देवसरे, हरि कृष्ण  : (९ मार्च १९३८ – १४ नोव्हें २०१३). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध हिंदी बालसाहित्यिक आणि संपादक. काव्यसंग्रह, कथा, नाटक, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारात त्याचे ३०० पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील नागोद येथे झाला. बालसाहित्यात त्यांनी हिंदी साहित्यात पहिली आचार्य पदवी प्राप्त केली होती.

ज्या कालखंडामध्ये बालसाहित्यप्रती एक परात्मता साहित्यिकांमध्ये विद्यमान होती. त्या काळात हरिकृष्ण देवसरे यांनी ठरवून बालसाहित्यप्रती आपली बांधिलकी जपून बालसाहित्य लेखनात सुरुवात केली होती.

देवसरे यांचे साहित्य : बालसाहित्यडाकू का बेटा, आल्हा उदल, मील के पहले पत्थर, प्रथम दीपस्तंभ, दुसरे ग्रहो के गुप्तचर, मंगलग्रह के राजू, उडती तश्तरियाँ, आओ चंदा के देश चले, स्वान यात्रा, लावेती, घना जंगल डॉट कॉम आणि इतर असे विपुल प्रमाणात त्यांनी साहित्याची निर्मिती केली.

बालसाहित्यामधील परिकथाची जादूई दुनिया, राजा राणीची भव्यात्मकता या पलीकडे जाऊन त्यांनी बालसाहित्यात वैज्ञानिकता आणि वास्तविकता आणि मनोविकासास आधारभूत अशा बाबींचे लेखन करून बालसाहित्य अधिक समृद्ध केले. त्यांनी बालसाहित्यातील स्वच्छंदतावादाला टाळले. परिकथामधील जादूई वास्तवाकडे त्यांनी जीवनातील आश्वासकता म्हणून पाहिले. काही झाले तरी राक्षसाला नष्ट करता येते ही विलक्षण भावना परिकथामधून मांडायला हवी असा त्यांचा आशावादी दृष्टिकोन होता.

बालसाहित्यकार सन्मान, उत्तरप्रदेश प्रदेशच्या हिंदी संस्थानचा बालसाहित्य पुरस्कार, किर्ती सन्मान (२००१), हिंदी अकादमी चा बालसाहित्य पुरस्कार (२००४), साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार (२०११) इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

संदर्भ : डोमडिया डी.एम., मेहता, शैलेश, हिंदी साहित्य का विश्वकोश, नवी दिल्ली, २०१७.