माहितीचे आदान-प्रदान म्हणजे संप्रेषण (Communication) होय. एकमेकांमध्ये अधिक अंतर असल्यास माहितीच्या प्रसारासाठी टेलिग्राफ व टेलिफोन यांचा वापर पूर्वी केला जात असे. दूरध्वनी (Telephone), भ्रमणध्वनी (Mobile), दूरचित्रवाणी (Television), रेडिओ (Radio, wireless communication) तसेच संगणक या माध्यमांद्वारे प्रभावीपणे माहिती प्रसृत करता येते.
इलेक्ट्रॉनिक संप्रेषण : इलेक्ट्रॉनिक संप्रेषण प्रणालीमध्ये तीन प्रमुख घटकांचा समावेश होतो : प्रेषकयंत्र (Transmitter), माध्यम (Medium) आणि ग्राहकयंत्र (Receiver). संप्रेषणामध्ये लिखित-छापील, ध्वनिफीत, चित्रे इत्यादी स्वरूपात आदान-प्रदान होत असलेल्या संदेशांना ‘माहिती’ (Information or Intelligence) असे संबोधले जाते. हे संदेश प्रेषकयंत्राद्वारे आणि माध्यमाच्या साहाय्याने प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचतात.
(१) प्रेषकयंत्र : इलेक्ट्रॉनिक प्रेषकयंत्र हे इतर काही इलेक्ट्रॉनिक घटकांपासून बनवलेले असून त्याचे प्राथमिक कार्य विद्युत संकेतांचे प्रेषणयोग्य स्वरूपात रूपांतर करणे हे आहे.
उदा., ध्वनी विस्तार यंत्राच्या (Microphone) साह्याने आवाजाचे ध्वनीत रूपांतर करणे; छायाचित्र घेण्याच्या यंत्राच्या (Camera) साह्याने माहिती प्रकाश स्वरूपात साठवणे, पाठवणे.
(२) माध्यम : माध्यमाच्या साहाय्याने माहितीचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होते. याकरिता पुढील माध्यमे वापरली जातात.
बिनतारी : (Wireless). रेडिओवर ऐकल्या आणि ऐकवल्या जाणाऱ्या माहितीचे वहन हवेतून होत असते. माहितीचे विद्युत चुंबकीय ऊर्जेत रूपांतर करून तिचे प्रसारण केली जाते.
विद्युत तार : विद्युत तार हे माध्यमाचे अत्यंत साधे स्वरूप असून, ध्वनीचे ध्वनी विस्तार यंत्रापासून श्रावकापर्यंत (Headphone) वहन करण्यासाठी विद्युत तारेचा वापर होतो. ध्वनिचित्रवाणीच्या संदेशवहनासाठी समाक्ष (Coaxial Cable) तारेचा वापर होतो.
प्रकाशकीय तंतू : (Fibre optic). प्रकाश नलिका प्रकारात प्रकाशाचे पूर्ण आंतरिक प्रवर्तन (Total Internal Reflection) होऊन प्रकाशरूपी माहितीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होते.
जलीय माध्यम : सोनार (SONAR) प्रणालीमध्ये पाण्यात वस्तूचे स्थान प्रतिध्वनीच्या साह्याने निश्चित केले जाते.
भू-माध्यम : पृथ्वी विद्युत वाहक असल्यामुळे माहितीच्या आदान-प्रदानासाठी माध्यम म्हणून काम करते.
(३) ग्राहकयंत्र : प्रेषक यंत्राने माध्यमाच्या साहाय्याने पाठवलेल्या माहितीचा स्वीकार करून पुन्हा मूळ स्वरूपात जतन करणे आणि प्रक्षेपित करणे हे ग्राहक यंत्राचे कार्य आहे. उदा., ध्वनी प्रक्षेपक यंत्रातून मिळणारा ध्वनी.
त्रुटी : प्रेषक यंत्रापासून ग्राहक यंत्रापर्यंत माहितीचे प्रेषण (Transmission) होत असताना गोंगाटामुळे (Noise) संदेशाचे नुकसान होऊ शकते.
पहा : आंतरसंदेशवहन पद्धती, प्रकाशकीय तंतू, विद्युत गोंगाट.
संदर्भ : Louis E. Frenzel Jr., Principles of Electronics Communication System Fourth Edition, McGraw Hill Education.
समीक्षक : दीपलक्ष्मी नितुरे