स्वतंत्र रित्या विकसित झालेली अर्थशास्त्राची एक शाखा. एखाद्या प्रदेशातील आर्थिक हालचाली व त्यांचे विपणन एखादी व्यक्ती किंवा समाज यांच्यावर कसा परिणाम घडवून आणतात, ते ठरविणारे घटक कोणते आणि विशिष्ट जागा अथवा प्रदेशात मानवाची आर्थिक वर्तणूक का व कशी असेल, यांचा अभ्यास प्रादेशिक अर्थशास्त्रात होतो. प्रादेशिक अर्थशास्त्र म्हणजे सर्व प्रकारच्या आर्थिक क्रिया, त्यांचे ठिकाण म्हणजेच बाजार जवळीकता, केंद्रीकरण, विक्रेंद्रीकरण किंवा प्रादेशिक रचनेतील समानता, तसेच असमानता आणि का व कशाचे उत्पादन अथवा कोणत्या आर्थिक क्रिया कशामुळे घडतात, या विचारांचा गाभा आहे.
प्रादेशिक अर्थशास्त्राचे ३ पायाभूत घटक आहेत. पहिला, विशिष्ट उद्योगांची किंवा शहरांची स्थापना विशिष्ट ठिकाणी का होते, याचे स्पष्टीकरण. त्या त्या ठिकाणाचे हवामान, जमीन, जमिनीची सुपीकता इत्यादी प्राकृतिक व नैसर्गिक घटक आर्थिक क्रियांचे केंद्रीकरण स्पष्ट करतात. घटकांची अपूर्ण स्थलांतरितता विशिष्ट गोष्ट तेथेच का, याचे उत्तर देते. त्यामुळे तौलनिक फायद्यावर अवलंबून असणारे उत्पादन आणि व्यापाराचे विशेषीकरण यांच्या मुळाशी अस्थलांतरितता किंवा अवहनियता हाच घटक असतो, हे स्पष्ट होते. नैसर्गिक घटकांहूनही महत्त्वाचे दुसरे घटक म्हणजे प्रादेशिक केंद्रीकरणाचे फायदे आणि वाहतूक खर्च. अंतर आणि सोयीसुविधा नेहमी खर्चातच मांडल्या जातात. त्यामुळे स्थान ठरविण्याच्या संदर्भात या दोन परिमाणांना निश्चित महत्त्व आहे. वस्तू उत्पादित करण्याकरिता लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च, उत्पादनप्रक्रियेत त्याच्या वजनाचा होणारा ऱ्हास आणि अंतिम उत्पादन बाजाराकडे वाहून नेण्याचा खर्च यांवर तो उद्योग बाजाराजवळ स्थापन केला जाईल की, कच्च्या मालाच्या स्रोतांजवळ, ते अवलंबून असेल. वजन घटणाऱ्या वस्तुंचा उद्योग कच्च्या मालाच्या स्रोतांजवळ असेल आणि उलटपक्षी वजन वाढविणाऱ्या वस्तुंच्या उद्योगाचे स्थान बाजारपेठेजवळ असेल. प्रादेशिक किंवा स्थानिक केंद्रीकरणामुळे विशिष्ट उद्योगधंद्यांना प्रमाणाचे फायदे कसे मिळतात, याचबरोबर निसर्गाने देणगी म्हणून दिलेल्या घटकांचा वापर करण्यास आणि प्रादेशिक केंद्रीकरणात वाहतूक आणि माहितीयंत्रणा खर्च यांची मर्यादा कशी पडू शकते, याचाही विचार केला जातो. थोडक्यात, उत्पादन घटकांची अपूर्ण स्थलांतरितता, अपूर्ण अविभाज्यता आणि वस्तू व सेवांची अपूर्ण अवहनियता या गोष्टी प्रादेशिक अर्थशास्त्राचे पायाभूत घटक ठरतात.
सूक्ष्म अर्थशास्त्रातील किंमतसिद्धांत प्रादेशिक अर्थशास्त्रातही तितकाच महत्त्वाचा ठरतो; कारण ‘विक्रेत्याचे बाजारक्षेत्र’ हे किंमत आणि उत्पादन ठरविण्यात प्रभावी भूमिका बजावते. तसेच स्पर्धात्मक परिस्थितीने उद्योगांच्या स्थानिकीकरणाचा ढाचा/आकृतिबंध ठरविला जातो. साहजिकच अशा स्थानिकीकरणानेही काही उद्योगांचे अपस्करण घडून येते. एखाद्या विशिष्ट ठिकाणी सातत्याने वाढणारा उद्योगांचा आकृतिबंध त्या जागेचे मूल्य ठरवतो. विविध प्रदेशांतील आर्थिक हालचालींच्या जोडण्या त्या प्रदेशास एका सांघिक विभाग किंवा केंद्राचे स्वरूप प्राप्त करून देतात. अशा जोडण्या प्रतिगामी किंवा पुरोगामी स्वरूपाच्या असतात. विविध आर्थिक घडामोडींचे कार्यात्मक एकात्मीकरण हे समस्तर, विषमस्तर आणि पूरक स्वरूपाचे असते. स्थानिक वस्तुंची उपलब्धता, स्थानिक मागणी, वस्तू उपलब्धतेचा बदली परिव्यय खर्च आणि बाह्य (प्रदेशाची) मागणी यांवर उद्योगाचे स्थान ठरते.
ज्या ठिकाणी बाजारपेठेची जवळीकता असते किंवा जेथे आदानांची विपुलता असते, तेथे उद्योगसमूह पुंजक्यापुंजक्याने उद्योगधंदे विशिष्ट भागात उभे राहातात. याउलट, आपला स्पर्धक ज्या ठिकाणी गट स्थापन करतो, तेथेच आपलेही गट स्थापन करण्याकडे परस्पर आकर्षण असते. यातूनच महदासारखी साखळीपद्धतीने उद्योगाची स्थापना होते. अशा उद्योगसमूहाचे वैशिष्ट्य म्हणजे इतरांच्या उपस्थितीमुळेच प्रत्येक उद्योगघटकांस ते स्थान योग्य वाटते. उद्योगाच्या स्थानाची निवड ही स्पर्धात्मक व्यूहरचना असते. यात तीन प्रकारच्या आर्थिक बचती आढळतात. (१) वैयक्तिक उद्योग, कारखाना, दुकान अशा तत्सम एककाच्या आकाराशी निगडित फल. (२) वैयक्तिक उद्योगसंस्थेच्या आकारमानाशी निगडित फल. (३) एका विशिष्ट ठिकाणी समूहाने एकत्रितपणे चालविलेल्या आर्थिक हालचालीच्या निगडित समूहाच्या आकारमानामुळे निर्माण झालेल्या बचती.
याच्या पर्याप्त आकारमानामुळे किंवा समूहाने स्थापित झालेल्या उद्योगांचे फायदे केवळ उद्योगांनाच मिळतात असे नव्हे, तर त्यांच्याशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असणाऱ्या घटकांनाही मिळतात. विशेषतः शहरीकरणात असे फायदे केंद्रीकरणामुळे प्राप्त झाल्याचे दिसते. यासंदर्भात एकाच वेळेला विशिष्ट स्थानाकडे एकत्रित आकर्षले जाणे आणि त्याच वेळेला एकमेकांपासून काही प्रमाणात दूर ढकलले जाण्याचीही स्थिती निर्माण झालेली दिसते. यासाठी स्थलांतरित खर्च नव्हे, तर बाजारक्षेत्र व किंमतधोरण महत्त्वाचे ठरतात. जमिनीची मागणी बाजाराशी निगडित असणाऱ्या सर्व प्रक्रियांत महत्त्वाची भूमिका बजावते आणि बहुविध गोष्टींसाठी तिच्या केल्या जाणाऱ्या वापरांमुळे या मागणीत सातत्याने बदल होत असतो. केवळ आर्थिक घटकांशी निगडितच नव्हे, तर लोकांची स्थलांतरता ही बाबही जमिनीची किंमत ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
प्रादेशिक विकासात मानव किंवा श्रम हेसुद्धा भूमीइतकाच महत्त्वाचा घटक असतो. मानवाचे स्थलांतर त्या प्रदेशाचा विकास ठरवितो; कारण रोजगारातील वाढ ही उत्पन्नात वाढ घडवून आणते आणि त्यानंतरच विविध समस्तर तसेच उर्ध्वगामी एकात्मीकरणाच्या दृष्टीकोनातून उद्योगांचा विस्तार झाल्याचे आढळून येते. उत्पादन प्रक्रियेतील एक आदान म्हणून श्रमाची भूमिका हा स्थानिक आर्थिक घडामोडी आणि लोक यांच्या परस्परसंबंधातील एक महत्त्वाचा भाग आहे. याचबरोबर अंतिम वस्तू व सेवांची मागणी करणारा उपभोक्ता म्हणून, विशेषेकरून शहरी भागात निवासासाठी जागा वापरणारा ग्राहक आणि प्रदेशा प्रदेशानुसार उत्पन्नातील फरक स्पष्ट करणारा श्रम हा प्रादेशिक अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. साहजिकच, खेचल्या जाणाऱ्या किंवा रेटा देणाऱ्या घटकांमुळे होणारे स्थलांतर हा किंवा ‘साखळी पद्धतीने होणारे स्थलांतर’ हे सुध्दा प्रादेशिक अर्थशास्त्रात अभ्यासले जाते. स्थलांतराची कार्यक्षमता ही निव्वळ प्रवाहाचे ढोबळ प्रवाहाशी असलेल्या रेट्याच्या आंतरबाह्य गुणोत्तरावर अवलंबून असते. त्या श्रमाच्या गतीशीलतेचे प्रमाण अथवा त्याचा अभाव, श्रमाचे मूल्य विभेदन, पुरवठा, वेतनपातळी, कौशल्य, प्रशिक्षण आणि श्रमाची लवचिकता यांवर अवलंबून असते.
शहरांचा विकास आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याच्या दृष्टीने प्रादेशिक अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे शहररचना समजून घेण्यात महत्त्वाची ठरतात. या संदर्भात कॉन थुनेल यांचे तसेच बुर्जेस यांची प्रतिमाने विविध आर्थिक हालचालींचे शहरी विभागातील वर्गीकरण तसेच विभाजन ठरवितात. यामध्ये मुख्यत्वे शहराच्या कोणत्या भागात जमिनीचा वापर जास्तीत जास्त होत आहे, कोणत्या विशिष्ट भागामध्ये वाहतुकीच्या सोयींमुळे एका आसाभोवती शहराचा विकास-विस्तार कसा होत आहे, तसेच जवळपासच्या ठिकाणांचा विस्तार होत असतानाच काही किमान प्रमाणात त्या भागापासून विस्थापन झाल्यामुळे इतर भागांची वाढ होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर काही उपकेंद्रेही काढण्यास सुरुवात होते. उदा., मोठ्या उद्योगधंद्याची स्थापना झाल्याने क्रिडामैदाने व किरकोळ विक्री केंद्रे. आजच्या काळात शहरात भेडसावणारे प्रश्न जमिनीच्या वापरातील बदल, रहिवास, उद्योगांचे स्थानिकीकरण या सर्वांचा एकत्रित परिणाम असल्याचे दिसून येते. उद्योगाची जास्त घनता असलेल्या क्षेत्रातील पर्याप्ततेची स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या सभोवतालच्या कमी घनतेच्या क्षेत्रात आर्थिक व्यवहारांचा तसेच निवासी विभागाचा विकास होऊन उपनगरे वाढू लागतात. बुर्जेस यांच्या प्रतिमानात केंद्रीभूत घटकांच्या वाढीच्या स्फोटाने विरळ घनतेच्या प्रदेशांची वाढ होऊ लागते. वाढती लोकसंख्या, वाढते उत्पन्न आणि तंत्रज्ञानातील बदल या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून समस्तर व भिन्नस्तर आर्थिक व्यवहारांचा विकास आणि समूहाचे फायदे विविध सेवांची उपलब्धता (उदा., रिटेल ट्रेड, किरकोळ विक्री किंवा शॉपिंग सेंटर्स, मॉल्स इत्यादी) निर्माण करतात; परंतु स्थानिकीकरणाच्या संदर्भात निर्माण होणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचे प्रदूषण होय. उद्योगधंद्याच्या केंद्रीकरणाने व शहरांच्या स्थापनेमुळे निर्माण झालेले हवा, पाणी, आवाजाचे प्रदूषण, शुद्ध वातावरण हा प्रत्येकाचा हक्क मानला, तर प्रदूषणाची किंमत ही त्या वस्तू सेवेत समाविष्ट असायला हवी हा विचार स्पष्ट करतो.
एखाद्या प्रदेशाचा विकास होण्याची प्रक्रिया त्या प्रदेशातील लोक, त्यातील उद्योग आणि राष्ट्रीय स्तरावरील धोरण ठरविणारे शासनकर्ते यांच्यासाठी ही बदलाची क्रिया. यासाठी त्या प्रदेशाच्या वाढीची रचना, अभिसरण आणि एखाद्या धोरणानूसार त्या प्रदेशाचा विकास निश्चित करणे (उदा., विशेष आर्थिक केंद्रे किंवा स्मार्ट सिटी) या घटकांचा समावेश होतो. स्थानिक विकासात एकमेकांस पूरक व एकमेकांस विरुद्ध असणारे घटक किंवा समूहाच्या विकासामुळे निर्माण झालेल्या बाह्य बचतीसारखे पूरक घटक कारणीभूत ठरतात; परंतु याचबरोबर अर्थशास्त्रातील मूलभूत घटक मागणी-पुरवठ्याच्या संदर्भात आयात-निर्यातीचाही विचार होतो. निर्यात हा त्या प्रदेशाचा विकास ठरविणारा घटक असतो. भांडवलाचे स्थलांतरण हे श्रमाच्या स्थलांतरणाशी निगडित असते. एखाद्या प्रदेशातील आर्थिक बदल हा त्या प्रदेशाशी संबंधित बाह्य घटक आणि त्यांचे धोरण तसेच बाह्य घटकांचा त्या प्रदेशावर असणारा प्रभाव यांवर अवलंबून असतो. प्रादेशिक आर्थिक धोरणाची उद्दिष्टे वैयक्तिक कल्याणातील वाढ, संधीची उपलब्धता, समानता आणि सामाजिक ऐक्य अशीच असतात. म्हणूनच आर्थिक धोरण, दरडोई उत्पन्नाची वाढ साधणे, पूर्ण रोजगारस्थिती स्थापन करणे, उत्पन्नाची ग्वाही देणे, विविध प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी पर्याय देणे यांवर ती आधारलेली असतात. असे असले, तरी प्रादेशिक अर्थशास्त्र विकासात ४ महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक अर्थशास्त्राचा संदर्भ मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय व्यापारी संघ, व्यापार संघटना किंवा व्यापारी गटांच्या निर्मितीत दिसून येतो. यामधून निर्माण झालेल्या डंकेल प्रस्तावाचे रूपांतर व्यापारनियमन करणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेत झाले, तर दुसऱ्या बाजूला रोमच्या कराराने युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामुळे केवळ व्यापाराचे एकत्रीकरणच नव्हे, तर एकात्मिक आर्थिक रचनेचा आकृतिबंध मांडला. दुसरीकडे सार्क, एशियन, उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार (नाफ्टा) यांसारखे संघही आज प्रत्येक देशाच्या विशेषीकरणाचे फायदे घेऊन व्यापार बळकटी आणण्याचे प्रयत्न करताना दिसतात. अर्थात यातून निर्माण होणारे चलनाच्या अवमूल्यनासारखे आशियायी वित्तीय संकट किंवा अंतर्गत अस्थैर्याने बाहेर पडण्याचे (ब्रेक्झिट) प्रश्नही नव्याने निर्माण होताना दिसतात.
समीक्षक : आर. एस. देशपांडे