सुखात्मे, पांडुरंग वासुदेव (२७ जुलै १९११ – २८ जानेवारी १९९७) पांडुरंग सुखात्मे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील बुधगाव येथे जन्मले. त्यांनी गणित मुख्य तर भौतिकशास्त्र उपविषय घेऊन मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवली. त्यानंतर लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पीएच्. डी. आणि डी. एससी या पदव्या मिळवल्या. त्यांचे पीएचडीचे द्वि-आंशिक फलांवरील (Bi-partitional Functions) काम रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या Philosophical Transactions, Series A मध्ये प्रकाशित झाले.

इंग्लंडहून भारतात परतल्यावर सुखात्मे यांनी बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे तेव्हाचे उपकुलगुरू, पंडित मदन मोहन मालविय यांची भेट घेतली. पंडितजींच्या निदान भविष्यात, सांख्यिकी विभागामुळे या गरीब देशाचा फायदा कसा होईल? या प्रश्नाच्या चिंतनातून सुखात्म्यांनी शेती, पशुपालन, पोषण आणि जनआरोग्य, तसेच औषध व समाजविज्ञान क्षेत्रे सांख्यिकीतील आपल्या कार्यासाठी निवडली.

सुखात्मे १९४०मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर) येथे सांख्यिकीतज्ञ असताना, त्यांच्यावर स्लेटर (Slater) यांच्या मार्गदर्शनाखालील ईटा शेळीसंवर्धन प्रकल्पाचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी पडली. या प्रकल्पांतर्गत मिळालेल्या दहा वर्षांच्या आधारसामग्रीच्या विश्लेषणानुसार, दुधाच्या उत्पादनात झालेली वाढ जनुकीय नसल्यामुळे प्रकल्पाचा हेतू निष्फळ ठरल्याचे सुखात्मे यांनी सिद्ध केले. यांतून शेती संशोधन करणाऱ्यांचे सांख्यिकीय पद्धतींसंदर्भात प्रशिक्षण होणे आवश्यक असल्याचेही त्यांना जाणवले. त्यासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. परिणामी पिकाखालील क्षेत्र व त्यांतील पीक उत्पादन यांचे अंदाज बांधण्यासाठी यादृच्छिक नमुना निवडीच्या सांख्यिकी तंत्राचा स्वीकार झाला. ते १९५१ पर्यंत आयसीएआरचे सांख्यिकी सल्लागार राहिले.

आयसीएआरमधील अकरा वर्षांत सुखात्म्यांनी शेतकी आणि पशुसंवर्धन यात केलेल्या सांख्यिकीच्या कामांतून पूर्णपणे सांख्यिकीला वाहिलेल्या, दिल्लीस्थित इंडियन ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना झाली. कापूस, गहू, भात, इत्यादी पिकांच्या कापणीच्या प्रायोगिक पद्धतींचा तपास करून धान्योत्पादनाचे अंदाज बांधण्यासाठी सुखात्मे आणि विनायक गोविंद पानसे यांनी भारतांतील सर्वेक्षणांची पद्धत आंखून दिली. हे अवाढव्य काम १९४८ आणि १९५१ साली त्यांनी सुरू केलेल्या जर्नल ऑफ द इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रीकल्चरल स्टॅटिस्टिक्समध्ये प्रकाशित झाले. याच अनुभवांवरील त्यांचे Sampling Theory of Surveys with Applications हे पुस्तक १९५४ मध्ये प्रकाशित झाले, ज्याच्या स्पॅनिश आणि पोर्तुगीज आवृत्त्याही निघाल्या.

आयसीएआरमध्ये कार्यरत असताना सुखात्म्यांनी धान्योत्पादनाच्या अंदाजासंबंधात सुधारणा घडवली. धान्योत्पादनाचे अंदाज वर्तवण्याच्या तत्कालिन प्रशासकीय पद्धती सदोष आणि अविश्वासार्ह होत्या. यावर उतारा म्हणून सुखात्म्यांनी शेतकी सर्वेक्षणासाठी स्तरित बहुटप्पी यादृच्छिक नमुना निवड (stratified multistage random sampling) हे नवीन तंत्र विकसित केले. या तंत्रात विशिष्ट धान्य पिकवलेली शेते यादृच्छिकपणे निवडून त्यांतूनही यादृच्छिकतेने, चौकोनी शेतखंड टप्प्याटप्प्यात सर्वेक्षणांसाठी निवडले जातात. यामुळे धान्याच्या परिमाण मोजणीतील चुका टळतात. ही पद्धत पुढे महत्त्वाच्या पिकांच्या सरासरी अंदाजासाठी मान्य झाली. यातूनच पीक अंदाज सर्वेक्षणांचा (Crop Estimation Surveys) राष्ट्रीय कार्यक्रमही साकारला.

सुखात्म्यांनी १९५०मध्ये समुद्री मासेमारीचे मासिक-अंदाज बांधण्याचे वस्तुनिष्ठ तंत्र विकसित केले. यातील नमुना निवडीत वेळ आणि ठिकाणही त्यांनी हिशेबात घेतले होते. १९५८ साली बायोमेट्रिक्स जर्नलच्या एका अंकात त्यांनी या नमूनानिवड-पद्धतीबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले. ते इतके लक्षवेधी ठरले की युनायटेड अरब रिपब्लिक आणि युगांडा या देशांच्या सरकारांनी त्यांच्या देशांतील मासेमारीसंदर्भातील सांख्यिकीत सुधारणा घडविण्यासाठी सुखात्मे व पानसे यांना बोलावून घेतले.

सुखात्मे १९५१मध्ये रोममधील फाओच्या (FAO – Food and Agricultural Organisation) सांख्यिकी विभागाचे प्रमुख झाले. तिथेच संचालकपदावर त्यांनी १९७१ सालाच्या निवृत्तीपर्यंत काम केले. त्या कार्यकाळात त्यांच्या उत्साही नेतृत्वाखाली फाओने अनेक विकसित व अविकसित देशांमध्ये, राष्ट्रीय स्तरावरील शेतकीविषयक अचूक सांख्यिकी मिळविण्यासाठी, नमुना निवडीचा झंझावाती प्रचार व प्रसार केला. नमुना निवडीचा सिद्धांत आणि त्याचे उपयोजन यांत राष्ट्रीय पातळीवरील विशेषज्ञ तयार करण्यासाठी त्यांनी देशोदेशी मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रे उभारली आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण करण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळा राबविल्या. यातूनच पीक उत्पादन आाणि पोषण सर्वेक्षणे पार पडली. शेतीसंबंधीत जागतिक दशवार्षिक गणना आणि सर्वेक्षणे यांच्या प्रगतीवरील देखरेखीसाठी त्यांनी प्रादेशिक मंडळे आणि समित्या बनविल्या.

सुखात्म्यांनी १९६०च्या सुमारास उपलब्ध आंकडेवारी व सांख्यिकीचा वापर करून जगाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त १० ते १४ टक्के लोक अधःपोषित (undernourished) असून एक-तृतियांश ते एक-द्वितियांश टक्क्यादरम्यानचे कुपोषित (malnourished), किंवा अधःपोषित-कुपोषित असावेत, अशी वस्तुस्थिती फाओला कळवली. सुखात्म्यांनी त्यासंबंधातील शोधनिबंध २७ मे १९६१रोजी रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीपुढे सादर केला. त्यांनी अभ्यासासाठी निवडलेले भूकेचे पैलू तसेच प्रगणनेसाठी वापरलेल्या पद्धती आणि त्यांवरील निष्कर्ष योग्य असल्याचा निर्वाळा उपस्थित विद्वानांनी दिला. तेव्हांपासून फाओतर्फे होणाऱ्या संपूर्ण जगातील भुकेलेल्यांच्या शिरगणतीत पुष्कळच सुधारणा झाल्या.

फाओने १९६६ मध्ये ‘जगातील एक-तृतीयांश मुले प्रथिन-कुपोषित आहेत’ असे जाहीर केले. यामुळे विकसनशील देशांतील लोकांच्या आहारात चांगल्या प्रतीची प्रथिने नसतात, या गैरसमजुतीतून तेथे अर्धपारंपरिक (semi-conventional) प्रथिनयुक्त अन्नधान्य निर्मिती व पोषक आहार पुरवठा योजनांना उत आला. परंतु आहारातून मिळणाऱ्या एकूण कॅलरिज दुर्लक्षित ठेवून नुसतेच प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यात फायदा नसल्याचे, सुखात्म्यांनी आंकडेवारीसह निदर्शनास आणले. आणखी संशोधनांतूनही हेच निष्कर्ष मिळाल्यावर, फाओने ते स्वीकारले. त्यानंतर पोषक आहारात प्रथिनांबरोबरच पिष्टमय पदार्थांनाही स्थान मिळाले.

निवृत्तीनंतर भारतात परतल्यानंतर, गरीबच गरीबांना मदत करू शकतात, या उक्तीवरील विश्वासातून सुखात्म्यांनी इंदिरा सामूहिक स्वयंपाकघर हा स्वयंपूर्ण प्रकल्प, पुण्यातल्या मंडईत राबविला. या योजनेतून आत्यंतिक गरीबीतील कामगारांना मिष्टान्नासह समतोल आहार, बाजारभावाच्या निम्म्या किमतीत देऊनही, प्रकल्पाच्या पुढील गुंतवणूकीसाठी २% नफा उरे.

सुखात्म्यांना देशविदेशांतील अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीतर्फे गाय पदक, इंडियन सायन्स कॉंग्रेस असोसिएशनचे बी. सी. गुहा स्मृती व्याख्यान पारितोषिक, बी.डी. टिळक स्मृती व्याख्यान पारितोषिक, अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनसह भारतातील महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थांचे सदस्यत्व आणि मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद हे काही सन्मान होत. याशिवाय, सुखात्म्यांना पद्मभूषण पुरस्काराने तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हरी ओम आश्रम ट्रस्ट पारितोषिकाने गौरविण्यात आले.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर