस्तित्वात होते. पहिल्या चार गुंडाळ्यांना ‘पूर्व संदेष्टे’ (Former Prophets) या नावाने संबोधले जाई. त्यात यहोशवा (जोशुआ), शास्ते (जजेस), शमुवेल (सॅम्युएल)–पहिले व दुसरे, राजे (किंग्ज)–पहिले व दुसरे ह्या पुस्तकांचा समावेश होतो; तर दुसर्‍या चार गुंडाळ्यांना ‘उत्तर संदेष्टे’ (Later Prophets) म्हटले जाई. त्यात यशया (इसाया), यिर्मया (जेरीमाइआ) व यहेज्केल (ईझीक्येल) ह्या मोठ्या संदेष्ट्यांच्या तीन गुंडाळ्या; तर १२ लहान संदेष्ट्यांची एक गुंडाळी ह्यांचा समावेश होतो.

अ) संदेष्टा : शब्दाचा अर्थ : हिब्रू भाषेमध्ये ‘संदेष्टा’ ह्या शब्दासाठी नबी, रोचे, होजेह, कोसेम व इश-एलोहिम असे पाच शब्द प्रचलित होते. त्यांपैकी रोचे, होजेह, कोसेम हे शब्द स्वप्नदर्शी, द्रष्टा, दृष्टान्त वा साक्षात्कार पाहणारा किंवा भविष्यवादी ह्या अर्थाने वापरले जात; तर इश-एलोहिम ह्या शब्दाचा अर्थ ‘देवाचा माणूस’ असा असून तो मोशे (बायबल, अनुवाद ३३:१), शमुवेल (बायबल, १ बायबल,  शमुवेल ९:६), एलिया (बायबल, १ राजे १७:१०) व अलिशा (बायबल, २ राजे ४:९) अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरण्यात आलेला आहे.

‘नबी’ हा शब्द बायबलमध्ये जवळ जवळ ३०० वेळा वापरण्यात आलेला असून त्याचा अर्थ ‘बोलावलेला’ आणि ‘देवाच्या वतीने बोलणारा प्रवक्ता’ (देवाचे मुख) असा होय. हिब्रू बायबलचे ग्रीक भाषेत सेप्तु आजिंत या नावाचे जे भाषांतर उपलब्ध आहे त्यामध्ये ‘नबी’ ह्या शब्दासाठी प्रॉफेटेस (Prophetes) असा शब्द वापरण्यात आलेला असून त्याचा अर्थ ‘एखाद्याचे मुख बनणे’ किंवा ‘एखाद्याच्या वतीने बोलणे’ (प्रवक्ता) असा होतो. त्यामुळे निर्गम ४:१६ मध्ये ‘अहरोन तुझा संदेष्टा होईल’ अशी समानार्थी वाक्ये वाचायला मिळतात. मात्र, त्यामुळे ‘देवाच्या वतीने बोलणारा’ किंवा ‘प्रवक्ता’ ह्यापुरतीच संदेष्ट्याची भूमिका मर्यादित राहण्याचा धोका संभवतो.

कार्लोमारिया मार्टिनी, युजीन मॅली, जे. एल. मेज आणि पी. जे. आख्टमायर ह्यांनी दिलेल्या ‘संदेष्टा’ शब्दाच्या पुढील व्याख्या या विषयावर अधिक प्रकाशझोत टाकणाऱ्या आहेत : १) “ईश्वरी इच्छा जाणण्याचे अंतर्ज्ञान असलेली आणि प्रेरित शब्द घोषविण्याचे सामर्थ्य व धैर्य लाभलेली व्यक्ती”. २) “वर्तमान काळातील घडामोडींमध्ये देवाची वाणी ऐकणारा आणि त्यावरून उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानकाळात प्रसंगी लोकांना धारेवर धरणारा परमेश्वराचा प्रतिनिधी”. ३) “सर्वसामान्य जगापर्यंत ईश्वरी संदेश पोहोचविणारा आणि सर्वसामान्यांच्या वतीने देवापुढे उभा राहणारा देवा-मानवाचा प्रतिनिधी”.

आ) अस्सल संदेष्ट्याची वैशिष्ट्ये : आपल्या अवतीभवती घडणार्‍या घडामोडींव्यतिरिक्त काही अदृश्य व अद्भूत अशा शक्ती माणसाच्या जीवनावर प्रभाव पाडत असतात. अशा प्राचीन काळातील मेसापोटेमिया, ईजिप्त व बॅबिलन येथील लोकांचा समज होता. ह्या शक्तींवर प्रभुत्व मिळवून कोणीतरी आपल्याला जीवनातील काही गूढ रहस्यांचा अर्थ उलगडून सांगावा आणि मानवी बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या ह्या शक्तींवर नियंत्रण कसे ठेवावे हे समजावून द्यावे, अशी जनसामान्यांची अपेक्षा होती. त्यातून असंख्य मांत्रिक, भूत-पिशाच्च पाहणारे, जादूटोणा करणारे, ज्योतिष व भविष्य सांगणारे अशांचा सुळसुळाट माजला. इझ्राएली जनतेवरही त्यांचा प्रभाव दिसून येऊ लागला, तेव्हा अस्सल संदेष्टे उदयास आले.

देवाशी झालेल्या कराराला केंद्रस्थानी ठेवून इझ्राएली लोक देवाशी कितपत विश्वासू राहिलेले आहेत, यावरून त्यांना खडसाविण्यात वा प्रोत्साहन देण्यात एखादा संदेष्टा ईश्वरी प्रेरणेशी व पर्यायाने आपल्या आतल्या आवाजाशी कितपत विश्वासू राहतो, यावरून संदेष्ट्याचे खरेपण ठरविता येते. याच निकषांवर आधारित बायबल पंडितांनी अस्सल संदेष्ट्यांची सात वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत : १) ईश्वरीपाचारण : ‘जुन्या करारा’तील जवळ जवळ सर्व संदेष्ट्यांच्या पुस्तकांच्या प्रारंभी त्यांचे पाचारण वर्णन करण्यात आलेले आहे. या ईश्वरी पाचारणामुळे एखादा साधासुधा मनुष्य अगदी धैर्याने व प्रभावीपणे संदेष्ट्याची भूमिका कसा बजावू लागला त्याचे चित्रण तिथे करण्यात आलेले आहे. २) अस्वस्थ करणारी ऊर्मी : परमेश्वर आपल्याला एका विशिष्ट कार्यासाठी बोलावीत आहे ह्याची एकदा का खात्री पटली की संदेष्ट्याठायी अस्वस्थ करणारी ऊर्मी उत्पन्न होते (बायबल, यिर्मया २०:९, योना ३:१). ३) देवाच्या नावाने संदेश : खरा संदेष्टा केवळ स्वत:चे काही सांगत नाही किंवा स्वत:चे वैयक्तिक मत इतरांवर लादत नाही. देवाच्या नावाने संदेश दिल्यामुळे तो सांगतो तसे घडते. ४) कल्पक चित्तवृत्ती : संदेष्टे केवळ शब्दांनीच नव्हे, तर प्रतिकात्मक हावभाव करून साक्षात्कार झाल्यासारखे एकचित्त होऊन, मूक कृती करून, शोकग्रस्त बनून आपला संदेश प्रसारित करतात. ५) चमत्कारांची जोड : आपला संदेश खुद्द परमेश्वराकडून आलेला आहे हे दर्शविण्यासाठी अस्सल संदेष्टे देवाच्या नावाने चमत्कार करतात. मोशेने काठीचा साप करून दाखविला; तर एलियाने विधवेच्या मृत मुलाला जिवंत केले. ६) राजकीय सत्तेला शह देण्याचे धैर्य : संदेष्ट्यांना ‘राजा, तू चुकतो आहेस’ असे म्हणण्याचे धैर्य प्राप्त झालेले होते. नॅथन (नाथान) संदेष्ट्याने डेव्हिड (दाविदा)ला धारेवार धरले, तर एलिया संदेष्ट्याने आहाब राजाची कानउघडणी केली. ७) दु:ख सहन करण्याची तयारी : खरा संदेष्टा आपला संदेश देताना दु:खाला मिठी मारण्यासाठी तयार असतो. यिर्मयाचे पाय खोड्यात अडकविले गेले, त्याला अंधार कोठडीत व कोरड्या विहिरीत टाकण्यात आले.

थोडक्यात, अस्सल संदेष्टा हा खुद्द परमेश्वराचा प्रतिनिधी असल्याने तो धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रांत असलेल्या वैगुण्यांवर नेमके बोट ठेवीत असतो आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावीत असतो.

इ) बायबलकालीन संदेष्ट्यांचा इतिहास : जुन्या करारातील संदेष्ट्यांच्या उदयास ॲसिरिया, मेसोपोटेमिया, ईजिप्त व बॅबिलन येथील तथाकथित ‘भविष्यवाद्यांचे जीवन जरी कारणीभूत झालेले असल्याचे मानण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात त्यांची कारकीर्द त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून झाल्याचे दिसून येते. उत्पत्ती २०:७ मध्ये साक्षात परमेश्वर आब्राहाम हा संदेष्टा असल्याचे स्पष्ट करतो. निर्गमच्या पुस्तकात मोशे हा एखाद्या संदेष्ट्याप्रमाणे देवा-मानवामधील दुवा बनून राहतो. परमेश्वर आपल्यासारखाच एक संदेष्टा उदयास आणील, अशी इझ्राएली लोकांना तो हमी देतो. बलामने दिलेल्या संदेशात येशूच्या जन्माचे भाकीत दडलेले आहे. शमुवेल केवळ १० वर्षांचा असताना त्याला आपला गुरू एली ह्याचे कान भणभणणारा संदेश द्यावा लागला. पुढे तो शौल व दाविद ह्यांच्यासारख्या राजांचा अभिषेक करतो.

इ.स.पू. १०५० ते ५८७ ही इझ्राएलच्या इतिहासात राजांची कारकीर्द मानली जाते. ह्याच काळात मोठमोठे संदेष्टे होऊन गेले. दाविदाच्या काळात नाथान, गाद, ह्यांसारख्या संदेष्ट्यांनी निर्णायक महत्त्वाची भूमिका बजावली. अहि या संदेष्ट्याने शलमोन राजाच्या राज्याचे दोन तुकडे होतील असे भाकीत केले, तर मीखा या संदेष्ट्याने आहाब राजाच्या पराभवाचे भविष्य वर्तविले. एलिया आणि अलिशा ह्या दोन संदेष्ट्यांच्या कार्याचे वर्णन करण्यासाठी इतिहासकाराने राजे (पहिले) १७ ते राजे (दुसरे) १३ असे एकूण १९ अध्याय खर्ची घातलेले आहेत. यावरून त्यांच्या कार्याची कल्पना येऊ शकेल.

ई) संदेष्ट्यांची तोंडओळख : आतापर्यंत नमूद करण्यात आलेले सर्व संदेष्टे हे आद्य (पूर्व) संदेष्टे ह्या सदरात मोडतात. ह्या पुरुष संदेष्ट्यांव्यतिरिक्त मोशेची बहीण मिरियाम, दबोरा आणि हुल्दा ह्यांच्यासाठी ‘नबिआ’ हा स्त्रीलिंगी शब्द वापरून त्यांची गणना संदेष्ट्यांमध्ये करण्यात आलेली आहे. (‘नव्या करारा’त संदेष्टी हन्ना हिचाही उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो (लूक २:३६–३८).

मात्र बायबलमधील तीन मोठे संदेष्टे आणि बारा लहान संदेष्टे असे मिळून एकूण पंधरा संदेष्टे असे आहेत की, ज्यांच्या नावावर पुस्तके आहेत. त्यांच्या संदेशकार्याचा कालावधी, त्यांनी पायांखाली घातलेला प्रदेश व त्यांच्या पुस्तकांचा आकार यावरून त्यांची विभागणी ‘मोठे’ किंवा ‘लहान’ संदेष्टे अशा दोन भागांत केली जाते. इ.स.पू. ५८७ ते ५३८ दरम्यान यहुदी लोक बॅबिलन येथे हद्दपारीत होते. त्याचा संदर्भ घेऊन ‘हद्दपारपूर्व’, ‘हद्दपारकालीन’ व ‘हद्दपारीनंतरचे’ अशाही तीन भागांत त्यांची विभागणी केली जाते.

 • १) आमोस : बायबलमध्ये ज्या संदेष्ट्यांच्या नावांची पुस्तके आहेत त्यांच्यात ऐतिहासिकदृष्ट्या उदयाला आलेला पहिला संदेष्टा म्हणजे आमोस. तो यहुदाच्या (दक्षिणेकडील) राज्यातील तेकोआ गावातला एक श्रीमंत गुराखी होता. इझ्राएलच्या (उत्तरेकडील) राज्यातील बेथेल येथे गोरगरिबांवर चाललेला अन्याय पाहून त्याने इ.स.पू. ७६० ह्या एका वर्षात प्रथम आशेचे दोन (अग्नी व टोळ) दृष्टान्त व नंतर विनाशाचे (ओळंबा, पक्व फळांची पाटी, वेदीजवळील देवदूत) असे तीन दृष्टान्त दिले. त्याला ‘ईश्वरी न्यायाचा संदेष्टा’ असे म्हटले जाते.
 • २) होशेय : हा इझ्राएलमधील एक शेतकरी होता. इ.स.पू. ७४६–७२५ या काळात त्याने ‘ईश्वरी प्रेमाचा’ संदेश दिला. पती-पत्नी प्रेम व पालक-पाल्य प्रेम ही प्रतिके वापरून परमेश्वराच्या प्रेमाची प्रतारणा करणाऱ्या इझ्राएली लोकांची तुलना त्याने व्यभिचाराशी (किंबहुना वेश्याव्यवसायाशी) केलेली आहे.
 • ३) यशया : ६६ अध्यायांचे हे पुस्तक आपल्या समोर तीन वेगवेगळ्या कालखंडांतील संदेश सादर करते. अध्याय १–३९ ह्या भागाला ‘पहिला यशया’ ह्या नावाने ओळखले जाते. हा संदेष्टा जेरूसलेमवासी असून त्याने इ.स.पू. ७४१–७०१ दरम्यान यहुदी लोकांना शत्रू पक्षाच्या हल्ल्याविषयी सावधानतेचा इशारा देणारा संदेश दिला. द्वितीय यशया (बायबल, अध्याय ४०–५५) हा बॅबिलन येथे हद्दपार अवस्थेत होता. त्याने लोकांचे सांत्वन करणारा संदेश (इ.स.पू. ५५०–५३८) दिला. तृतीय यशया (अध्याय ५६–६६) हा जेरूसलेममध्ये परतलेल्या लोकांना परमेश्वराच्या विश्वसनीयतेविषयी संदेश इ.स.पू. ५०० च्या आसपास देतो. तिन्ही भागांचा मिळून यशया हा ‘ईश्वरी आशेचा संदेष्टा’ म्हणून प्रसिद्ध आहे.
 • ४) मीखा : इ.स.पू. ७२५ ते ७०१ दरम्यान ॲसिरिया जेरूसलेमवर हल्ला करणार होते. जेरूसलेमवासियांनी त्यांना बेथलेहेमवर हल्ला करण्याचा कावेबाज सल्ला दिला. त्या वेळी मीखा नावाच्या कारागिराने आपल्या लोकांना करार-ऐक्याची आठवण करून दिली. त्याने बेथलेहेमविषयी केलेले भाकीत (५:२) येशूच्या जन्मामध्ये पूर्णत्वास गेले (बायबल, मत्तय २:६) अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर ह्यांनी मीखा ६:८ हे वचन (नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि देवाबरोबर राहून नम्रभावाने चालणे) आपले ब्रीद वाक्य म्हणून स्वीकारलेले होते.
 • ५) योना : हे पुस्तक इ.स.पू. पाचव्या शतकाच्या अखेरीस लिहिले गेलेले असले, तरी हा संदेष्टा इ.स.पू. ७८३–७४३ दरम्यान येऊन गेल्याचे मानले जाते. ॲसिरियाची राजधानी निनवे येथे विनाशाचा संदेश देण्यासाठी परमेश्वर योनाला पाठवितो. प्रथम नाखुषीने, परंतु नंतर स्वेच्छेने, तो तेथे जातो. परमेश्वराशी आज्ञाधारक न राहिल्यामुळे संपूर्ण राष्ट्रावर अरिष्ट आले होते; परंतु ‘मनुष्य जेव्हा आपले मार्ग बदलतो, तेव्हा परमेश्वर आपल्या योजना बदलतो’ असा संदेश ह्या मिशनरी संदेष्ट्याने दिला. तो तीन दिवस माशाच्या पोटात होता अशी रंजक माहिती हे पुस्तक पुरविते.
 • ६) सफन्या : इ.स.पू. ६४०–६३२ ह्या काळात या संदेष्ट्याने लोकांना परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवसाविषयी माहिती देऊन त्यांना सावध केले.
 • ७) हबक्कूक : परमेश्वर नीतिमानांना शिक्षा का करतो, ती दुष्टांच्या हातून का करतो असे प्रश्न करणारा हा संदेष्टा शेवटी ‘नीतिमान विश्वासाने जगेल’ ह्या निष्कर्षाप्रत पोहोचतो. त्याने इ.स.पू. ६०९ ते ५९७ या दरम्यान लोकांना ईश्वराच्या दानशूरतेचा संदेश दिला.
 • ८) नहूम : निनवे शहराचा विध्वंस झाल्यानंतर आनंदाने बेहोष झालेला हा संदेष्टा यहुदी लोकांना सांत्वनपर संदेश देतो (नहूम म्हणजे सांत्वन, काळ इ.स.प. ६१४-१२).
 • ९) यिर्मया : यिर्मया संदेष्ट्याने इ.स.पू. ६२६ ते ५८० या दरम्यान यहुदी लोकांना बॅबिलन येथील हद्दपारीविषयी आणि जेरूसलेम मंदिराच्या विध्वंसाविषयी संदेश दिला. हे कटू सत्य तत्कालीन धार्मिक व राजकीय अधिकारी स्वीकारू शकले नाहीत, त्यामुळे यिर्मयाला अतोनात छळ सोसावा लागला. लोक हद्दपार झाल्यानंतरही परमेश्वर आपल्या लोकांशी नवा करार करील, तो त्यांच्या हृदय पटलावर कोरलेला असेल असा आशावाद त्याने लोकांमध्ये उत्पन्न केला.
 • १०) यहेज्केल : इ.स.पू. ५९७ या वर्षी यहुदी लोकांना बॅबिलन येथे हद्दपार करण्यात आले. त्यांच्यात यहेज्केल संदेष्ट्याचाही समावेश होता. त्याने इ.स.पू. ५९३ ते ५७१ अशी २२ वर्षे लोकांना मार्गदर्शन केले. त्याच्या पुस्तकात पवित्र आत्म्यासाठी वारा, पाणी, हात अशी प्रतिके वापरण्यात आलेली असल्यामुळे त्याला ‘पवित्र आत्म्याचा संदेष्टा’ म्हणतात.
 • ११) ओबद्या : संपूर्ण ‘जुन्या करारा’तील हे सर्वांत लहान पुस्तक असून त्याला केवळ २१ ओव्या/वचने आहेत. यहुदी लोकांना बंदिवासात नेले जात असताना त्यांचेच बांधव असलेल्या अदोमच्या लोकांनी शत्रूशी सहकार्य केले आणि यहुदाचा पाडाव झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला म्हणून ओबद्याने इ.स.पू. ५३५ या वर्षी अदोमविरुद्ध संदेश दिला.
 • १२) हाग्गय : सर्व संदेष्ट्यांमध्ये हा सर्वांत वयोवृद्ध संदेष्टा असून हद्दपारीतून जेरूसलेमला परतलेल्या लोकांना मंदिर उभारणीस त्याने प्रवृत्त केले. ९५ वर्षे वय असलेल्या या संदेष्ट्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला व इ.स.पू. ५२०–१५ या काळात मंदिर बांधून पूर्ण झाले.
 • १३) जखऱ्या : हा हाग्गय या संदेष्ट्याचा समकालीन असून त्यानेही इ.स.पू. ५२२-५२० दरम्यान विविध दृष्टान्तांद्वारे लोकांना मंदिर उभारणीस व योग्य ती उपासना देवाला अर्पण करण्यास प्रवृत्त केले. त्यात त्याने मसिहाच्या आगमनाविषयी केलेले भाकीत येशूच्या जेरूसलेम प्रवेशावेळी पूर्ण झाले (बायबल, मत्तय २१:५).
 • १४) मलाखी : मंदिर उभारल्यानंतर तब्बल ५० वर्षांनी, म्हणजे इ.स.पू. ४६५ साली, मलाखीने लोकांना परमेश्वराशी असलेले त्यांचे नाते संबंध व उपासनाविधी ह्यावरून धारेवर धरले. याजक, यज्ञ, आज्ञा, दशांश, अर्पणे, परमेश्वराचा आदर यांविषयी लोकांना खडसावतानाच ‘मी माझा निरोप्या तुझ्यापुढे पाठवितो’ ह्या शब्दांत मसिहाचा अग्रदूत योहान बाप्तिस्ताविषयी त्याने भाकीत केले.
 • १५) योएल : यहुदी संदेष्ट्यांच्या परंपरेतील हा शेवटचा संदेष्टा. त्याने इ.स.पू. ३५० साली आपला संदेश दिला. एकीकडे पश्चात्ताप तर दुसरीकडे पवित्र आत्म्याठायी नवजीवन असा दुहेरी संदेश त्याने दिला. त्यामुळे ख्रिस्ती परंपरेत प्रायश्चित्तकाळाच्या पहिल्या दिवशी (राखेच्या बुधवारी) आणि पेन्टेकॉस्ट सणाच्या दिवशी त्याच्या पुस्तकातील वाचन उपासनेच्या वेळी वापरले जाते.

वरील संदेष्ट्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव ‘नव्या करारा’तील लिखाणावर दिसून येतो. ‘नव्या करारा’त संदेष्ट्यांच्या ग्रंथातील जवळ जवळ ४०० संदर्भ देण्यात आलेले आहेत. त्यांपैकी ३०० संदर्भ एकट्या यशयाच्या पुस्तकातील आहेत.

योहान बाप्तिस्ता ह्याला क्षणिक अर्थाने ‘जुन्या करारा’चा अखेरचा संदेष्टा व ‘नव्या करारा’तील पहिला संदेष्टा मानला जातो. येशू त्याचे वर्णन ‘संदेष्ट्याहून श्रेष्ठ’ अशा शब्दांत करतो (बायबल, मत्तय ११:८-१९).

वरील पुस्तकांव्यतिरिक्त यिर्मयाचे विलापगीत, बारूख, यिर्मयाचे पत्र ही पुस्तकेदेखील संदेष्ट्यांच्या ग्रंथात मोडतात. डॅनिएल (दानिएल)चा उल्लेख संदेष्टा म्हणून केला जात असला, तरी त्याच्या पुस्तकाचे स्वरूप ‘दृष्टान्तवादी’ आहे. त्यामुळे संदेष्ट्यांच्या ग्रंथांत त्याचा समावेश केला जात नाही.

संदर्भ :

 • Blenkinsopp, Joseph, A History of Prophecy in Israel, London, 1984.
 • Maly, Engene, Prophets of Salvation, New York, 1987.
 • Mays, J. L.; Achtemeier, P. J. Interpreting the Prophets, Philadelphia, 1987.
 • Miller, John, Meet the Prophets, New York, 1987.
 • Rui de Menezes, Voices from Beyond, Mumbai, 2005.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया