क्रोमियमचा बिडावर होणार परिणाम मूळ धातूच्या अंतर्गत रचनेवर अवलंबून आहे. मूळच्या रचनेत फेराइट असेल तर क्रोमियमचा परिणाम पर्लाइट तयार होण्यात होतो. मूळ रचनेत पर्लाइट जवळजवळ नसेल तर क्रोमियम घातल्यावर कार्बाइड तयार होऊ शकतात. २०० किंवा २६० N/Sq.mm एवढी ताणशक्ती असलेल्या बिडाचे गुणधर्म सुधारण्यासाठी ०.३० – ०.५० % क्रोमियमचा वापर करतात. त्यामुळे ताणशक्ती व कठीणपणा वाढतात. क्रोमियमचा उपयोग उष्णतारोधक ओतीव घटक (Casting) मध्येही केला जातो. उष्णतेमुळे ओतीव घटकाचे तापमान वाढून पर्लाइटचे विघटन (Decomposition) झाल्याने ओतीव घटकाच्या आकारमानात वाढ होते. बिडाचा प्राणवायूशी संयोग होण्याची क्रिया उष्णतेमुळे वाढत्या प्रमाणात होते. अशा रीतीने ऑक्साइडचे कवच तयार होते व निखळून पडते, ही क्रिया सतत चालू राहते (Oxidation and Scaling). क्रोमियमुळे पर्लाइटच्या विघटनास विरोध होतो, तसेच क्रोमियम असलेल्या बिडात तयार होणारे ऑक्साइडचे कवच निखळून पडत नाही व आतल्या धातूचे संरक्षण होते. बॉयलरचे सुटे भाग इत्यादी ओतीव घटकासाठी १ – २ % क्रोमियम असलेले बीड वापरण्यात येते. मॉलिब्डेनममुळे अंतर्गत रचनेत सूक्ष्म पर्लाइट (Fine pearlite) व बेनाइट तयार होण्यास मदत होते. त्यामुळे ताणशक्ती व कठीणपणा हे दोन्हीही वाढतात. मॉलिब्डेनम व निकेल यांचा एकत्रित परिणामही या बाबतीत चांगला दिसून येतो. ही दोन्ही मूलतत्त्वे वापरण्याचे प्रमाण ०. ५० -१.०० % इतके असते.

निकेल सर्वसाधारणपणे ०. ५० – १.०० % इतक्या प्रमाणात वापरले जाते. निकेलमुळे ग्रॅफाइट प्लेक बारीक होतात. निकेल फेराइटमध्ये विरघळते. त्यामुळे फेराइटचा कठीणपणा व ताकद वाढते. निकेलमुळे सूक्ष्म पर्लाइट तयार होते. त्यामुळे बिडाची ताकद व आघात सहन करण्याची क्षमता वाढते. तांब्याचा ग्रॅफाइट व पर्लाइट यावरील परिणाम हा निकेलसारखाच पण तीव्रतेने थोडा कमी असतो. वापरण्याचे प्रमाण गरजेनुसार ०. ५० – १.५ % इतके असते. कथिल सर्वसाधारपणे ०.०५ – ०.१० % या प्रमाणात वापरले जाते. कथिलामुळे अंतर्गत रचनेत पर्लाइट तयार होण्यास मदत होते. २०० किंवा २६० N/Sq.mm  इतकी ताणशक्ती असलेल्या बिडाचे गुणधर्म सुधारण्यासाठी कथिलाचा उपयोग केला जातो. कथिल पर्लाइटच्या विघटनास विरोध करते, त्यामुळे कथिल घातलेल्या बिडाचा उपयोग उष्णतारोधक (तापमान जास्तीतजास्त ६५०o से.) ओतकामामध्ये ओतीव घटकाचे आकारमान वाढू नये (Growth Resistant) म्हणून केला जातो.

संदर्भ : American Foundry Society (AFS) Ductile Iron Handbook, USA, 1 January 1992.

 समीक्षक : प्रवीण देशपांडे