प्रा. हेमचंद्र चिंतामणी प्रधान : (३० जून १९४६ — २६ डिसेंबर २०२४). भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ठाणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात झाले असून ते एस.एस.सी.परीक्षेत बोर्डात पहिले आले होते (१९६१). नंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून इंटर, बी.एस्सी. आणि एम.एस्सी. या सर्व पदव्या प्रथम येऊनच संपादन केल्यात. नंतर त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्यूसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम.आय.टी.) येथून सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर ते मॅकमास्टर आणि व्हिस्कॉन्सीन विद्यापीठात संशोधन व अध्यापनकरिता गेले.
प्रा. प्रधान भारतात परतल्यावर रुईया महाविद्यालयात अध्यापन केले (१९७८—८०). पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातील वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर येथे अध्यापन केले (१९८०— ८८). विज्ञान शिक्षणातील संशोधनाकरिता प्रा. उदगावकरांच्या पुढाकाराने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चतर्फे स्थापन करण्यात आलेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात रुजू झाले (१९८८). पुढे तेथेच ते संचालक झालेत(२००८—११). सेवानिवृत्तीनंतर त्यांना त्याच संस्थेत राजा रामण्णा प्राध्यापक पद देण्यात आले. मुंबई विद्यापीठात डॉ. अनिल काकोडकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स हा विभागात त्यांना सेवानिवृत्तीनंतर अध्यापन केले (२०११—२२).
प्रा. प्रधान यांनी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र या संस्थेत प्रा. वि. गो. कुलकर्णी आणि प्रा. भा. मा. उदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारचे शैक्षणिक प्रयोग केले. त्यांनी अणुकेंद्रकाची रचना, अणुकेंद्रकीय अभिक्रिया, भौतिकशास्त्रातील संशोधन, गणितातील संशोधन आणि विज्ञान संशोधन यात विशेष काम केले. विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि गणितातील संकल्पना स्पष्ट करणे, भौतिकीची प्रयोगशाळा विकसित करणे, भौतिकीविषय घेऊन पदवी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयातील क्षमता वाढविणे, वेगवेगळ्या प्रशिक्षणांची योजना आखणे अशा विषयात त्यांनी रस घेतला. त्यांनी भौतिकी इतकाच गणितातही रस असल्याने त्याच केंद्रात गणिताची प्रयोगशाळा सुरू केली. त्यांच्या कारकीर्दीत या संस्थेने अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य निर्माण केले. या संस्थेत प्रा. कुलकर्णी यांच्यानंतर प्रा. अरविंद कुमार यांनी भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, खगोलशास्त्र याविज्ञान विषयातील जागतिक ऑलिम्पियाड स्पर्धात भाग घ्यायला सुरुवात केली. त्यात त्यांनी गुणात्मक वाढ केली.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या अनेक समित्यांवर प्रा. प्रधान यांनी काम केले. ते विज्ञान आणि खगोलशास्त्राच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष होते (२००८—११). ही समिती ऑलिम्पियाडशी संबंधित काम करते. ऑलिम्पियाडच्या निमित्ताने त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. आईसलँड येथे १९९८ मध्ये भरलेल्या २९ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भाग घेतला होता. मराठी विज्ञान परिषदेचे ते आजीव सभासद होते. त्यांना परिषदेने सन्मान्य सभासदत्त्व बहाल केले होते. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेच्या संपादक मंडळाचे ते १२ वर्षे सभासद होते. आठ वर्षे ते परिषदेचे उपाध्यक्ष होते. कोकणातील मालगुंड येथे २०२० मध्ये केशवसुत स्मारकाच्या जागेत भरलेल्या ५४ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. २०२० साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला साठ वर्षे पुरी झाली त्या निमित्ताने मराठी विज्ञान परिषदेने तयार केलेल्या आणि ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानात हीरक महोत्सवी महाराष्ट्र’ या ग्रंथाचे संपादन प्रा. प्रधान आणि डॉ. विवेक पाटकर यांनी केले होते. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले होते, ‘विज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राने फारसे काही केले नाही असे आम्हाला वाटत होते, पण जसे आम्ही प्रत्येक विषयाच्या खोलात गेलो तेव्हा महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक असल्याचे आम्हाला जाणवले.
प्रा. प्रधान इंडियन फिजिक्स असोसिएशनचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या पत्रिकेचेही ते संपादक होते. त्यांनी लिहिलेले पन्नासहून अधिक शोधनिबंध आणि स्वत: लिहिलेली अथवा संपादित केलेली अथवा सहसंपादित केलेली तीसेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी पीएच.डी.साठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स या संस्थेने चालविलेल्या विज्ञान पत्रकारिता आणि विज्ञान संप्रेषण या कार्यक्रमात त्यांनी अनेक वेळा भाग घेतला आहे तर बारावीनंतर विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राच्या शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत यावर त्यांनी अनेक भाषणे दिली आहेत. नाशिकचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, दिल्लीची इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आणि केंद्र सरकारच्या एनसीईआरटी यांच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर वर्गासाठी भौतिकी आणि गणिताशिवाय विज्ञानातील नैतिकता, विज्ञानाचा इतिहास आणि तत्त्वज्ञानआणि तंत्रज्ञानाचे संप्रेषण याविषयावरही भाषणे दिली आहेत. बडोद्याच्या नवरचना विद्यापीठातील पीएच.डी.च्या दोन विद्यार्थ्यांना, ‘बालकांनाविज्ञान कसे शिकवावे’ यावर त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळावर त्यांनी काम केले आहे आणि कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या चार भागांचे त्यांनी संपादन केले आहे. त्यांनी पालघर जिल्ह्यातील ग्राम मंगल संस्थेचे दहा वर्षे अध्यक्षपद भूषवले आणि पुण्याच्या एम.के.सी.एल.संस्थेचे सल्लागारपदही सांभाळले. राष्ट्रीय बाल विज्ञान संमेलनाचे ते सल्लगार होते. महाराष्ट्र ॲकेडेमी ऑफ सायन्सेसचे ते अधिछात्र होते.
प्रा. प्रधान यांना मनोहर विचारे फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार, टी.आय.एफ.आर.च्या माजी विद्यार्थी संघटनेचा पुरस्कार, नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा गौरव पुरस्कार लाभले आहेत. ते आजन्म विज्ञानशिक्षणात अग्रेसर राहून मृदुभाषी आणि परोपकारी वृत्तीचे होते.
प्रा. प्रधान यांचे प्रदीर्घ आजाराने नवी मुंबई येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #भौतिकी #गणित #शिक्षण #विज्ञान शिक्षण #ऑलिम्पियाड
संदर्भ :
समीक्षक-संपादक : स्नेहा खोब्रागडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.