सर्वांसाठी उपलब्ध असणारी वस्तू. सार्वजनिक वस्तू कोणा एकाची मक्तेदारी नसून ती सर्वांसाठी समप्रमाणात असते. एकाने वापरली म्हणून दुसऱ्याला वापरता येत नाही, असे या वस्तुंच्या बाबतीत होत नाही. ती कोणाचीही खाजगी मालमत्ता नसून ती वस्तू वापरताना स्पर्धा होत नाही. ज्या वस्तुवर कोणताही माणूस आपला मालकी हक्क सांगू शकत नाही, अशी वस्तू म्हणजे सार्वजनिक वस्तू होय. सार्वजनिक वस्तू ही नैसर्गिक आणि शासनकृत असते.

एखाद्या उपभोक्त्याने एखाद्या सार्वजनिक वस्तुचा उपभोग घेतला, तरी ती वस्तू संपत नाही किंवा कमी होत नाही. म्हणजेच दुसरा उपभोक्ता देखील त्या वस्तुचा उपभोग घेऊ शकतो. या वस्तू सर्वांसाठी उपलब्ध असतात. सामाजिक हितासाठी ज्या वस्तू शासनाकडून समाजाला मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, त्यालाही सार्वजनिक वस्तू म्हणता येईल. उदा., शिक्षण व मुलभूत सेवा-सुविधा.

सार्वजनिक वस्तू-सेवांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा, अग्निशमन सेवा, दीपगृह, पाणी, स्वच्छ हवा व पर्यावरण, रस्ते, आरोग्य सेवा, माहिती व ज्ञान (अधिकृत आकडेवारी, संगणकीय प्रणाली विकसन, लेखकत्व इत्यादी) इत्यादी समाविष्ट होतात; मात्र यांपैकी काही सेवा-सुविधा काही मर्यादेपर्यंतच सर्वांसाठी उपलब्ध असतात. उदा., शिक्षण. ज्या वस्तू जगभर सर्वत्र उपलब्ध असतात, त्यांना वैश्विक वस्तू असे देखील म्हटले जाते. सार्वजनिक वस्तुंचा अतिरेकी वापर झाल्याने काही बाबतींत बाह्य बेबचती निर्माण होऊ शकतात. त्याचा सर्वांवरच वाईट परिणाम होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणून वायुप्रदूषण, वाहतूक कोंडी इत्यादी सांगता येईल.

सार्वजनिक वस्तुंचा दुसरा छुपा अर्थ म्हणजे वस्तू फुकट किंवा मोफत मिळावी, असाही घेतला जातो. त्यामुळे सहज उपलब्ध असलेली वस्तू मोफत मिळाल्यामुळे तिचा अतिवापर होऊन तिचे प्रदूषण वाढल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे काही वस्तुंचे उत्पादन कमी प्रमाणात झाले की, काही प्रमाणात त्याच्या वापरावर निर्बंध घालावे लागतात किंवा त्याचा वापर करण्यासाठी थोडीफार किंमत मोजावी लागते. कालांतराने अशा वस्तू संमिश्र वस्तू किंवा खाजगी वस्तू म्हणून गणल्या जातात. हे निर्बंध म्हणजे हक्काधिकार (कॉपीराईट) घेणे, पेटंट मिळविणे किंवा शुल्क आकारणे होय.

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पॉल सॅम्युएलसन यांनी सर्वप्रथम सार्वजनिक वस्तुंबाबतची संकल्पना मांडली आहे. त्यांनी सार्वजनिक वस्तू म्हणजे सामूहिक उपभोगाची वस्तू असेही म्हटले आहे. सामूहिक उपभोग म्हणताना सर्वांना एकाच वेळी सारखेच समाधान देणारी वस्तू, असे त्यांना अपेक्षित आहे. त्यांच्या मतानुसार वस्तुचा उपभोग घेताना कोणतीही व कोणाशीही स्पर्धा होत नसून या वस्तुचा उपभोग घेताना कोणालाही वगळावे किंवा बहिष्कृत करावे लागत नाही, हे दोन गुण येथे स्पष्ट होतात.

सार्वजनिक वस्तुच्या विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे खाजगी वस्तू होय. खाजगी वस्तुंमध्ये सार्वजनिक वस्तुंप्रमाणे गुण आढळत नाहीत. उदा., खाण्याचे पदार्थ. खाणे ही खाजगी बाब असून एकाने एखादी वस्तू खाल्ली की, तीच वस्तू दुसरा व्यक्ती खाऊ शकत नाही. काही वस्तू अशा असतात की, त्या स्पर्धात्मक परंतू सर्वसमावेशक असतात. त्यांना सामान्य जोड संसाधन म्हटले जाते. उदा., समुद्रातील मासेमारी. जागतिक पातळीवर समुद्रातील मासेमारी कोणीही करू शकतात. त्यावर कोणीही निर्बंध घालू शकत नाही; परंतु मासेमारीमुळे माशांचा साठा कालांतराणे कमीकमी होऊ शकतो, त्यामुळे अशी मासेमारी स्पर्धात्मक होते.

सर्वसमावेशक नसलेले सर्वसमावेशक
स्पर्धात्मक खाजगी वस्तू : अन्न, वस्त्र, सामान्य जोड संसाधन : मासेमारी, जंगलतोड, खाणसंपत्ती इत्यादी.
स्पर्धा नसलेले संमिश्र वस्तू : खाजगी बागा, चित्रपटगृह, सॅटेलाईट टेलिव्हिजन (चॅनल्स) इत्यादी. सार्वजनिक वस्तू : हवा, सार्वजनिक बागा, रस्ते, राष्ट्रीय सुरक्षा, शिक्षण, आरोग्य सेवा इत्यादी.

कायद्याची अंमलबजावणी, रस्ते, सार्वजनिक वाचनालये, संग्रहालये, शिक्षण इत्यादी वस्तू व सेवा या सार्वजनिक वस्तू असल्याचा समज आहे; परंतु या सर्व वस्तू वापरताना बहिष्कृतता किंवा इतरांना वगळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना भासात्मक सार्वजनिक वस्तू असेही म्हणतात; कारण एक बहिष्कृतता वगळता सार्वजनिक वस्तुंमधील बाकी सर्व वैशिष्ट्ये त्यांच्यामध्ये आहेत.

कोणत्याही वस्तू व सेवेच्या उपभोगापासून कोणालाही वंचित ठेवणे अशक्य आहे, असा सर्वसमावेशक या शब्दाचा अर्थ आहे; परंतु अनेक वस्तू व सेवा अशा आहेत की, ज्यांची विभागणी नेमकी खाजगी की, सार्वजनिक अशी करणे कठीण आहे. उदा., एखाद्या माणसाने कविता लिहली, तर ती कोणीही वाचू शकतो व त्याचा आनंद घेऊ शकतो. ती कविता वाचली गेल्यामुळे तिची किंमत कमी होणार नाही किंवा ती कविता नष्टही होणार नाही. म्हणजे एका अर्थाने ती कविता ही अस्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक हा गुण असलेली वस्तू आहे; परंतु तीच कविता त्या कवीची खाजगी वस्तुसुद्धा असल्यामुळे ती छापायची की, नाही याबाबतचा निर्णय हा त्याचा खाजगी असणार आहे. त्या कवीने जर ती कविता छापलीच नाही, तर ती सार्वजनिक होणारच नाही. त्याच प्रमाणे संख्याशास्त्रीय माहितीदेखील सर्वांसाठी उपलब्ध असू शकते; परंतु ती आकडेवारी सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी लागते. सर्वाधिकार आणि पेटंटच्या बाबतीतही काही प्रमाणात या सेवा सार्वजनिक नसतात.

दीपगृह हे सार्वजनिक वस्तुचे अगदी सर्वसाधारण उदाहरण म्हणून सांगितले जाते; कारण एका जहाजाने दीपगृहाच्या सेवा वापरल्या म्हणून दुसरे जहाज त्या वापरू शकत नाही, असे होत नाही; परंतु काही दीपगृहे सेवा देण्याची फी आकारू शकतात किंवा विशिष्ट जहाजाना प्रवेश नाकारू शकतात. बदलत्या काळानुसार जर नवीन संगणकीय प्रणाली अस्तित्वात आली, तर सार्वजनिक वस्तुंच्या स्थितीत काळानुसार बदल होऊ शकतो.

समीक्षक : राजस परचुरे