तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे स्थित आहे.
स्थान आणि विस्तार : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आहे. महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईच्या उत्तरेस १०० किमी. अंतरावर तारापूर प्रकल्प स्थित आहे. या प्रकल्पाची समुद्रसपाटीपासून उंची ५.४७ मीटर इतकी आहे. अक्षांश १९.५० उत्तर आणि रेखांश ७२.३९ पूर्व हा प्रकल्प स्थापित आहे.
मुंबई-अहमदाबाद जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या रुंदमापी (Broadgaze) महामार्गावरील बोईसर हे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून (टॅप्स) सर्वांत जवळचे (म्हणजेच १५ मिनिटांच्या अंतरावरील) रेल्वेस्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग-८ येथून चिल्हार-बोईसर-पाचमार्ग-टॅप्स तसेच चारोटी-वाणगाव-चिंचणी-पाचमार्ग-टॅप्स यामार्गे प्रकल्पस्थानी जाता येते.
पार्श्वभूमी : आशिया खंडातील व भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हणजेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा दिनांक २८ ऑक्टोबर १९६९ रोजी स्थापन करण्यात आला. सदर प्रकल्पात दोन उकळत्या पाण्याच्या अणुभट्ट्या मे. जनरल इलेक्ट्रिक कंपनी (GEC), यूएसए या कंपनीमार्फत बांधल्या गेल्या.
प्रकल्प विभागणी : तारापूर अणुऊर्जा क्षेत्रामध्ये चार ऊर्जा स्थानके (Power stations) आहेत. प्रत्येक विभागाला तारापूर अणुऊर्जा स्थानक क्रमांकाने (Tarapur Atomic Power Station, TAPS) निर्देशित केलेले आहे. त्यानुसार टॅप्स-१, टॅप्स-२, टॅप्स-३ आणि टॅप्स-४ असे चार विभाग आहेत.
टॅप्स – १ आणि २ (Taps – 1, 2) हे विभाग उत्कलित जलीय अणुभट्टी (Boiling Water Reactor, BWR) या प्रकारातील आहेत. या प्रत्येक भट्टीची क्षमता २१० मेगावॅट इतकी होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती घटवून १६० मेगावॅट इतकी करण्यात आली. म्हणजेच टॅप्स-१ मधून १६० मेगावॅट आणि टॅप्स-२ मधून १६० मेगावॅट अशी एकूण ३२० मेगावॅट वीजनिर्मिती दर दिवसाला केली जाते.
त्यानंतर सन २००५-०६ मध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील सर्वांत अद्ययावत उकळत्या पाण्याच्या भट्ट्या बसवण्यात आल्या. त्याला टॅप्स – ३ आणि ४ (Taps – 3, 4) असे म्हणतात. टॅप्स – ३ आणि ४ हे विभाग दाबनियंत्रित जड जलीय अणुभट्टी (Pressurized heavy-water reactor, PHWR) या प्रकारातील आहेत. या विभागांची प्रत्येकी क्षमता ५४० मेगावॅट इतकी आहे. त्यामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात चार विभागांची मिळून एकूण १,४०० मेगावॅट इतकी वीज दररोज उत्पादित केली जाते. ही उत्पादन क्षमता भारताच्या एकूण अणुऊर्जेच्या एक तृतीयांश इतकी आहे.
उत्पादन क्षमता : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील टॅप्स – १ आणि २ मधून ७६ लाख एकक (Unit) वीज उत्पादन केले जाते. टॅप्स – ३ आणि ४ मधून २ करोड ६० लाख एकक वीज उत्पादन केले जाते. म्हणजेच तारापूर प्रकल्पातून एकूण ३ करोड ३६ लाख एकक वीज उत्पादन केले जाते.
राष्ट्रीय सुरक्षा आणि नियामक चौकट : अणुऊर्जा विभागासाठी एकूण धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था म्हणजे अणुऊर्जा आयोग (Atomic Energy Commission, AEC) होय. ही संस्था प्रकल्पाबाबतचे आण्विक धोरण देखील ठरवते. अणुऊर्जा आयोगाच्या मार्गदर्शनाखाली अणुऊर्जा नियामक मंच (Atomic Energy Regulatory Board, AERB) प्रकल्पाची देखरेख करतो.
अणुऊर्जा कायद्यात नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने अणुऊर्जा विभागातील तसेच त्याबाहेरील आस्थापनांसाठी नियामक व सुरक्षा कार्ये पार पाडणे बंधनकारक आहे, याच्या अंमलबजावणीचे कार्य अणुऊर्जा नियामक मंच करतो.
पहा : अणुऊर्जा कायदा; उत्कलित जलीय अणुभट्टी; दाबनियंत्रित जड जलीय अणुभट्टी.