अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॅन्सम रॅाजर्स ह्यांनी मांडलेले व्यक्तिमत्त्व प्रारूप त्यांच्या व्यक्तीकेंद्रित उपचारपद्धती व सिद्धांतावर आधारित आहे. मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करताना रॉजर्स ह्यांनी व्यक्तीकेंद्रित उपचारपद्धती विकसित केली व त्या आधारे हे व्यक्तिमत्त्व प्रारूप मांडले. व्यक्तीला ती स्वत: व तिच्या भोवतालचे जग ज्याप्रकारे प्रतीत होते, तो दृष्टिकोन तिचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजेच जाणिवेच्या पातळीवरील तिच्या व्यक्तिगत/प्रत्यक्ष अनुभवांना प्राधान्य द्यावे असे हा सिद्धांत मानतो (Phenomenological approach).

रॉजर्स यांनी मांडलेल्या या दृष्टिकोनाला मानवतावादी दृष्टिकोनही (Humanistic approach) असेही म्हणतात. हा दृष्टिकोन व्यक्तीच्या स्व-विकासाच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा असा सकारात्मक स्वरूपाचा आहे. मानसोपचार व वर्तनबदल हा त्या सिद्धांताचा पाया आहे आणि व्यक्तीची स्व-संकल्पना, व्यक्तिनिष्ठ अनुभव व त्यानुसार कार्यरत व्यक्ती हा त्या सिद्धांताचा केंद्रबिंदू आहे.

रॉजर्स यांच्या मते, व्यक्तीचा मूळ स्वभाव सकारात्मक असतो. स्व-वास्तविकीकरण, परिपक्वता व सामाजिकरण ह्यांच्या – म्हणजेच विकासाच्या दिशेने – व्यक्ती कार्यरत असते. प्रत्येक व्यक्तीचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनही एकमेवाद्वितीय असतो आणि त्याच्या वस्तुनिष्ठ आकलनाने त्या व्यक्तीचे संवेदन, भावना जाणून घेता येतात व तिला समजणेही शक्य होते.

रॉजर्स ह्यांनी जीव आणि स्व ह्या व्यक्तिमत्त्वातील दोन मूलभूत संकल्पना सांगितल्या आहेत. जीव हा सर्व अनुभवांचे केंद्रस्थान आहे. अनुभव म्हणजे जीवाशी संबंधित आणि जाणिवेला उपलब्ध अशा सर्व घडामोडी. व्यक्तीच्या अनुभवांतून तिचे अनुभवविश्व (Phenomenal Field) तयार होते. ही फक्त व्यक्तीलाच माहित असलेली अशी संदर्भचौकट असते. समानुभूतीमुळे अथवा सहभावामुळे (empathy) इतरांना थोडीफार कल्पना येऊ शकली तरी त्यांना पूर्ण माहिती असू शकत नाही. व्यक्ती कसे वर्तन करेल हे बाह्य वास्तवानुसार ठरत नसून तिच्या अनुभवविश्वानुसार (व्यक्तिनिष्ठ वास्तवानुसार) ठरत असते.

बोधात्मक आणि अबोध अशा दोन्ही स्तरांवरील अनुभवांनी व्यक्तीचे अनुभवविश्व तयार होते. रॉजर्स ह्यांच्या मते विशेषत: नकारात्मक उद्दीपकांपासून व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी मन अबोधावस्थेतील काही उद्दीपकांना बोधनाच्या स्तरावर न आणताच अनुभवते / प्रतिक्रिया देते (subception). असे अनुभव वास्तवाच्या कसोटीवर तपासले जात नाहीत. त्यामुळे अशावेळी अयोग्य वर्तन घडू शकते. मात्र रॉजर्स ह्यांनी, बाह्य वास्तव कसे ठरवले जाते व बाह्य आणि व्यक्तिनिष्ठ वास्तवात कसा भेद केला जातो हे पुरेसे स्पष्ट केले नाही.

‘स्व-कल्पना’ ही या सिद्धांताची महत्त्वाची संकल्पना आहे. बाह्य उद्दीपक, बाह्य जगातील घेतलेले अनुभव व्यक्ती स्वसंदर्भात जोडून घेते. अशा प्रकारे स्वसंदर्भातील संवेदनाची संघटित आणि सुसंगत संरचना म्हणजे ‘स्व-कल्पना’. ही जाणिवेच्या स्तरावर असते. ‘आदर्श स्व’ ही सिद्धांतातील दुसरी संकल्पना. व्यक्तीच्या दृष्टीने मौल्यवान अशा व्यक्तित्वगुणांचा त्यात समावेश असतो. हे गुण प्राप्त करण्याची व्यक्तीला इच्छा असते.

व्यक्तिनिष्ठ वास्तव आणि बाह्य वास्तव ह्यांच्यातील विसंगती, ‘स्व-कल्पना’ आणि आदर्श स्व ह्यांच्यातील तफावत किती प्रमाणात आहे, हे व्यक्तित्व रचनेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असते. दोहोंतील फरक जेवढा जास्त तेवढी व्यक्ती अधिक असमाधानी, कुसमायोजित असेल.

व्यक्तिमत्त्वाची गतिशीलता :

अनुवंश आणि सामाजिकरण प्रक्रिया ह्यांच्या आंतरक्रियेतून व्यक्तीची वाटचाल विकासाच्या दिशेने होत असताना बाल्यावस्थेत मिळणारे प्रेम, सन्मान, केली जाणारी देखभाल हे घटक महत्त्वाचे ठरतात. स्व-प्रगती आणि अधोगती ह्यांतील भेद ओळखून योग्य मार्गाची निवड करता येते. स्व-वास्तविकीकरणाचा मार्ग शोधताना व्यक्तीचा विनाशर्त प्रेमपूर्वक, सन्मानपूर्वक स्वीकार केलेला असणे महत्त्वाचे ठरते.

व्यक्तिमत्त्व विकास :

इतरांकडून येणारे मूल्यमापनात्मक अनुभव सकारात्मक असतील तर व्यक्ती विकासाला चालना मिळते, सु-समायोजित आणि कार्यरत (fully functioning) व्यक्तिमत्त्व विकसित होते; परंतु सहसा आई-वडील आणि इतरांकडून येणारे अनुभव सकारात्मक व नकारात्मक असे संमिश्र स्वरूपाचे असतात. त्यामुळे मूल समाजमान्य आणि समाजाला अमान्य असलेल्या भावना व कृतींमध्ये फरक करायला शिकते. समाजाला अमान्य असलेल्या अनुभवांचा स्वसंकल्पनेत स्वीकार केला जात नाही. म्हणजेच व्यक्ती आपण जसे आहोत तसे स्वत:ला न स्वीकारता इतरांना आपण जसे हवे आहोत, तसे बनण्याचा प्रयत्न करते. समाजमान्य कृती व्यक्तीच्या दृष्टीने ‘लायक/योग्य असण्याच्या अटी’ (conditions of worth) बनतात व त्यानुसार अनुभवांचे निवडपूर्ण संवेदन केले जाते; मात्र अशा भावना नाकारण्याने त्या अबोध स्तरावरून वर्तनावर प्रभाव टाकतात. असे जेवढ्या जास्त प्रमाणात घडेल, तेवढ्या जास्त प्रमाणात व्यक्तीला ताण, चिंता, अस्वस्थपणा जाणवेल. त्यामुळे काही अनुभव नाकारले जातील. एकतर त्यांचे अस्तित्वच नाकारले जाईल किंवा त्यांचे संवेदन विपर्यस्त स्वरूपात होईल. तसेच अबोध स्तरावर अशा अनुभवांचे संवेदन होत राहिल्याने आत्मसंरक्षक यंत्रणांचा वापर वाढेल. परिणामत: बिघडलेले आंतर्व्यक्तिक संबंध आणि शारीरिक व मानसिक बदल दिसून येतील.

व्यक्तीचा विनाशर्त स्वीकार केला गेल्यास आत्मसंरक्षक यंत्रणांचा वापर वाढत नाही. रॉजर्स अशा व्यक्तींना ‘सर्वार्थाने कार्यरत व्यक्ती’ (fully functioning individuals) म्हणतात व त्यांनी त्यांची पुढील तीन वैशिष्ट्ये सांगितली आहेत: १) सर्व अनुभवांचा खुलेपणाने स्वीकार; २) अस्तित्ववादी विचारसरणीचा अवलंब. त्यांना प्रत्येक क्षण सर्वार्थाने अनुभवता येतो. कारण, काय करायला हवे, कसे असायला हवे ह्याविषयी त्यांचा कसलाच आग्रह नसतो; ३) अशा व्यक्ती स्वत:चे निर्णय स्वत: घेतात आणि निर्णयाच्या परिणामांचा पूर्ण आत्मविश्वासाने, मोकळेपणाने स्वीकार करतात.

ह्या व्यक्तिमत्त्व प्रारूपाशी संबंधित व्यक्तिकेंद्रित उपचारपद्धतीमध्ये समुपदेशक व अशील (रुग्ण) यांच्यामध्ये परस्पर नाते असायला हवे, असे त्यांचे तम होते. यामध्ये समुपदेशकाची वृत्ती अतिशय महत्त्वाची असते. कारण, समुपदेशक अशिलाला त्याचा/तिचा ‘विनाशर्त सन्मानपूर्वक स्वीकार’ केला असल्याची खात्री पटवून वस्तुनिष्ठ अनुभवांशी सुसंगत स्वकल्पना विकसित करायला व ‘वास्तव स्व’ आणि ‘आदर्श स्व’ ह्यांतील विसंवाद कमी करायला प्रवृत्त करतो आणि व्यक्ती स्ववास्तविकरणाच्या दिशेने सक्षमपणे वाटचाल करू लागते.

संदर्भ :

Hall, Calvin S., Lindzey, Gardner, Campbell, John B., Theories of Personality, 4th Ed., reprint 2009, New Delhi.

समीक्षक : मनीषा पोळ