अवचट, अनिल : (जन्म.२६ ऑगस्ट १९४४).मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार. जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे. वडील ओतुर येथे वास्तव्य करीत असल्याने त्यांचे  आठवीपर्यंतचे शिक्षण ओतुरलाच झाले. आठ भावंडात ते  सर्वात मोठे असल्याने त्यांनी डॉक्टर व्हावे ही व‍डिलांची तीव्र इच्छा होती. गावात राहून हे जमणं कठीण म्हणून वडिलांनी त्यांना पुण्याच्या मॉर्डन हायस्कूलमध्ये, बोर्डिंगमध्ये शिक्षणासाठी ठेवले.१९५९ मध्ये एस .एस.सी. झाल्यावर फर्ग्युसन कॉलेज (पुणे) मधून ते इंटर आणि पुण्याच्याच बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम्.बी.बी.एस. झाले. याच कॉलेजमधील त्यांची मैत्रीण सुनंदा हिचेसोबत त्यांचे लग्न झाले.

समाजकार्याकडे कल असल्याने वैद्यकीय व्यवसाय न करता त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला. सामाजिक क्षेत्रातील अनुभवाशी निगडीत अशा प्रकारचे लेखन साधना साप्ताहिकातील वेध या सदरातून त्यांनी केले . साधनापुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे संपादनही त्यांनी केले.युक्रांदला अर्पण केलेले पूर्णिया हे बिहारच्या समाजदर्शनाविषयीचे त्यांचे पहिले पुस्तक १९६९ मध्ये प्रकाशित झाले. एका समाजवादी निष्ठेच्या तरुणाची, प्रतिकारशून्य गुलामगिरीविषयीची प्रतिक्रिया यात व्यक्त झाली आहे.

 

वेध (१९७४), हमीद (१९७७),अंधेरनगरी, निपाणी (१९७८),छेद (१९७९),माणसं (१९८०),संभ्रम  (१९८१),वाघ्यामुरळी (१९८३),कोंडमारा (१९८५),गर्द (१९८५),धागे आडवे उभे (१९८६) गर्द (१९८६) धार्मिक (१९८९),स्वत:विषयी (१९९०),अमेरिका (१९९२)  कार्यरत (१९९७) ,आप्त (१९९७), छंदाविषयी (२०००) प्रश्न आणि प्रश्न (२००१), जगण्यातले काही (२००५) आणि  मजेदार ओरिगामी, पुणे हवेसे , लाकूड कोरताना ,सरलतरल ,बहर शिशिराचा ,अमेरिकेतील फॉल सीझन  इत्यादी त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. वेध मध्ये सदर लेखनातील ३६ लेख असून छेद मधील लेख वृत्तांतकथन स्वरूपाचे आहेत.ही पुस्तके  त्या त्या संदर्भातील प्रत्यक्ष पाहणीवर आधारलेली तीव्र सामाजिक भानातून लिहिलेली आहेत, तरीही ती एखाद्या कथेसारखी उत्कंठापूर्ण, वाचनीय झाली आहेत.  मोर मध्ये ललित लेख असून, अमेरिका या पुस्तकात  प्रवासवर्णनातील निरीक्षणे आहेत.स्वत:विषयी , आप्त , छंदाविषयी,शिकविले ज्यांनी यासारखी पुस्तके आत्मपर स्वरुपाची आहेत.  धागे आडवेउभे मध्ये पुण्यामुंबईच्या वेश्यावस्त्या, थिएटर कामगार, तमाशा कलावंतांचे, सांगलीच्या हळद कामगारांचे जीवन यथार्थपणे शब्दांकित केले आहे.

समाजातील दुबळ्या, उपेक्षित, दारिद्र्यात, रूढींच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्य माणसाच्या, अगतिक आयुष्याची ओळख करून देणारे, वेगळ्या विषयांना हात घालणारे लेखन अवचट यांनी केले. दुष्काळग्रस्त माणसे, झोपडपट्टीतील माणसे, भटक्या जमातीची माणसे, विडी कामगारांचे अंधारमय शोषित जीवन या साऱ्यांचं विलक्षण दाहक दर्शन त्यांनी माणसं मधून घडविले आहे.भोवतालच्या घटनांकडे, वृत्तीप्रवृत्तीकडे बघण्याची चौकस, शोधक नजर, उत्कट सामाजिक जाणीव, पांढरपेशा, बुद्धीजीवी वर्गाच्या दांभिकपणाविषयीची चीड, त्यांच्या लेखनातून वेळोवेळी नेमकेपणाने व्यक्त झालेली दिसते. या सर्वांमागे समाजपरिवर्तनाची आस जाणवते.अवचटांचा जीवनविषयक दृष्टिकोन गंभीर, बांधिलकी हे मूल्य मानणारा आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनातून एक सखोल, संवेदनशील दृष्टिकोन व्यक्त होतो. विषय गंभीर असले तरी लालित्यपूर्ण मांडणीमुळे ते वाचकप्रिय, लोकप्रिय झाले आहे. प्रथमपुरुषी आत्मनिवेदन, सूक्ष्म निरीक्षणे नोंदवीत, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे अवचटांचे ओघवते लेखन म्हणूनच वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे आहे.एकूणच महाराष्ट्रीय समाजाच्या उपेक्षित जीवनाचा वेध घेणारे मूर्तिमंत शब्दचित्र उभे करणारे, सामाजिक स्तरावरचे लेखन आणि दुसरीकडे स्वत:विषयी आत्मपर लेखन अशा दोन स्तरांवर अवचट लेखन करताना दिसतात.अनिल अवचट यांच्या लेखनाला समाजशास्त्रीयदृष्ट्या महत्व आहे.रिपोर्टाज शैलीला नवे परिमाण त्यांच्या लेखनशैलीने दिले.तसेच १९७० नंतरच्या गद्यलेखनाला देखील त्यांच्या लेखनाने नवे आयाम प्राप्त करून दिले आहेत.

ओरिगामी, लाकडातील शिल्प-कोरीव काम, फोटोग्राफी, चित्रकला  या कलांचा त्यांना छंद आहे. बासरीचा नाद आणि वाचनाचं, भ्रमंतीचं वेड आहे. गर्द या पुस्तकातून अनिल अवचट यांनी ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांच्या व्यथा जगासमोर आणल्या. हे पुस्तक लिहितांना आलेले अनुभव आणि त्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि पत्नी अनिता अवचट ह्यांच्या पुढाकाराने ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र त्यांनी चालू केले. व्यसनाधीन पुरुष, महिला, व्यसनाधीन पुरुषांच्या पत्नींसाठीचे कार्य तसेच विविध गट, कंपन्या, पोलीस दल यांचे जनजागरण यांसारखी अनेक कामे मुक्तांगणतर्फे गेल्या केली जात आहेत.

त्यांची  आयोवा विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय लेखक परिषदेमध्ये (१९८८) भारतातर्फे निवड झालेली आहे. याशिवाय त्यांना इतरही अनेक पुरस्कार लाभले आहेत ; त्यामध्ये  फाय फाउंडेशन पुरस्कार , अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार, न्या.रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७). महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार ( २००८,सृष्टीत गोष्टीत),साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार (२०१०,सृष्टीत गोष्टीत ), महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य जीवन गौरव पुरस्कार (२०१७), इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना २६ जून २०१३ रोजी राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करण्यात आला आहे.

संदर्भ : गणोरकर,प्रभा,टाकळकर उषा आणि सहकारी,संक्षिप्त मराठी वाङमयकोश (१९२०-२००३),मुंबई,२००४.