रॉसमन, मायकेल  : ( ३० जुलै, १९३० – १४ मे, २०१९ )

मायकेल रॉसमन यांचा जन्म फ्रँकफूर्ट येथे झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या धुमाकुळीत ते त्यांच्या आई सोबत लंडनला राहायला गेले. तेथे त्यांनी लंडन युनिव्हर्सिटीमधून गणित व पदार्थ विद्यानात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी शालेय जीवनात कॅथलीन लॉसडेल यांचे स्फटिकशास्त्राबद्दलचे व्याख्यान ऐकले आणि ते त्या शास्त्राने खूप प्रभावित झाले. त्यांनी ग्लासगो विद्यापीठातून रॉबर्टसन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी.साठी रसायनाच्या स्फटिकांवर काम केले व त्यानंतर त्यांनी विलियम लिप्स्कोंब यांच्याबरोबर टर्पिनॉइडच्या स्फटिक रचनेवर संशोधन केले. याचवेळी त्यांनी संगणकाचा स्फटिकशास्त्रात उपयोग करण्याची सुरुवात केली. नंतर त्यांनी मॅक्स पेरूझ यांच्या मार्गर्शनाखाली केंब्रिज येथील MRC या प्रयोगशाळेत हिमोग्लोबिनवर देखील संशोधन केले. जगातील विविध प्रयोगशाळांत अनेक शास्त्रज्ञांबरोबर काम केल्यानंतर मायकेल रॉसमन अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. येथे ते जवळ जवळ ५० वर्षे काम करत होते.

त्यांनी विविध विकरांच्या क्रियाशील स्थानात (active site) जेथे  ATP, NADPH वगैरे रसायनांचा संयोग होतो तेथील रचनेत असलेली समानता शोधून काढली. नंतर त्याचे नामकरण रॉसमन फोल्ड असे केले गेले. या फोल्डमध्ये सहा समांतर बिटा मळसूत्री वक्र (helices) असतात व ती एकमेकांना अल्फा मळसूत्री वक्रांच्या सहाय्याने एकांतरित (alternate) पद्धतीने गुंफलेली असतात.

त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी क्ष-किरण स्फटिकशास्त्राचा उपयोग करून माणसाला ज्या जिवाणूमुळे सर्दी पडसे होते त्याची रचना शोधून काढली आणि यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या संशोधनामुळे हे जिवाणू पेशीत कसे शिरतात हे समजले व ही क्रिया थांबविणारी रसायने शोधण्याचा मार्ग गवसला.

इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करून त्यांनी झीका विषाणूची  रचना शोधून काढली. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा व क्ष किरण स्फटिकशास्त्राचा एकत्र उपयोग करून डासांच्या मार्फत प्रसार होणार्‍या डेंग्यूच्या व इतर तत्सम विषाणूंच्या रचनेचा अभ्यास करता येऊ लागला. रॉसमन यांना जिवाणू व शेवाळ यांच्या पेशींवर संक्रमण करणार्‍या विषाणूंच्या रचना शोधण्यातही रुची होती.

पर्ड्यू विद्यापीठात सुपर-संगणकाच्या क्ष-किरण स्फटिकशास्त्रासाठी लागणार्‍या प्रणाली त्यांनी निर्माण केल्या. त्यांना रॉसमन क्लस्टर असे म्हणतात. त्यांचे संरचना जीवशास्त्रातील (Structural Biology) आणखी एक महत्त्वाचे योगदान म्हणजे रेण्वीय बदलाचे (Molecular replacement) सिद्धांत ज्यामुळे प्रथिनांच्या माहिती संचयनात (डाटा बँक) बराचशी माहिती जमा करण्यात मदत झाली.

त्यांनी विविध विषाणूंवर संशोधन केले. त्यात सर्दी व फ्लूसाठी कारणीभूत असलेले विषाणू, पोलिओचे विषाणू, डेंग्यूचे विषाणू, पारोव्हायरस आणि इतर सूक्ष्म जिवाणूतील विषाणू यांचा समावेश होतो. हे विषाणू स्वतःच्या DNA/RNA ला अगदी छोट्याशा आवरणात गुंडाळून कसे ठेवतात व पेशीत शिरल्यावर ही गाठोडी उलगडून स्वतःची वृद्धी करत संक्रमणग्रस्त पेशीचे जीवन उद्ध्वस्त कसे करतात यावर रॉसमन यांचे संशोधन केंद्रीत झाले होते. रॉसमन यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर केवळ विषाणूंची त्रिमितीय आण्विक रचना रोग संक्रमणात महत्त्वाची नसते तर विषाणूंची रचना निर्माण करण्यासाठी लागणार्‍या रोगग्रस्त पेशीतील जैवरसायनिक क्रिया व पेशीतील विषाणुवर्धक सामुग्री तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळेच विषाणुंपासून संरक्षणाचे मार्ग शोधण्यास उपयोगी पडते. रॉसमन यांच्या विषाणूशास्त्रातील संशोधनामुळे वैद्यकशास्त्रात मोलाची भर पडली आहे.

रॉसमन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी झीका विषाणुची रचना आणि लगेच त्यांनी झिकाच्या रचनेचे अचूक आणि पूर्ण चित्रच प्रसिद्ध केले. त्याबद्दल परत सर्व जगभर त्यांच्या कार्याची प्रशंसा झाली. अशा तर्‍हेने आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातदेखील त्यांनी विषाणू संशोधनाला वाहून घेतले होते.

रॉसमन यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांना अमेरिकेतील नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स व रॉयल सोसायटी लंडनचे सभासद होण्याचा मान मिळाला होता. रॉसमन यांनी विषाणूशास्त्राचा ध्यासच घेतला होता. पर्ड्यू विद्यापीठात त्यांनी विषाणुशास्त्रातील असंख्य संशोधक तयार केले. त्यांच्या संशोधनामुळे जगाचे बर्‍याच विषाणून पासून संरक्षण करण्यात यश आले आहे. त्यांना अमेरिकेतील नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स व रॉयल सोसायटी लंडनचे सभासद होण्याचा मान मिळाला होता. रॉसमन यांनी विषाणू शास्त्राचा ध्यासच घेतला होता. पर्ड्यू विद्यापीठात त्यांनी विषाणूशास्त्रातील असंख्य संशोधक तयार केले. त्यांच्या संशोधनामुळे जगाचे  बर्‍याच विषाणुंपासून संरक्षण करण्यात यश आले आहे

 संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा