हॉएल, फ्रेड : ( २४ जून १९१५ – २० ऑगस्ट २००१ )
फ्रेड हॉएल यांचा जन्म इंग्लंडमधील गिल्स्टेड या गावी झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण बिंग्ले येथे झाले, तर उच्च शिक्षण केंब्रिज येथे झाले. त्यासाठी त्यांनी गणित हा विषय घेतला होता. त्या सुमारास दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. रडारबाबत संशोधन करण्यासाठी ब्रिटनतर्फे एक मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. हॉएल यांनी त्या प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावली. महायुद्ध संपल्यावर ते केंब्रिजमध्ये परतले आणि १९७३ पर्यंत त्यांनी तेथे काम केले. त्यांची खगोलशास्त्र आणि प्रायोगिक तत्त्वज्ञान या विषयांचे प्लुमिअन प्राध्यापक या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्ती झाली. पुढच्या काळात केंब्रिजमध्ये हॉएल यांनी सैद्धांतिक खगोलशास्त्र संस्थेची स्थापना केली आणि तिचे ते पहिले संचालक बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अतिशय वेगाने प्रगती केली आणि लवकरच ती सैद्धांतिक खगोलशास्त्र या विषयातील जगातील अग्रगण्य संस्था बनली. केंब्रिजमधून बाहेर पडल्यानंतर हॉएल यांनी लोकार्थी विज्ञानासाठी अनेक पुस्तके लिहिली आणि जगातील अनेक देशांमध्ये भाषणे दिली.
हॉएल यांचे प्रमुख संशोधन ताऱ्यांबाबत आहे. ताऱ्यांच्या गाभ्यामध्ये हायड्रोजनचे दोन अणू एकत्र येऊन त्यापासून हेलियम हे मूलद्रव्य बनते. त्यानंतर हेलियमचे रूपांतर अधिक जड मूलद्रव्यांमध्ये कोणत्या अणुकेंद्रीय प्रक्रियांद्वारे होते याबाबत त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. या जड मूलद्रव्यांमध्ये लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असायला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले. पुढच्या काळात ताऱ्यांची जी निरीक्षणे झाली त्यांमध्ये त्यांच्या या मताला पुष्टी मिळाली. परंतु कार्बन आणि लोह यांच्या दरम्यान असलेली मूलद्रव्ये तयार होण्यासाठी तोपर्यंत ज्ञात असलेल्या प्रक्रियेपेक्षा वेगळ्या प्रकारच्या अणुकेंद्रीय प्रक्रिया आवश्यक आहेत असे प्रतिपादन त्यांनी १९५४ साली प्रसिद्ध केलेल्या एका शोध लेखात केले. अशा प्रक्रिया पूर्णपणे उत्क्रांत झालेल्या ताऱ्यांमध्ये घडून येतात असे मत हॉएल यांनी मांडले. अतिनवताऱ्याचा स्फोट होण्यापूर्वी या प्रक्रिया होतात असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी इतर तीन सहकाऱ्यांबरोबर आणखी एक शोधलेख प्रसिद्ध केला. अणुकेंद्रीय प्रक्रिया या विषयात हा लेख मूलभूत स्वरूपाचा मानला जातो. हा शोधलेख त्यांनी विल्यम फाऊलर, मार्गारेट बर्बिज आणि जेफ्री बर्बीज यांच्या समवेत लिहिलेला होता. या चारही लेखकांच्या आडनावातील आद्याक्षरे घेऊन या शोधलेखाला B2FH असे नाव पडले आणि त्या नावाने तो अतिशय प्रसिद्ध पावला.
फ्रेड हॉएल यांनी विश्वरचनाशास्त्र या विषयात केलेले संशोधनही खूप महत्त्वाचे आहे. थॉमस गोल्ड आणि हरमान बाँडी या दोन शास्त्रज्ञांसह त्यांनी विश्वासाठीचा ‘स्थिर स्थिती सिद्धांत’ मांडला. या सिद्धांतानुसार, विश्वाची निर्मिती महास्फोटातून झालेली नाही. म्हणजे विश्वाला प्रारंभ नाही. ते चिरंतन आहे, परंतु ते प्रसरणशील आहे. तसेच विश्वाचे प्रसरण होत असताना दोन दीर्घिकांच्यामध्ये नवीन द्रव्याची निर्मिती होते असेही हा सिद्धांत सांगतो. परंतु हा सिद्धांत अनेक संशोधकांना मान्य झाला नाही आणि त्यांनी अनेक आक्षेप घेतले. त्यातील काही मुद्दे विचारात घेऊन हॉएल यांनी सुधारित सिद्धांत मांडला आणि त्याला ‘अर्ध-स्थिर स्थिती सिद्धांत’ असे नाव दिले. परंतु तरीही जगभरातील बहुसंख्य शास्त्रज्ञ त्यांच्याशी सहमत झाले नाहीत. विश्वरचनाशास्त्रातील अनेक निरीक्षणे महास्फोटाच्या सिद्धांताला पुष्टी देणारी म्हणजे हॉएल यांच्या प्रतिपादनाच्या विरोधी जाणारी अशी होती.
हॉएल यांनी जयंत नारळीकर यांच्या समवेत १९६० च्या दशकात एक नवीन गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला. आइनस्टाइन यांनी मांडलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धांतात माख तत्त्वाचा (Mach Principle) समावेश करून हा सिद्धांत मांडण्यात आला होता.
पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याबाबतही हॉएल यांनी संशोधन केले आहे. जीवसृष्टी अंतराळात जन्माला आली आणि धूमकेतूच्या माध्यमातून पृथ्वीवर आली असे प्रतिपादन त्यांनी विक्रमसिंघे यांच्या समवेत केले. पृथ्वीवर आलेल्या काही रोगांच्या प्रचंड साथी या धूमकेतूंनी पृथ्वीवर आणलेल्या विषाणूंमुळे निर्माण झाल्या असे त्यांचे मत होते. मात्र हे मत जवळपास सर्व शास्त्रज्ञांनी फेटाळून लावले होते.
सर्वसामान्य लोकांपर्यंत विज्ञान पोहचावे यासाठी हॉएल यांनी खूप कष्ट घेतले होते. त्यांनी बी.बी.सी. वरून सोप्या भाषेत अनेक भाषणे दिली आणि अनेक पुस्तकांचे लेखनही केले. त्यांनी विज्ञान-काल्पनिका असलेली १९ पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी A for Andromeda; The Black cloud; Rockets in Ursa Major ही पुस्तके विशेष गाजली. त्यांनी तांत्रिक विषयांवर २७ पुस्तकांचे लेखन केले आहे. यातील काही पुस्तके अन्य लेखकांच्या समवेत लिहिली आहेत.
हॉएल यांना प्रदान करण्यात आलेले काही सन्मान असे: रॉयल सोसायटीचे फेलो, रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक आणि अध्यक्षपद, नाईटहूड, रॉयल पदक, रॉयल स्वीडिश अकादमीचे क्रॉफोर्ड (Crawford) पारितोषिक. याशिवाय एका लघुग्रहाला हॉएल यांचे नाव (८०७७ हॉएल) देण्यात आले आहे.
समीक्षक : हेमचंद्र प्रधान