कर्करोगावर उपचार करण्यात येणाऱ्या औषधी उपचारांना रासायनिक चिकित्सा असे म्हणतात. औषधे ही सामान्यत: रसायनांपासून बनविलेली असतात म्हणून या उपचारांना रसायनोपचार असे देखील म्हणतात. यासंदर्भातील केमोथेरपी हा शब्द प्रचलित आहे. कर्करोग रुग्णालयाच्या ज्या विभागात रसायनोपचार दिले जातात, त्या विभागास ‘वैद्यकीय कर्करोग विभाग’ (Medical Oncology Section) आणि या तज्ञ वैद्यांना ‘वैद्यकीय कर्करोगतज्ञ’ (Medical Oncologist) असे म्हणतात.

भारतीय अन्न व औषध प्रशासनाने जवळपास शंभर निरनिराळी औषधे कर्करोग प्रतिबंधक आहेत म्हणून मान्यता दिली आहे. नवीन संशोधनानुसार या औषधांच्या संख्येत भर पडत आहे.

प्रकार : (१) पेशीविषजन्य रासायनिक चिकित्सा (Cytotoxic chemotherapy): ज्या औषधांनी पेशींचे विभाजन थांबवून विनाश केला जातो, त्या पध्दतीस ‘पेशीविषजन्य रासायनिक चिकित्सा’ म्हणतात. अशा औषधांमुळे कर्करोग नसलेल्या पेशीसुध्दा मरण पावतात. उदा., केस उगवणाऱ्या पेशी. त्यामुळे त्या औषधांचा दुय्यम परिणाम म्हणून केस गळतात.

(२) लक्ष्यवेधी रासायनिक चिकित्सा (Target chemotherapy): सुदृढ पेशींना धक्का न लावता तसेच फारसे दुय्यम दुष्परिणाम न होता कर्करोग पेशींच्या विशिष्ट प्रथिन अथवा तिचे कार्य थांबवून कर्करोगाच्या पेशींचा नाश करणाऱ्या पध्दतीस ‘लक्ष्यवेधी रासायनिक चिकित्सा’ असे म्हणतात. वाढणाऱ्या पेशींना अधिक प्रमाणात ऑक्सिजनची व अन्नाची गरज असते. या दोन्ही गोष्टी त्यांना रक्तामार्फत पुरविल्या जातात. कर्करोगाची वाढ होत असताना अधिक प्रमाणात आवश्यक अशा गोष्टींसाठी कर्करोग पेशी नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यास उद्दीपित होतात.

पूर्वतयारी : कर्करोगाचा प्रकार, कर्करोगाची तीव्रता, रुग्णाची शारीरिक स्थिती आणि वैद्यकीय पार्श्वभूमी यांनुसार रासायनिक चिकित्सेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधांचे स्वरूप ठरवले जाते.

कर्करोगाचा प्रकार, स्वरूप व त्याची व्याप्ती, रुग्णाचे वय, रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, पूर्वी घेतलेले कर्करोगावरील उपचार, रुग्णाची शारीरिक स्थिती यांनुसार रासायनिक चिकित्सेचे स्वरूप व कालावधी ठरविला जातो. साधारणपणे रासायनिक चिकित्सा ही टप्‍प्याटप्प्याने दिली जाते किंवा ठराविक दिवसांच्या कालावधीने दिली जाते. रुग्ण उपचाराला कसा प्रतिसाद देतो त्याप्रमाणे हा कालावधी ठरविण्यात येतो. रासायनिक चिकित्सेकरिता शारीरिक स्थिती तपासण्याकरिता वृक्क, यकृत आणि हृदय यांची चाचणी केली जाते. तसेच दंतवैद्याकडून देखील रुग्णाची तपासणी करण्यात येते. रासायनिक उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या मळमळीसाठी रुग्णाला हलका आहार सुचवला जातो.

रासायनिक चिकित्सेचे स्वरूप : कर्करोगाच्या स्वरूपानुसार तसेच शस्त्रक्रियेच्या व प्रारण चिकित्सेच्या आधी किंवा नंतर आवश्यकतेनुसार रुग्णास रासायनिक चिकित्सा दिली जाते. रासायनिक चिकित्सा ही कायमस्वरूपी किंवा एकांतरित (Alternate) असू शकते.

(१) आंतरनीला रासायनिक चिकित्सा : (Intravenous chemotherapy, IV). रासायनिक चिकित्सा देताना आंतरनीला पद्धती वापरावयाची असल्यास रूग्णाला सुषिरी (Catheter), द्वार (Port) किंवा पंप शस्त्रक्रियेद्वारे मोठ्या शिरेमध्ये जोडला जातो. याद्वारे रासायनिक चिकित्सेतील औषधे शरीरामध्ये सोडली जातात.

(२) मुखीय रासायनिक चिकित्सा : (Oral chemotherapy). काही रासायनिक औषधे गोळी (Pill) किंवा पुटिका (Capsule) या स्वरूपात दिली जातात. वेधक औषधे (Shots) नीलेमध्ये अंत:क्षेपणाने (Injection) दिली जातात.

(३) स्थानिक चिकित्सा : (Topical chemotherapy). त्वचा कर्करोगाकरिता काही मलम (Cream) किंवा जेल त्वचेवर लावले जातात.

तसेच शरीरातील कर्करोगबाधित भागाला रासायनिक उपचार दिले जातात. उदा., रासायनिक औषधयुक्त चकती (Wafer) गाठीजवळ शस्त्रक्रियेद्वारे ठेवली जाते. या चकतीद्वारे कर्करोधक रासायनिक औषधे स्रवत राहतात.

(४) अंत:क्षेपित रासायनिक चिकित्सा : (Injected chemotherapy).  यामध्ये एखाद्या स्नायूमध्ये किंवा त्वचेखाली अंत:क्षेपण दिले जाते. साधारणत: अशी वेधक अंत:क्षेपणे (Shots) हात, पाय किंवा उदरपोकळीमध्ये/पोटामध्ये दिली जातात.

(५) अवयवसापेक्ष रासायनिक चिकित्सा : अंत:पर्युदरी रासायनिक चिकित्सेमध्ये (Peritoneum chemotherapy) प्रत्यक्ष उदरपोकळीमध्ये (Abdomen) औषधे दिली जातात. उदा., अंडाशयाचा कर्करोग (Ovarian cancer).

इतर अवयवांकरिता देखील रासायनिक उपचार केले जातात. उदा., फुप्फुसांतर्गत (Intrapleural) रासायनिक चिकित्सा, मस्तिष्ककवचांतर्गत (Intrathecal) रासायनिक चिकित्सा, मूत्राशयांतर्गत (Intravesical) रासायनिक चिकित्सा इत्यादी.

(६) अंतर्धमनी रासायनिक चिकित्सा : (Intra-artery chemotherapy). काही वेळा गाठीच्या वाढीला पोषण देणाऱ्या धमनीमध्ये रासायनिक औषधे सोडली जातात. या पद्धतीला अंतर्धमनी रासायनिक चिकित्सा असे म्हणतात.

रासायनिक चिकित्सा उपचार पद्धती : अनेकदा रासायनिक चिकित्सेचा उपयोग शस्त्रक्रिया, प्रारण चिकित्सा (Radiation therapy) अथवा जैविक चिकित्सा (Biological therapy) यांसोबत केला जातो.

 (अ) रासायनिक प्रारण चिकित्सा (Chemo radiation therapy) : जेव्हा कर्करोग तीव्र स्वरूपाचा असतो अथवा लगतच्या इतर अवयवांत त्याचे प्रसरण झालेले असते, अशा वेळी तज्ञ रासायनिक चिकित्सा व प्रारण चिकित्सा एकाच वेळी बरोबरीने देतात आणि कर्करोगावर ताबा मिळवितात. या पध्दतीला ‘रासायनिक प्रारण चिकित्सा’ (Chemo radiation therapy) असे म्हणतात.

(ब) संलग्नित रासायनिक चिकित्सा (Neoadjuvant chemotherapy) : अनेक वेळा कर्करोगाची गाठ काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. परंतु त्याच वेळी गाठीचा आकार मोठा असल्याने शस्त्रक्रिया करून ती काढून टाकणे अवघड असते. अशा वेळी शस्त्रक्रियेच्या अगोदर रसायनोपचार करून आधी गाठीचा आकार लहान केला जातो आणि त्यानंतर शस्त्रक्रिया करून गाठ काढली जाते. या प्रक्रियेस ‘संलग्नित रासायनिक चिकित्सा’ (Neoadjuvant chemotherapy) असे म्हणतात.

(क) साहाय्यकारी रासायनिक चिकित्सा (Adjuvant chemotherapy): शस्त्रक्रियेने कर्करोगाची गाठ काढून टाकल्यावर जर कर्करोगाच्या काही पेशी शरीरात राहिल्या असल्याचे तज्ञांना वाटले, त्यावेळी शस्त्रक्रियेनंतर रसायनोपचार करून उरलेल्या सर्व कर्करोग पेशी मारल्या जातात. या प्रक्रियेस ‘साहाय्यकारी रासायनिक चिकित्सा’ (Adjuvant chemotherapy) असे म्हणतात.

(ड) जैविक चिकित्सा (Biological therapy) : काही वेळा जैविक चिकित्सा उपचारपद्धतीचा परिणाम अधिक चांगला होण्यासाठी रासायनिक चिकित्सेचा वापर केला जातो.

(इ)उपशमन चिकित्सा (Palliative therapy) : काही वेळा रासायनिक चिकित्सेतील औषधे कर्करोगाचा, अवयवाचा वा इंद्रियाचा आकार कमी करतात. तसेच शरीरामध्ये ज्या आत्यंतिक वेदना होत असतात अथवा दाब निर्माण करीत असतात ते कमी करतात. अशा चिकित्सेला ‘उपशमन चिकित्सा’ (Palliative therapy)असे म्हणतात.

कार्यपद्धती : अनिर्बंध विभाजनाने लाखो पेशी तयार झाल्याने कर्करोगाची वाढ होते. रसायनोपचाराची औषधे या पेशींच्या विभाजनास अडथळा आणतात आणि औषधांनी प्रभावित झालेल्या पेशी कालांतराने मरण पावतात. परिणामी कर्करोगाची वाढ थांबते. औषधे रक्तामध्ये मिसळून शरीरातील सर्व कर्करोग पेशीपर्यंत जातात आणि त्यांचा नाश करतात. रसायनोपचार औषधांनी कर्करोग बरा होण्याची टक्केवारी प्रत्येक कर्करोगाच्या बाबतीत वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची औषधे वेगवेगळ्या कर्करोगांच्या पेशींचा नाश करतात. बऱ्याच वेळा काही कर्करोग पेशींना मारण्यासाठी दोन वा जास्त औषधांचा एकत्र वापर करून काही कर्करोगाच्या पेशींचा नाश केला जातो. अशा वेळी प्रत्येक औषधाचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो. ही औषधे अनेक वेळा कर्करोग पेशींचा नाश करीत असताना काही सामान्य पेशींना सुध्दा त्रासदायक ठरतात आणि त्याचा परिणाम, दुष्परिणाम अथवा सहपरिणाम निर्माण करण्यात होतो.

रासायनिक चिकित्सा पद्धतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांचे पाच प्राथमिक संघ करण्यात येतात.

अल्किलीकारक : (Alkylating agents). कर्कपेशी स्थिर अवस्थेत असताना ही औषधे अधिक परिणामकारक ठरतात.

वनस्पतिजन्य अल्कलॉइडे : वनस्पतींपासून मिळवलेली अल्कलॉइडे कर्कपेशींचे विभाजन होत असताना वापरली जातात.

अर्बुदरोधी प्रतिजैविके : (Antitumor antibiotics). विविध स्तरावरील कर्करोगामध्ये कवकांपासून मिळवलेली  प्रतिजैविके वापरतात.

चयापचयरोधके : (Antimetabolites). चयापचयरोधके ही कर्करोग पेशींच्या वाढीच्या काही स्तरांवर प्रभावी ठरतात. ही कर्कपेशींचे अनुकरण करताना कर्कपेशींची विभाजन क्षमता कमी करतात.

टोपोआयसोमरेज प्रतिबंधके : (Topoisomerase inhibitors). या प्रकारातील औषधे कर्कपेशींना अशक्त करतात. परिणामी कर्कपेशींची विभाजन क्षमता कमी होते.

उपयुक्तता : (१) काही प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींचा रासायनिक चिकित्सेने संपूर्ण नाश केला जातो आणि त्यामुळे कर्करोगबाधित रुग्णास रोगापासून मुक्तता मिळते.

(२) रासायनिक औषधांच्या वापराने कर्करोगाच्या पेशींची व अर्बुदांची वाढ नियंत्रित केली जाते.  परिणामी त्यातून उद्भवणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

(३) काही प्रकारांतील कर्करोगांच्या बाबतीत तो रोग परत येण्याची शक्यता कमी करण्यासाठी या उपचारांचा फायदा होतो.

(४) रासायनिक चिकित्सेचा उपयोग प्रत्यावर्ती कर्करोगकारक (Recurrent cancer) पेशींचा नाश करण्यासाठी अथवा ज्या कर्करोग पेशी इतर अवयवांत / इंद्रियांमध्ये पसरतात, त्यांचा नाश करण्यासाठी सुध्दा केला जातो.

(५) काही औषधे कर्करोगाचे प्रसरण थांबवितात किंवा त्याची वाढ थांबवतात किंवा ज्या कर्करोगाच्या पेशी मुख्य अवयव वा इंद्रिय सोडून इतरत्र वाढत असतात (Metastasis) त्यांचा नाश करतात. परिणामी कर्करोगाची व्याप्ती कमी होते.

 पहा : कर्करोग; जागतिक कर्करोग दिवस; प्रारण चिकित्सा; रासायनिक चिकित्सेचे दुष्परिणाम.

संदर्भ  :

• https://www.mayoclinic.org/tests-procedures/chemotherapy/about/pac 20385033#:~:text=Chemotherapy%20is%20a%20drug%20treatment,most%20cells%20in%20the%20body.

• https://www.cancer.net/navigating-cancer-care/how-cancer-treated/chemotherapy/understanding-chemotherapy

• https://stanfordhealthcare.org/medical-treatments/c/chemotherapy/about-this-treatment/types.html

समीक्षक : ऋजुता हाडये