स्मिथ, हॅरी : ( ७ ऑगस्ट, १९२१ – १० डिसेंबर, २०११ ) हॅरी स्मिथ यांचा जन्म नॉर्थहॅम्पटन येथे झाला. एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून ते जीवाणूंचे  रोग आणि त्यांच्यातील रोगकारक शक्ती याचे अभ्यासक म्हणून गणले जात. काही दिवस पोर्तन येथे शैक्षणिक क्षेत्रात काम केल्यावर ते बर्मिंगहॅम विद्यापीठात प्रोफेसर म्हणून संलग्न झाले.

त्यांना १९४५ साली नॉटींगहॅम विद्यापीठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून औषधरसायनशास्त्र विषयासाठी नेमले गेले. ते एका नॉर्थहॅम्पटन येथील  पुस्तकबांधणीचा व्यवसाय करणाऱ्या  वडिलांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नॉर्थहॅम्पटन व्याकरण शाळेत झाले. १५ व्या वर्षी शहरातील एका औषध विक्रेत्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतले.

स्मिथ यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे १९४७ साली त्यांना सॅलिस्बरीजवळ पोर्तन येथील केमिकल डिफेंस सेंटरमध्ये वरिष्ट वैज्ञानिक अधिकारी म्हणून सूक्ष्मजीवशास्त्र विभागात काम करायला मिळाले. नुसतेच शिकवण्यापेक्षा किंवा संशोधन करण्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या आणि आयुष्यभर चाललेल्या त्यांच्या जीवाणूंच्या रोगांवर आणि त्यांच्यातील रोग प्रतिकारक शक्तीच्या रासायनिक अभ्यासावर अगदी मूळ तत्वापासून काम करायला मिळाले. पोर्तनमधील नवीन सूक्ष्मजीवशास्त्रीय संशोधन केंद्रात, संशोधनासाठी उत्तम सोयी असलेल्या प्राण्यांच्या प्रयोगशाळेत, चाचण्या घेता आल्या. नंतर त्यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठात स्वतःसाठी हव्या असलेल्या सोयी करून घेतल्या.

गिनीपिग्समध्ये प्रयोग करून स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अँथरॅक्स (Anthrax) या रोगास कारणीभूत असलेले विष शोधून काढले. याचा महत्त्वाचा परिणाम असा झाला की स्मिथ यांचे प्राण्यांमधील यशस्वी प्रयोग पाहून, अनेक रोगांच्या अभ्यासासाठी हे तंत्र नंतर वापरले गेले. १९९० नंतर सूक्ष्मजीवशास्त्रात हा सगळ्यात जास्त संशोधन झालेला भाग होता. प्लेग आणि ब्रूसेलोसीस या रोगांच्या जंतुना रोगट प्राण्यांमधून वेगळे काढून नेमके कशामुळे रोग होतो हे त्यांनी अभ्यासिले आणि प्लेगवरची लस तयार केली. हे यश उत्तम संघटन  कौशल्यामुळे प्राप्त झाले.  त्यांची नेहेमी पुढे जाण्याची तयारी असे. त्यांना १९६०च्या सुमारास बर्कले येथे पीएच्.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान देत असताना व चर्चा करीत असताना त्यांच्या लक्षात आले की त्यांनी स्वतः आपल्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या कक्षा रुंदावायला पाहिजेत आणि बाकी क्षेत्रांचा अभ्यास करायला पाहिजे. बर्मिंगहम विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात १९६५ साली त्यांना या आश्वासनावर नेमले गेले, की त्यांना हव्या असलेल्या सगळ्या संशोधनाच्या सोयी तिथे उपलब्ध करून दिल्या जातील.

जंतू वाढविण्याच्या प्रयोगांसाठी प्राणीगृहांची व्यवस्था केली जाईल आणि त्याची आखणी सूक्ष्मजीवशास्त्रीय संशोधन केंद्राप्रमाणेच असेल. वनस्पती आणि प्राण्यांमधील विषाणू आणि बुरशी यावरही काम करण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या संशोधनास अनेक दशके मेडिकल कौन्सिल, वेलकम ट्रस्ट आणि शेतकी संशोधन कौन्सिल यांनी सहकार्य केले. यामुळे बर्मिंगहॅम विद्यापीठाचे नाव या  संशोधन क्षेत्रात मोठे झाले. वनस्पतींमधील विषाणूपासून ते गुप्त रोगांच्या विषाणू आणि जीवाणूपर्यंत हे संशोधन होते. स्मिथ यानी हा विषय बी.एससी.च्या अभ्यास क्रमात अंतर्भूत केला आणि याकडे विद्यार्थी आकर्षिले गेले. स्मिथ यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठात सामाजिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्तम संशोधनासाठी त्यांना रॉयल सोसायटीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या सर्व पहिल्या पासूनच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

स्मिथ ‘सोसायटी फॉर जनरल मायक्रोबायालॉजी’चे ते  खंदे समर्थक होते आणि त्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. १४ व्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीवशास्त्र काँग्रेसचे ते अध्यक्ष होते आणि फेडरेशन ऑफ यूरोपियन सूक्ष्मजीवशास्त्रीय सोसायटी स्थापन करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. नॉटींगहॅम विद्यापीठातून मानद डी.एस्सी. पदवी मिळाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला कारण त्यांच्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या संपूर्ण योगदानासाठी हा मान त्यांना मिळाला.

जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना सूक्ष्मजीवशास्त्रात एमिरीटस प्रोफेसर आणि मानद सायन्स रिसर्च फेलो म्हणून मेडिकल स्कूलमध्ये निवासस्थान देण्यात आले. त्या नंतरही त्यांनी आपले संशोधनाचे काम सुरू ठेवले. फ्लू आणि गोनोकोकायवर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे