स्टॅन्ले, वेन्डेल एम. : ( १६ ऑगस्ट १९०४ – १५ जून १९७१) वेंडेल मॅरिलिथ स्टॅन्ले यांचा जन्म अमेरिकेतील इंडियाना राज्यात रिजव्हिले (Ridgeville) गावी झाला होता. त्याच राज्यातील रिचमंड येथील इर्लहम (Earlham) महाविद्यालयातून त्यांनी रसायनशास्त्रातील पदवी, इलिनॉय विद्यापीठाची पदव्युत्तर आणि  पीएच्. डी. ह्या पदव्या प्राप्त केल्या. काही महिने या विद्यापीठात काम केल्यावर ते राष्ट्रीय संशोधन परिषदेचा सदस्य म्हणून पुढील अभ्यासासाठी जर्मनीमध्ये निक येथे गेले. तेथे त्यांना हेन्रिक विलॅन्ड यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तेथून परत आल्यानंतर त्यांनी न्यूजर्सी येथील प्रिन्स्टनमध्ये  रॉकफेलर संस्थेच्या प्रयोगशाळेत काम केले. १९४८ मध्ये त्यांची  जैवरसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि विषाणू संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात नेमणूक  झाली.

रशियन जीवशास्त्रज्ञ दिमित्री इव्हानोवस्की यांना  पश्चिम गोलार्धात पसरलेल्या वनस्पती रोगासाठी जबाबदारअसलेले जे रोगजंतू सापडले. ते जीवाणूंपेक्षा खूप लहान होते  कारण ते गाळणीतून सहजपणे जाऊ शकत होते. त्यांनतर इ.स. १८९९ मध्ये डच वनस्पतिशास्त्रज्ञ बायजेरींक  यांनी हे जंतू आत्तापर्यंत माहिती असलेल्या कोणत्याही रोगजंतूंपेक्षा अगदी वेगळेच आहेत असे प्रतिपादन केले आणि विषाणू जगाला माहिती झाले. संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या आवाक्याबाहेर सूक्ष्म असलेल्या या विषाणूंवर त्यांनतर ३० – ३५ वर्षे खूप जणांनी अभ्यास केला.

रॉकफेलर संस्थेत काम करीत असतांना स्टॅन्ले यांनी तंबाखूच्या पानांवर रोग मोझॅक निर्माण करणाऱ्या आणि प्रथिनांसारखे गुणधर्म असलेले विषाणूंचे सुईच्या आकाराचे स्फटिक शुद्ध स्वरूपात मिळविले. जो विषाणू  जिवंत स्वरूपात इतर सजीवांमध्ये रोग निर्माण करतो आणि प्रजननक्षम असतो (त्याच्या प्रजननानेच रोग निर्माण होतात) तो अजैविक पदार्थांसारखा कसा असू शकतो? असा प्रश्न इतर वैज्ञानिक साहजिकच विचारू लागले .कारण यापूर्वी असे कधी घडले नव्हते. विषाणू हे सजीव आणि निर्जीव विश्वांमधील दुवा आहे हे स्टॅन्ले यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखविले होते. आत्तापर्यंतच्या ज्ञानाला कलाटणी देणारा हा  शोध होता. पुढे इतरत्र आणि त्यांच्याही प्रयोगशाळेत विषाणूंचे हे स्फटिक फक्त प्रथिनांचे नसून त्यात रायबोन्यूक्लिक आम्ल देखील असते हेही लवकरच सिद्ध झाले. त्यांच्या या शोधामुळे रेण्विय जीवशास्त्र या जीवशास्त्राच्या नव्या शाखेची पायाभरणी झाली.

रॉकफेलर संस्थेतील प्राणी आणि वनस्पती विकृतीशास्त्राच्या प्रयोगशाळेत विषाणूंवर आधी बरेच काम  झाले होते. लुईस कुंकेल हे ह्या प्रयोगशाळेचे प्रमुख होते. त्यांनी तंबाखूच्या पानांवरील रोग निर्माण करणाऱ्या या मोझॅक विषाणूंच्या अभ्यासात बरीच मजल मारली होती. हे विषाणू मोठ्या प्रमाणावर मिळणे देखील सोपे होते कारण ह्या रोगाच्या प्रादुर्भावात त्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रजनन होत होते. पण अभ्यासासाठी ते शुद्ध स्वरूपात मिळणे आवश्यक होते. मूळचे रसायनशास्त्रज्ञ असल्यामुळे स्टॅन्ले यांनी बहुतेक या विषाणूंकडे एक रासायनिक पदार्थ म्हणून पाहिले असावे. त्यांचे सहाध्यायी नॉरथोर्प यांनी विकरे शुद्ध करण्यासाठी चक्राकार फिरणाऱ्या उपकरणाचा वापर करून एक पद्धत विकसित केली होती. ही पद्धत आणि शिशाचा ॲसिटेट क्षार वापरून या विषाणूंच्या स्फटिकांचा शुद्ध साका बनविण्यात स्टॅन्ले यांना यश आले.

स्टॅन्ले यांनी रासायनिक पद्धतीने शुद्ध केलेले विषाणू खूपच प्रभावशाली होते. याचा अगदी नॅनो पातळीपेक्षा कमी भाग तंबाखूच्या झुडुपांवर रोग निर्माण करण्यास सक्षम होता हे त्यांनी सिद्ध केले. एकदा का वनस्पतीत हा रोग निर्माण झाला की स्टॅन्ले अभ्यासासाठी हवे तेव्हढे विषाणू मिळवू शकले.

त्यांनी विषाणूचे जे शुद्ध स्वरूपात स्फटिक मिळवले होते ते पुन्हा विरघळवून त्याचे स्फटिकीभवन केले. हा प्रकार त्यांनी १५ वेळा केला. त्यानंतर देखील हे विषाणू स्फटिक तंबाखूच्या रोपांमध्ये मोझॅक रोगकारक आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. या विषाणुस्फटिकांचे रेण्विय वजन त्यावेळी ज्ञात असलेल्या सर्वांत जड प्रथिनांच्या रेण्विय वजनापेक्षा १.७ कोटी पटीने अधिक होते. त्यावर स्टॅन्ले यांचे गृहितक असे होते की प्रजननासारख्या उच्च स्त्री रासायनिक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ह्या स्फटिकाला सक्षम बनविण्यासाठी त्याच्या रचनेत सहजगत्या बदलू शकणारे असंख्य अणू असणे गरजेचे आहे म्हणूनच त्याचे रेण्विय वजन इतके अधिक असू शकेल. त्यांनतर काही वर्षांनी हे स्फटिक स्टॅन्ले यांनी सुचविल्याप्रमाणे प्रथिननसून ते प्रथिन आणि रायबोन्यूक्लिक आम्लाचे संयुग असल्याचे सिद्ध झाले. त्यांनतर स्टॅन्ले यांनी या स्फटिकाचे रासायनिक अणू भौतिक गुणधर्म कसे असतील याचा अभ्यास सुरू केला. तसेच ह्या स्फटिकाची रोगनिर्माण क्षमता कशी कार्य करते ह्याचाही त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या विषाणू स्फटिकीभवन यशानंतर ३ वर्षात एक डझनाहून अधिक विविध रोगकारक विषाणूंचे स्फटिकीभवन करण्यात अनेक प्रयोगशाळांना शक्य झाले.

स्टॅन्ले यांना रॉकफेलर संस्थेतील त्यांच्या दोन सहाध्यायी जेम्स सम्नर आणि जॉन नॉरथोर्प यांच्याबरोबर संयुक्तपणे १९४६ सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला.  स्टॅन्ले यांना त्याशिवाय जे महत्त्वाचे सन्मान प्राप्त झाले होते, त्यात शिकागो विद्यापीठाचे रोझेंबर्ग पदक आणि हार्वर्ड विद्यापीठाचा अल्डर, हार्वर्ड, येल, प्रिन्स्टन, इलिनॉय या विद्यापीठांच्या आणि  इर्लहम महाविद्यालयांच्या सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स हे किताब, अमेरिकन सरकारचे आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार, त्यांच्या ‘रसायनशास्त्र: एक सुंदर गोष्ट’ या साहित्यिक कलाकृतीला पुलित्झर नामांकन होते.

संदर्भ :

  • Colvig R (February 1972) “WendellM STANLEY Ph.D. (1905-1971) Cancer 29(2) 541-2 doi10 1002/1097-0142(197202) 29.2<541 AID-CNCR 2820290246>30co2-T PMID 4552137
  • The Franklim Institute “WendellMeredith Stanley Retrieved July 27,2015

  समीक्षक : रंजन गर्गे