अँक्वीनास, सेंट थॉमस :  (१२२५-१२७४).अँक्वीनास सेंट हे मध्ययुगीन राजकीय विचारवंत होते. त्यांनी मध्ययुगातील ब्रिटिश राजकीय विचारात तसेच मध्ययुगात राजकीय तत्त्वज्ञानात भर घातली.‌ त्यांनी मध्ययुगातील धर्मशास्त्र व राज्यशास्त्रीय विचारांचा मेळ घातला.  अँक्वीनास सेंट यांचे लेखन वेगवेगळ्या नऊ प्रकारांमध्ये विभागले आहे. उदाहरणार्थ त्यांनी ब्रह्मज्ञान या संदर्भात भाष्य केले. त्यांनी तत्त्वज्ञानाच्या या कार्यावर देखील भाष्य केले. उदाहरणार्थ ॲरिस्टॉटल आणि नीतिशास्त्र. धार्मिक गोष्टींवरती भाष्य केले. यातूनच त्यांचा राजकीय विचार व्यक्त होत गेला. अँक्वीनासच्या मते राजकीय समाजही विवेकावर आधारलेली एक निसर्गसिद्ध संस्था आहे. त्यांनी राजकीय समाजाची नैसर्गिक संस्था आणि विवेकी आधार अशी दोन वैशिष्ट्ये नोंदवली आहेत. व्यक्तिगत कल्याण आणि सामूहिक कल्याण असा त्यांनी कल्याण संकल्पनेमध्ये फरक केलेला आहे.

सामूहिक कल्याणासाठी राज्यसंस्था अस्तित्वात येते. सामूहिक कल्याण व्यक्तिगत कल्याणापेक्षा वेगळे व उच्च असते. व्यक्तीपेक्षा समाजाचे कल्याण जास्त महत्वाचे आहे. ही वस्तुस्थिती असूनही सार्वभौम सत्तेला मर्यादा आहेत. जुलमी सरकारला विरोध करण्याचा सर्व प्रजेला अधिकार आहे. त्यांनी राजकीय प्रतिकाराचे विवेचन केले. धर्माबाबत राज्यसंस्थेचे अधिकार मर्यादित आहेत. अँक्वीनास सेंट यांनी चर्च व राज्यसंस्था अशी फारकत केली. सार्वकालिक कायद्याबाबत चर्चला पूर्ण अधिकार असतो. तर या कायद्याप्रमाणे रोजच्या व्यवहारातले शासकीय कायदे करण्याबाबत राज्यसंस्थेला अधिकार आहे. मर्यादित राजेशाही शासन पद्धतीच्या अँकवीनासने पुरस्कार केला आहे.

अँक्वीनास सेंटने कायद्याचे वर्गीकरण केले. चार प्रकारच्या कायद्यामध्ये मूलभूत फरक केला. १) सार्वकालिक कायदा : जग निर्माण करण्या मागील परमेश्वरी उद्देश या प्रकारच्या कायद्यातून स्पष्ट होतो. २) निसर्ग सिद्ध कायदा : विवेकशील मानव प्राणी ज्या कायद्यास मानतो किंवा सार्वकालिक कायद्यातील जो भाग विवेक बुद्धीस भावतो त्यास निसर्ग सिद्ध कायदा असे म्हणतात. ३) दैवी कायदा : बायबल मध्ये समाविष्ट झालेल्या देवाच्या आज्ञा. या कायद्यामध्ये सामील केल्या जातात. ४) मानवी कायदा : समाज व्यवस्थित रीतीने चालावा म्हणून विवेकशील मानव जो कायदा करतात त्यास मानवी कायदा म्हणतात. निसर्ग सिद्ध कायदा सर्व मानवी कायदा निर्माण करण्यास पुरेसा आहे व त्याची नैतिकता ठरविण्यास समर्थ आहे. जो मानवी कायदा या कसोटी प्रमाणे अयोग्य असेल तो कायदाच नव्हे, असे विवेचन कायद्याच्या संदर्भात अँक्वीनास सेंट यांनी केले आहे.

संदर्भ :

  • McInerny, Ralph and OCllaghan, Saint Thomas Aquinas, The Stanford encyclopaedia of philosophy, Stanford University, 2018.
  • व्होरा, राजेंद्र, सुहास, पळशीकर, राज्यशास्त्र कोश, दास्ताने कंपनी प्रकाशन, पुणे.