कोल्लॉदी, कार्लो : ( २४ नोव्हेंबर १८२६ – २६ आक्टोबर १८९० ). इटालियन बालसाहित्यकार आणि पत्रकार. त्यांचे खरे नाव कार्लो लोरेनत्सीनी होते. परंतु त्यांचा बालपणीचा बराच काळ कोलादी या त्यांच्या आईच्या गावी गेला म्हणून त्यांनी ते टोपण नाव घेतले. सुरुवातीला इटालियन स्वातंत्र्ययुद्धात सन १८४८ आणि सन १८६० मध्ये कोल्लॉदी, कार्लो यांनी टस्कन आर्मीमध्ये स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम केले. त्यांना राजकीय घटनांमध्ये रुची होती. सन १८५३ मध्ये त्यांनी इल लॅम्पिऑन नावाचे वृत्तपत्र चालवले. सन १८५४ मध्ये दुसरे वृत्तपत्र ला स्काराम्युशिया प्रकाशित केले.

कार्लोची पहिली प्रकाशने त्याच्या नियतकालिकातून झाली. त्यानंतर सन १८५६ मध्ये ग्ली अमीसी दी कासा आणि पॅराॅडिक गाईड बुक अन् रोमांन्झो इन वैपुर ही नाटके प्रकाशित केली. सन १८६० मध्ये त्यांचे इल सिग्नर अल्बेरी हा रॅगिओन या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. ज्यामध्ये इटली बाबतचा त्यांचा राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोन दिसून येतो. या पुस्तकापासूनच त्यांनी कोल्लॉदी हे टोपण नाव वापरायला सुरुवात केली. त्याची कीर्ती मुख्यत: त्याच्या द स्टोरी ऑफ अ पपिट, (इं.भा. १८९२) ह्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकावरच अधिष्ठित आहे.

त्यांनी मॅचिएट, ओची ई नासी, स्टोरी अल्लिग्रे यासह विविध कथाव्यंगचित्रे तयार केली त्यानंतर ते बालसाहित्याकडे वळले. प्रथम त्यांनी फ्रेंच परिकथा इटालियन भाषेत रूपांतरित केल्या. उदाहरणार्थ चाल्स पेरॉल्टच्या रॅकोन्टी डेल, जियानेटिनो, मिनोझोलो, आणि इल वायजगीओ अशा काही कथा प्रसिद्ध झाल्या.

सन १८८० मध्ये त्यांनी स्टोरिया डाय उन बुराटिनो व स्टोरी फ असे मेरिनेट या कथा लिहिण्यास सुरुवात केली. यातील कथा पहिल्या इटालियन वृत्तपत्रात जे वृत्तपत्र बालकांसाठी होते, त्यात दर आठवड्याला प्रकाशित होत होत्या.ज्यांना ले ॲव्हेंचर डाय पिनाचिओ असेही म्हणतात. या कथा सर्वांना आवडल्या. एक कळसूत्री बाहुला जिवंत मुलगा होऊ इच्छितो, त्या बाहुल्याची ही कथा आहे. जगातील अनेक भाषेत ती अनुवादित झाली आहे. यावरच डिस्नेने पिनोचिओ हा चित्रपट तयार केला (१९३९). जो डिस्नेच्या आत्तापर्यंत बनवलेल्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो.

कोल्लॉदी, कार्लो यांचे फोरेन्स मध्ये अचानक निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ कार्लो कोल्लॉदी नॅशनल फाउंडेशनची स्थापना शिक्षणास व कार्लो लोरेन्झिनीच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी केली गेली. त्यांचे स्मारक म्हणून इटलीमध्ये पार्क ऑफ पिनाचिओ उभारण्यात आले असून त्यात पिनाचिओ मधील दृश्ये भीत्तिचित्रांकित केली आहेत. जी पर्यटकांचे आकर्षण केंद्र बिंदू आहेत.

संदर्भ :