देशाचा आर्थिक विकास व तंत्रज्ञानाची प्रगती होण्यासाठी विद्युत शक्तीचा अखंड पुरवठा ही महत्त्वाची गरज आहे. विविध क्षेत्रातील औद्योगिक कारखाने, शेतीसाठी सिंचन, व्यावसायिक व  घरगुती सुविधा या सर्व ठिकाणी विद्युत ऊर्जेची गरज वाढली. वाढत्या मागणीप्रमाणे विद्युत संच उभारणी, प्रेषण तसेच वितरण वाहिन्यांचे जाळे वाढले. विद्युत ऊर्जा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी सुनियोजित, संकलित प्रचालनाची आवश्यकता निर्माण झाली. याकरिता भारत सरकारने पॉवर सिस्टिम ऑपेरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची स्थापना केली. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतील वीजनिर्मिती केंद्रे, विद्युत पारेषण वाहिन्या एकत्र जोडून राष्ट्रीय महाजाल (ग्रिड) बनलेले आहे. या व्यवस्थेमार्फत संपूर्ण देशात ३७० गिगावॅट विद्युत शक्तीच्या मागणीचा पुरवठा केला जातो. ऊर्जा मंत्रालयाच्या अधिसूचनेप्रमाणे २ मार्च २००५ रोजी राष्ट्रीय ऊर्जा यंत्रणेचे एकत्रित कामकाज सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय भार प्रेषण केंद्र (NLDC) ही शिखर यंत्रणा अस्तित्वात आली.

आ. १. भार प्रेषण केंद्र : श्रेणीबद्ध रचना
(उभयमार्गी बाण उभयमार्गी माहितीची दिशा दर्शवतो)

भार प्रेषण केंद्र : भार प्रेषण केंद्र म्हणजे विद्युत निर्मिती, विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण यांच्यात समन्वय करून ग्राहकांना अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा मिळण्यासाठी कार्य करणारी यंत्रणा होय. योग्य समन्वय राखण्यासाठी त्याचे पाच विभाग केले आहेत : उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि ईशान्य विभागीय भार प्रेषण केंद्रे (RLDC).

राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राशी संपर्क ठेवून त्याच्या आदेशानुसार विभागीय भार प्रेषण  केंद्रे त्या त्या  विभागाचे नियंत्रण करतात. औष्णिक, जल, अणुऊर्जा विद्युत निर्मिती केंद्रे ही देशाच्या ठराविक विभागात आहेत. अपारंपारिक ऊर्जानिर्मिती केंद्रे (२३.६%) ही ग्रिडशी जोडलेली आहेत. त्यामुळे विभागीय विद्युत केंद्रात विद्युतशक्तीची देवाणघेवाण करावी लागते. त्यावेळेस राष्ट्रीय जालनियमांचे (ग्रिड कोड) पालन करणे बंधनकारक आहे.

उत्तर विभागीय भार प्रेषण केंद्र (दिल्ली), हरयाणा, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, चंडीगढ, उत्तराखंड व दिल्ली  या राज्यांना जोडलेले आहे.

पश्चिम विभागीय भार प्रेषण केंद्र (मुंबई) गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, गोवा, दीव दमण, दाद्रा नगरहवेली या राज्यांना व प्रदेशांना जोडलेले आहे.

दक्षिण विभागीय केंद्र (बंगलोर) तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगण या राज्यांना जोडलेले आहे.

पूर्व विभागीय केंद्र (कलकत्ता) बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांना जोडलेले आहे.

ईशान्य विभागीय केंद्र अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर ,मिझोराम, नागालँड, सिक्कीम या प्रदेशांना जोडलेले आहे. या ग्रिडमार्फत नेपाळ, भूतान आणि ब्रह्मदेश या देशांनाही विद्युत शक्ती आदानप्रदान होते.

विभागीय भार प्रेषण केंद्रास राज्यस्तरीय भार प्रेषण केंद्र (SLDC-33no.), विद्युत निर्मिती केंद्र आणि केंद्रीय संस्था, राज्य उपकेंद्रातून (sub LDC-18 no.) विद्युत शक्ती निर्मिती व भार मागणीची माहिती मिळते (आ. १).

विभागीय भार प्रेषण केंद्राची महत्त्वाची कार्ये : (१) राष्ट्रीय जालनियमांमध्ये केंद्रीय आयोगाने नमूद केल्यानुसार वीज वहन व इष्टतम वेळापत्रक अनुसार वीज पाठवण्याच्या संदर्भात घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व कार्यपद्धतीचे पालन करणे.

(२)  राष्ट्रीय जालनियमांच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण करणे.

(३) प्रादेशिक ग्रीडमधून प्रसारित झालेल्या विजेच्या प्रमाणात हिशेब ठेवणे.

(४) आंतरराज्य प्रसारण प्रणालीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे.

(५) ग्रिड मानक आणि ग्रिड कोडच्या अनुषंगाने प्रादेशिक ग्रिडच्या सुरक्षित आणि किफायतशीर कार्यप्रणालीद्वारे चालू वेळेचे वीजनियंत्रण करणे.

(६) ग्रिड कार्यप्रणालीची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणाखालील प्रदेशातील ऊर्जा यंत्रणेच्या कामकाजात जास्तीत जास्त किफायतशीर आणि कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशा देखरेखीवर आणि नियंत्रणांचा उपयोग करणे.

(७) दैनिक वेळापत्रक आणि परिचालन नियोजन करणे .

(८) उभयमार्गी आणि आंतरप्रादेशिक संलग्न वाहिनीत विद्युत वारंवारता (४९.९  — ५०.०५ हर्ट्झ)  स्थिर ठेवून आंतरप्रादेशिक शक्तींचे आदानप्रदान सुलभ करणे.

भार प्रेषण केंद्राची महत्त्वाची कार्ये : (१) विद्युत शक्ती मागणी व विद्युत निर्मिती पुरवठा याचे संतुलन राखणे.

(२) ऊर्जा वितरण आणि ग्राहकाच्या प्रकारानुसार भार मागणी पद्धतीचा (औद्योगिक, व्यापारी, शेती, रेल्वे, उच्च दाब, हंगामी उद्योग) अभ्यास  करणे.

(३) संप्रेषण आणि पर्यवेक्षी नियंत्रण आणि माहिती अधिग्रहण (Supervisory control and data acquisition) प्रणालीचे नियंत्रण करणे.

(४) घटना विश्लेषण आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे.

(५) शेजारील ग्रिडसह समन्वय साधणे.

(६) आपत्कालीन घटनांमुळे  निर्माण झालेल्या गडबडींचे विश्लेषण आणि त्वरित उपाययोजना  करणे.

(७) भविष्यकालीन भार अंदाज व त्याप्रमाणे इष्टतम निर्मितीचे नियोजन करणे.

(८) दूरमापन, संगणकीय आणि संदेशवहन  सुविधांचे संवर्धन करणे.

(९) जनसंपर्क आणि ग्राहक सुसंवाद साधणे.

भार प्रेषण केंद्रात पर्यवेक्षी नियंत्रण आणि माहिती अधिग्रहण प्रणालीचा वापर पुढीलप्रकारे केला जातो.

उत्तर ग्रिड भार प्रेषण केंद्र (स्काडा) कक्ष

पर्यवेक्षी नियंत्रण आणि डेटा अधिग्रहण प्रणाली (SCADA) : स्काडा ही एक उच्च तंत्रज्ञानाची संगणक प्रणाली संबंधित संप्रेषण जालकासह कार्यान्वित असते. मुख्य संगणकात सर्व माहिती सेवाकेंद्र (सर्व्हर) साठविली जाते. राज्यातील अनेक विद्युत निर्मिती केंद्रे ,विद्युत वितरण उपकेंद्रे, या ठिकाणी दूरस्थ अंतिम उपकरण (Remote terminal unit) बसवलेले असते. दूरस्थ अंतिम उपकरण हे सूक्ष्मप्रक्रियकयुक्त उपकरण आहे. संवेदकाद्वारे विद्युत धारा, विद्युत दाब, वारंवारता, सक्रिय शक्ती मागणी, जनित्र निर्मिती मागणी दर १५ मिनिटांनी दूरस्थ अंतिम उपकरणामध्ये गोळा केली जाते. ती संकलित करून दूरस्थ संदेशवहन यंत्रणेमार्फत जलद पाठविली जाते. माहिती पाठविण्यासाठी प्रकाशकीय तंतूंचा (Optical fibre cable) वापर केला जातो.  तसेच नियंत्रण केंद्रातून आलेल्या संदेशाचे ग्रहण करून त्याप्रमाणे उपकेंद्रातील यंत्रणा कार्यान्वित करते.

 

(१) विस्तारित क्षेत्रात पसरलेल्या प्रक्रियांच्या विविध माहितीचे जलद अधिग्रहण करण्यासाठी ही सर्वांत योग्य यंत्रणा आहे.

(२) हे  तंत्रज्ञान शक्ती प्रणाली जालकाचे (Power system network) पर्यवेक्षण आणि नियंत्रण सक्षम करते.

(३) यामध्ये प्रचालक व संगणक यंत्र संपर्क असतो. हे प्रचालकाला दूरस्थ प्रक्रिया नियंत्रकांवर निर्धारित बदल करण्यास, झडप उघडण्यास किंवा बंद करण्यास, मोजमापाची माहिती संकलित करण्यासाठी, भयसूचना पद्धतीचे निरीक्षण करण्यास परवानगी देते.

(४) दृश्यचित्र फलकाद्वारे माहितीचा आलेख, पूर्व घडामोडी यांचे निरीक्षण करता येते.

उत्तर-पूर्व विद्युत जालक नकाशा : छायाचित्र

भार मागणी आणि पुरवठा यांतील असंतुलनामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याचे निराकरण : जुलै २०१२ मध्ये भारतात भार मागणी आणि पुरवठा यातील असंतुलनामुळे उत्तर ग्रिडवर ताण येऊन विद्युत पुरवठा बंद पडला आणि देशातील उत्तर ग्रिडअंतर्गत आठ राज्यांमध्ये अंधार झाला. त्यावेळी वारंवारता जलद घसरल्याने विद्युत संच बंद पडले. त्यावर अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की, विस्तृत प्रदेशातील विद्युत सक्तीच्या प्रावस्था कोनात खूप मोठा फरक पडल्याने हे घडले. प्रावस्था कोन मापन उपकरण हे जीपीएस उपग्रहास जोडलेले असते. त्यामुळे माहितीबरोबर तंतोतंत वेळही कळते. त्याचबरोबर वारंवारता घसरण्याचा वेग नियंत्रित केल्यास विद्युत ग्रिडची स्थिरता व सुरक्षितता राखली जाते. त्याप्रमाणे सुधारणा केल्याने भारतात अखंड सुरक्षित वीजपुरवठा चालू आहे.

मानवी शरीरात रक्तवाहिन्यांचे जाळे असते. रक्तामार्फत सर्व शरीरास अखंड ऑक्सिजन पुरवला जातो. गरजेप्रमाणे योग्य अवयवास, योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य मेंदूच्या आज्ञेने रक्ताभिसरण यंत्रणा करते. शरीरातील मेंदूच्या कार्याप्रमाणे भार प्रेषण कार्य महत्त्वाचे आहे.

 

संदर्भ :

• www.posoco.in

• Wadhva, C.L. Electrical power systems, New age international Publishers.

 समीक्षक : अंजली धर्मे