कीफ, जॉन :  (१८ नोव्हेंबर, १९३९ – ) आयरिश असलेल्या जॉन ओ’कीफ यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. आपले शालेय शिक्षण मॅनहॅटन येथील रिजिस हायस्कूल येथे पूर्ण करून सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्क येथून त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. मॉन्ट्रिअल क़्युबेक (कॅनडा) येथील मॅकगिल विद्यापीठात येथे ते पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. रोनाल्ड मेलझ्याक यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक मनोविज्ञान या विषयात त्यांनी पीएच्.डी. पूर्ण केली. त्याचवर्षी पोस्टडॉक्टरल रिसर्च फेलो म्हणून ते युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये दाखल झाले. तेव्हापासून आजतागायत ते तेथे आहेत. पुढे ते तेथेच प्राध्यापक झाले. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे काही वर्षांनंतर ओ’कीफ यांनी आपले संशोधन एमीगडालापासून मेंदूतील अश्वमीन (हिप्पोकॅम्पस) भागाकडे वळविले. प्राण्यांच्या वर्तणुकीत अश्वमीन भागाचे  कार्य समजण्यासाठी उंदराच्या अश्वमीन भागातील चेतापेशीचे कार्य नोंद करण्यासाठीच्या तंत्राने प्रत्येक पेशीची नोंद आणि त्या पेशीचा  वर्तणूकीशी असलेला संबंध यांचे त्यांनी निरीक्षण केले. ओ’कीफ यांना मेंदूतील अश्वमीन भागास  इजा झालेल्या उंदराच्या वर्तणूकीतील बदलामध्ये विशेष रस होता. अशा उंदरांच्या वर्तणुकीत महत्त्वपूर्ण बदल होत गेले. त्यांच्या स्थलविषयक (Spatial Task – स्थानसंबंधी ) ज्ञानाच्या कार्यात कमी कमी होत जाणारे बोधन आणि नवीन ठिकाणी  होत जाणारी अतिक्रियाशीलता वाढत गेली. कित्येक प्रयोगानंतर, ओ’कीफ यांनी शोधून काढले की, मेंदूच्या अश्वमीन भागात असलेल्या स्थाननिश्चिती पेशींचा व परिसराचा संबंध आहे. अश्वमीन भागात  असणार्‍या या पेशींना नंतर स्थाननिश्चिती पेशी (Place Cells) असे नाव दिले गेले.

आपला विद्यार्थी जॉनथन ओ. डोस्त्रौस्की यांच्यासोबत १९७१ मध्ये ओ’कीफ यांनी त्यांचे काही निष्कर्ष प्रसिद्ध केले. अश्वमीन भागास इजा (हिप्पोकॅम्पल)  झालेल्या  प्राण्यांच्या वर्तनातील फरक ही आकलन-बोधन विषयक मॅपिंगमध्ये (cognitive mapping) सहभागी असलेल्या मज्जासंस्थेच्या नुकसानीमुळे होते.

ओ’कीफ आणि त्यांचे सहकारी लीन नाडेल यांनी १९७८ मध्ये द हिप्पोकॅम्पस अॅज ए कॉग्निटीवमॅप नावाच्या सिद्धांताद्वारे बोधन आराखड्यावर तपशीलवार वर्णन करून आकलनविषयक आराखड्यास अश्वमीन भागामध्ये  स्थान दिले. प्रारंभी  सुरुवातीला या सिद्धांताला फारसे महत्त्व दिले गेले नाही. नंतर  इतर संशोधकांनीसुद्धा याच विषयावर केलेल्या संशोधनामुळे या सिद्धांताला पुष्टी मिळाली. यामध्ये २००५ साली झालेल्या मोजेर्स यांच्या ग्रीड पेशींचादेखील समावेश होता. ग्रीड पेशीसुद्धा  प्राणी त्यांची स्थल विषयक स्थिती (spatial position) निश्चित करतात.

ओ’कीफ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्पष्ट केलेल्या चेतापेशींना अंतर्गत स्थाननिश्चिती रचना (इनर ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम – inner GPS)  असेही म्हटले जाते. ओ’कीफ यांचे हे संशोधन इतके निर्णायक होते की,  याने अशा प्रणालीचा पहिला प्रायोगिक पुरावा सादर केला आणि मानवांसहित प्राण्यांच्या क्षमतेच्या अंतरंगांचे ज्ञान प्राप्त झाले. त्याचबरोबर वातावरणात स्वतःला अभिमुख करणे, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्वत:ला  घेऊन जाणे, स्थानिक खुणा लक्षात ठेवणे, अशा बोधन क्रियेचे ज्ञानभांडार खुले झाले. मानवांमध्ये या सगळ्या क्षमतांचा अभाव असणे हे चेतासंस्थेच्या रोगाचे खासकरून अल्झायमर आजाराचे निदान आहे. यामुळे ओ’कीफच्या निष्कर्षाने अल्झायमर आजारातील संशोधनाची नवी दालने खुली झाली. माणसाच्या आकलनाबाबत (cognition) विशेषकरून बोधनक्रियेबद्दल त्यांच्या कार्याने अधिकच भर घातली. २०१४ साली  मे-ब्रिट्ट मोझेर आणि एडवर्ड मोझेर यांच्यासह ओ’कीफ यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. या सन्माननीय पुरस्काराबरोबरच त्यांना लुइसा ग्रौस-होर्वीत्झ पारितोषिक आणि मेंदूविज्ञानातील कावली पारितोषिक मिळाले. ओ’कीफ बीबीसी रेडियो-४ च्या द लाइफ सायंटिफीकचे अतिथि होते.

संदर्भ :

 

समीक्षक : मोहन मद्वाण्णा