गोपीनाथ मोहंती : (२० एप्रिल १९१४ – २० ऑगस्ट १९९१). ओडिशातील सुप्रसिद्ध ओडिया कवी, इंग्रजी भांषातरकार, भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. त्यांचा जन्म ओडिशा राज्यातील कोनापूर जिल्ह्य़ातील नागवली या गावी जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुर्यनाथ मोहंती अद्भूत व्यक्तीमत्त्वाचे धनी होते. मात्र अतिशय अल्पकाळ गोपीनाथ यांना आपल्या पित्याच्या समवेत राहायला मिळाले. वयाच्या बाराव्या वर्षी पोरके झालेल्या गोपीनाथ यांचे शिक्षण आपल्या भावाजवळ पाटना येथून झाले. १९३० मध्ये मॅट्रीकच्या परीक्षेत ते दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३६ मध्ये कटक विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम. ए. झाले. १९३८ पासून ते ओडिशाच्या प्रशासकीय सेवेत रूजू झाले. विविध पदांवर काम करीत असताना ओडिशाच्या अनेक गावातून त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे ओडिशातील ग्रामीण जीवन, आदिवासी जीवनपद्धती, त्यांचे आचार-विचार, त्यांच्या समस्या ते जाणून घेऊ शकले.
वयाच्या २६व्या वर्षी त्यांनी आपल्या साहित्य लेखनाला प्रारंभ केला. त्यांचे १९ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह, २ नाटके, एक निबंधसंग्रह, दोन चरित्रे व आदिवासींच्या भाषेसंबंधात ८ पुस्तके आदी त्यांची एकूण ४५ पुस्तके प्रकाशित झाली असून चार हिंदी, बंगाली व इंग्रजीतून अनुवादित आहेत. गोपीनाथ मोहंती यांचे प्रकाशित साहित्य : कादंबरी – मन गहिरर चाष (१९४०), दादी बुद्धा (१९४४), परजा (१९४५),अमृतर संतान (१९४७), दाणापाणी (१९५५), अपहंचा (१९६१), माटीमटाल (१९६४), आकाश सुंदरी (१९७२), मनारा निआन (१९७९), डिगा दिहुडी (१९७९) ; कथासंग्रह – नववधू (१९५२),चाइ अलुआ (१९५६), नंमाने नही (१९६८); संशोधन आणि भाषांतरे – गड्बा भाषा परिचय (१९५६), कुभी कोंढ भाषा तत्त्व (१९५६), सावोरा भाषा (१९७८) याशिवाय त्यांनी भारतीय साहित्यातील थोर साहित्यिकांच्या लोकविख्यात कृतींचा अनुवाद केला आहे.
प्रजा ह्या त्यांच्या कादंबरीचे चाळीस वर्षानंतर फेबर आणि फेबर आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी भाषांतर झाले. मुख्यत्वे त्यांच्या लेखनात ओडिशा राज्यातील आदिवासी जीवनाच्या विविध छटा व्यक्त होतात. अमृतर संतान या कादंबरी मध्ये अमृततारा संतान या प्राचीन कवीच्या कुवी – कोढ वंशाचे चित्रण आतिशय कुशलतेने करून त्या काळातील अध्ययनावर प्रकाश टाकला आहे. स्वराबू सौधाचे निधन झाल्यानंतर एका नव्या युगाच्या प्रतिकाचा प्रारंभ होतो आणि त्यातून विलक्षण आधुनिकवादातील वंशाच्या आक्रमणाच्या समृद्धीचा उगम आदिवासी जीवनामध्ये कशा प्रकारे होतो हे महाकाव्य या कादंबरीमध्ये गीतात्मक पद्धतीने सांगितले आहे. येथे मोहंती यांच्या लेखनातील कल्पकता दिसून येते. निर्धन, शोषित, पददलित व आदिवासींच्या जीवनाचं चित्रण करणाऱ्या त्यांच्या या साहित्यकृतीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. आदिवासीतील परजा, कन्ध, कोल्ह, डंब यांच्याबरोबर राहताना ते जमीनदार कुटुंबातील असूनही त्यांच्यात मिसळून गेले. विशेषत: कोराटपूर आणि तेथील आदिवासींशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले.
ओडिशा राज्यातील आदिवासी जीवनाच्या विविध छटा त्यांच्या लेखनातून दिसतात. सामान्य माणसाला बलवान बनवून त्याला पुढच्या कथानकामध्ये कमजोर करायचे, ही पार चालत आलेली जुनी कथा आहे. याचा संदर्भ गोपीनाथ मोहंती अतिशय साध्या सोप्या भाषेत मांडतात. एक प्रकारे सामाजिक बांधिलकी वृत्ती जोपासणारे लेखक म्हणून त्यांची भारतीय साहित्यिकांमध्ये नोद होते. त्यांच्यातील संयम आणि इंद्रिय गोचरता यामुळे त्यांचे लेखन एक विशिष्ट उंची गाठते. केंद्रीय साहित्य अकादमी (१९५५), सोविएत लँड नेहरू पुरस्कार (१९७०) या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय ज्ञानपीठाचा १९७३ चा साहित्य पुरस्कार गोपीनाथ मोहंती यांना त्यांच्या माटीमटाल या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. ही कादंबरी १९६२ ते १९६६ या कालावधीतील सर्व भारतीय भाषांतून निवडली गेली. त्या वर्षी हा पुरस्कार विभागून (कन्नड कवी द. रा. बेन्द्रे यांच्यासह) देण्यात आला. त्यानंतर इ. स. १९८१ मध्ये त्यांना पदमभूषण या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
संदर्भ :
- https://www.loksatta.com/navneet-news/gopinath-mohanty-1432877/
- Datta, Amresh (Edi.), Encyclopaedia of Indian Literature, Sahitya Akademi, New Dehli.