वृद्ध व्यक्ती म्हणजेच ज्यांचे वय ८५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींपैकी ५०% व्यक्तींमध्ये हा आजार पाहावयास मिळतो.
पार्श्वभूमी : रुग्णांची लक्षणे वार्धक्यापेक्षा वेगळी आहेत, अशी या आजाराची नोंद डॉ. अलॉइस अल्झायमर (Dr. Alois Alzheimer) यांनी प्रथम केली, म्हणून या आजाराला त्यांच्या नावाने ओळखले जाते.
लक्षणे : बौध्दिक क्षमता कमी होणे, आकलन न होणे, विशेषत: संध्याकाळी मनातील गोंधळ वाढणे, भास होणे, स्थलकालाचे भान न राहणे, स्वत:च्या इच्छेने लक्ष देता न येणे, विस्मरण, चिडचिडेपणा, अर्थहीन शब्द पुन:पुन्हा बोलणे, अस्वस्थता, व्यक्तिमत्त्वात बदल, एकाकी वाटणे, उदासिनता अशी लक्षणे व्यक्तीमध्ये आढळून येतात. विस्मरण हे याचे एक लक्षण असले, तरी वार्धक्यातील विस्मरण आणि हा आजार यामध्ये फरक आहे.
अल्झायमर आजाराच्या अवस्था : अल्झायमर आजाराची तीन अवस्थांमध्ये विभागणी केली जाते. यांपैकी द्वितीय अवस्था हा आजार असेल तरच येते.
प्रथम अवस्था : या अवस्थेत वर्तमान अनुभव लक्षात राहत नाहीत, त्यामुळे नवीन काही शिकता येत नाही.
द्वितीय अवस्था : या अवस्थेत ही लक्षणे वाढतात. त्यामुळे माणसे जेवण झालेले असूनदेखील पुन्हा जेवण मागू लागतात. त्यांना काळाचे भान राहत नाही. ते रात्री अपरात्री अंघोळीला जाऊ लागतात. अंघोळ केल्यानंतर कपडे न घालताच बाहेर येतात. त्यांचा राग, उदासी, चिंता वाढते. ते बाहेर फिरायला जातात परंतु घराचा पत्ता विसरतात. त्यांना स्वत:चे नाव सांगता येत नाही. ही अवस्था अनेक वर्षे राहू शकते. या स्थितीत ते फार वेगळे बोलू शकत नाहीत. बोलले तरी जुन्या आठवणी पुन:पुन्हा सांगत राहतात. दुसऱ्या व्यक्तीशी किती जवळीक साधायची याचे भान राहत नाही. ते भूतकाळात जगू लागतात. जोडीदाराचा मृत्यू होऊन दहा वर्षे झाली असली तरी तो आहेच असे त्यांना वाटते. त्याला शोधत फिरू लागतात. तो जेवायला येईल म्हणून वाट पाहत बसतात. हळूहळू त्यांना स्वत:ची काळजी घेणे, शरीराची स्वच्छता करणे देखील जमत नाही. जेवताना घास किती वेळ चावायचा याचेही भान राहत नाही. ते घास बकाबका न चावताच गिळू लागतात किंवा तोंडात तसाच धरून ठेवतात. त्यांना काही भास होऊ लागतात. त्यामुळे ते असंबद्ध बोलू लागतात. या आजाराच्या दुसऱ्या अवस्थेत ते हिंडून फिरून असतात.
तृतीय अवस्था : या अवस्थेत मात्र ते अंथरुणातच राहू लागतात. त्यांना स्वत:चे स्वत: उठून देखील बसता येत नाही. हळूहळू त्यांना कुशीवर देखील वळवावे लागते आणि त्यामुळे या आजाराने मृत्यू येतो.
कारणे : या आजारात मेंदूमध्ये अमायलॉइड आणि टाउ प्रथिने (Amyloid & Tau proteins) साठतात. मेंदूमधील आकलन आणि स्मृतीसाठी आवश्यक रसायने कमी होतात. याचा परिणाम आकलन, स्मरण, सजगता अशा अनेक गोष्टींवर होतो. आनुवंशिकता हे एक कारण असते. APOE-4 नावाचे जनुक (Gene) असेल, तर हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. शरीरात क्षोभ निर्माण करणारी रसायने अधिक असणे हेही एक कारण असू शकते. अतिरक्तदाब, स्थौल्य आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना हा आजार अधिक प्रमाणात होतो असे निरीक्षण आहे. मात्र हा एक प्रकारचा मधुमेह आहे आहे, असा सिद्धांत मांडला जात आहे. मेंदूतील पेशींतील इन्शुलीनची संवेदनशीलता कमी झाल्याने हा आजार होतो, असे संशोधनात दिसत आहे.
निदान : स्मृती, आकलन, बोलणे, लक्ष देणे, समस्या सोडवणे आणि वर्तन याविषयीच्या प्रश्नावलीचा ( NINCDS- ADRDA Alzheimer’s criteria) वापर केला जातो. मेंदूचे पॉझिट्रॉन उत्सर्जन छेदचित्रण (Positron Emission Tomography – PET scan) आणि चुंबकीय अनुस्पंद चित्रण (Magnetic Resonance Imaging – MRI) यांच्या साहाय्याने निदानाची खात्री केली जाते.
उपचारपद्धती : हा आजार बरे करणारे परिणामकारक औषध नाही. या आजारात ॲसिटिल कोलीन हे मेंदूतील रसायन कमी होते. त्यामुळे ते वाढवणारी औषधे दिली जातात. मात्र त्यांचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही.
प्रतिबंधात्मक उपाय : योग्य आहार, शारीरिक व्यायाम, तणाव व्यवस्थापन, योग्य प्रमाणात झोप आणि मस्तिष्कव्यायाम (Neurobics) या जीवनशैलीतील बदलांनी आजाराची गती मंद करता येते, तो टाळता येतो.
एकूण रुग्णांपैकी केवळ ५% रुग्ण साठ वर्षांपेक्षा लहान असतात. त्यामुळे साठीपासून हा आजार टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. साठीनंतर शरीराची तशीच मनाची लवचिकता कमी होते. पूर्वीचा काळ राहिला नाही असा तक्रारीचा सूर वाढतो, त्याने उदासी येते. ती टाळण्यासाठी घरात आणि जगात जे काही होत आहे त्याचा साक्षीभाव ठेवून स्वीकार करावा.
दिवसा फिरायला जावे. रोज नवीन माहिती घ्यावी, आठवड्यात किमान एक नवीन ओळख करून घ्यावी. झोप लागत नाही याचीही सारखी तक्रार मनातल्या मनातही करू नये. झोपेचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी झोपेची दैनंदिनी लिहिणे हा एक उपाय आहे. त्यामध्ये चोवीस तासात किती वेळ झोप लागली याची नोंद ठेवावी. पाच मिनिटांची डुलकी आली तरी ते नोंदवावे. रात्री किती वाजता प्रकाश मंद केला, साधारण किती वाजता झोप लागली, कधी जाग आली हे लिहावे. रात्री ठरलेल्या वेळी आडवे व्हावे आणि सहा तासांनी अंथरूणातून बाहेर पडावे. त्या सहा तासात झोप लागली नसेल, तर श्वासाबरोबर होणाऱ्या छातीपोटाच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. पाच श्वास मोजून झाले की, पुन्हा एक पासून सुरुवात करावी. पहाटे जाग आली की, तरुणपणातील आठवणींच्या विचारात न राहता काल घडलेले प्रसंग आठवावे. काय खाल्ले, काय वाचले, पाहिले, कुणाला भेटलो, कोणत्या गप्पा मारल्या याची मनात नोंद करावी. साखरझोप आली तर पुन्हा झोपावे.
आपण आठवणीत, विचारात रमलो आहोत याचे भान आले की, लक्ष वर्तमान क्षणात आणायचे. वर्तमानक्षणात ज्ञानेंद्रिये जी माहिती देतात त्यावर लक्ष देण्याच्या सजगता व्यायामांनी अल्झायमरची गती मंदावते.
मस्तिष्कव्यायाम : मेंदूची क्षमता वाढवणाऱ्या व्यायाम प्रकारांना मस्तिष्कव्यायाम असे म्हणतात. यांमुळे मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत होते.
फिरायला जाताना एकाच ठिकाणी न जाता वेगळा रस्ता निवडणे; जेवताना डोळे बंद करून चवीने किंवा वासावरून पदार्थ ओळखणे; सवयीचा नसणारा हात कामे करण्यासाठी वापरणे; शब्दकोडी, अंककोडी (Sudoku) सोडवणे हे मस्तिष्कव्यायामाचे काही प्रकार आहेत.
पहा : स्मृति व विस्मृति.
संदर्भ :
- Alistair Burns, Steve Iliffe Alzeimers disease Alistair Burns, 2009.
- Hsu D, Marshal GA Primary and secondary prevention trials in Alzheimer disease – looking back moving forward 2017.
- Kim , JH Genetics of Alzheimers disease 2018.
- Lancet March Alzheimers disease 2011.
- National institute on Aging About Alzheimers Disease Symptoms 2012.
- cbi.nlm.gov. Mindfulness and meditation – treating cognitive impairment and reducing stress in dementia.