व्हिट्रिऑल ही रासायनिक संयुगांच्या केवळ एका विशिष्ट गटासाठी वापरली जाणारी सामायिक संज्ञा आहे. या गटात सजल सल्फेटे (Hydrated sulphates) यांचा समावेश होतो. काही निवडक व्हिट्रिऑल संयुगांचे विवरण पुढीलप्रमाणे :

व्हिट्रिऑलचे प्रचलित नाव रासायनिक नाव रासायनिक सूत्र
निळे किंवा रोमन व्हिट्रिऑल क्युप्रिक सल्फेट CuSO4. ५ H2O
हिरवे व्हिट्रिऑल फेरस सल्फेट FeSO4. ७ H2O
पांढरे व्हिट्रिऑल झिंक सल्फेट ZnSO4. ७ H2O
लाल व्हिट्रिऑल कोबाल्ट सल्फेट CoSO4. ७ H2O

 

‘व्हिट्रिऑल’ ही संज्ञा ‘व्हिट्रिओलस’ (vitriolus) या लॅटिन शब्दापासून तयार झाली. या शब्दाचा अर्थ ‘लहान काच’ असा होतो. काही खाणींमध्ये खडकांतून झिरपणाऱ्या पाण्यात वरील संयुगे विरघळलेली असतात. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्या जागी संबंधित संयुगांचे रंगीत काचेच्या तुकड्यांसारखे दिसणारे स्फटिक तयार होतात.

व्हिट्रिऑल संयुगांच्या उत्ताप विच्छेदनातून (Pyrolysis) जो दाट द्रवपदार्थ मिळतो, ते अतिसंहत (Highly concentrated) आणि अतिक्षरणकारक (Highly corrosive) सल्फ्यूरिक अम्ल असते. यामुळे सल्फ्यूरिक अम्लाला ‘व्हिट्रिऑलचे तेल’ (Oil of vitriol) असे पूर्वी संबोधले जाई. नंतर सल्फ्यूरिक अम्लाला नुसतेच ‘व्हिट्रिऑल’ असे लघुनाम मिळाले, जे आजही प्रचलित आहे.

व्हिट्रिऑल ही संज्ञा आता जवळपास कालबाह्य झाली आहे, परंतु व्हिट्रिऑल संयुगे अजूनही विविध औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे घटक पदार्थ म्हणून वापरली जातात.

पहा : कोबाल्ट संयुगे; जस्त संयुगे; मोरचूद; सल्फ्यूरिक अम्ल.

संदर्भ :

https://en.wikipedia.org/wiki/Vitriol#:~:text=Vitriol%20is%20an%20obsolete%20alchemical,hydrated%20copper(II)%20sulf

ate.

https://www.britannica.com/science/vitriol


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.