हॅमिल्टन मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूट ॲट ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन : (स्थापना २००५)
विलियम रोवन हॅमिल्टन (William Rowan Hamilton, ४ ऑगस्ट, १८०५ ते २ सप्टेंबर, १८६५) या आयर्लंडच्या सर्वश्रेष्ठ गणितीच्या दोनशेंव्या जयंतीचे निमित्त साधून २००५मध्ये ‘हॅमिल्टन मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूटची’ (एचएमआय) स्थापना करण्यात आली. ही संस्था आयर्लंडमधील डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजमधल्या (टीसीडी) स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्सच्या इमारतीतच आहे.
ज्या हॅमिल्टन यांच्या नांवे एचएमआयची स्थापना झाली, ते जगातील प्रकांड गणिती होते. पदवी मिळविण्यापूर्वीच हॅमिल्टन यांना टीसीडीमधील खगोलशास्त्र विभागात अँड्र्युज प्राध्यापकपद देण्यात आले होते. गतीशास्त्रातील विशेष कामगिरीमुळे जगाला हॅमिल्टन ठाऊक झाले. कोनिकल रिफ्रॅक्शन (Conical Refraction) सारख्या पूर्णतः नव्या भौतिक घटनेचे भाकीत अत्याधुनिक गणनाच्या आधारे करण्यासाठी हॅमिल्टन प्रसिद्ध होते. त्यांच्या चतुर्दलांच्या (Quaternions) शोधाने अंकशास्त्रात लक्षणीय भर पडली. या शोधामुळेच गणितातील गट आणि वलय यांसारख्या नैक्रमनिरपेक्ष संरचनांची (non-commuting structures) द्वारे उघडली. यावरून लक्षात येईल की एचएमआयच्या स्थापनेमागे, केवढे प्रेरक व्यक्तिमत्त्व आहे.
ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन, हे आयर्लंडमधील प्रमुख विद्यापीठ असून गणितातील उच्च प्रतीच्या कामासाठी चारशे वर्षांहून अधिक काळ जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. विलियम रोवन हॅमिल्टनशिवाय जॉर्ज बर्कले, ऑस्कर वाइल्ड, एडमंड बुर्क, सॅम्युअल बेकेट आणि मेरी रॉबिन्सन असे विविध विषयातील जगप्रसिद्ध नामवंत या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होत.
आर्थिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक उन्नतीला हातभार लावणाऱ्या शास्त्रांना गणिताच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याच्या हेतूने एचएमआयची स्थापना झाली. ट्रिनिटी कॉलेजमध्ये असलेले स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स गणितातील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्वीच नांवाजलेले आहे. गणित संशोधनातील आयर्लंडची ती शान अधिक उंच व्हावी यादृष्टीने गणितातील शिक्षणाचा दर्जा सुधारून, त्याद्वारे गणिती विद्वानांची फौज तयार करणे, हे एचएमआयचे ध्येय आहे.
आयर्लंड हे गणितातील संशोधनाचे सर्वोत्कृष्ट आकर्षण बनावे हा एचएमआयचा निरंतर ध्यास आहे. याकरिता जागतिक स्तरावर, नावाजलेले प्रतिभावंत गणिती एचएमआयला भेटी देतील, संशोधन व चर्चासत्रांमध्ये सहभागी होतील, अध्यापन करतील, जनतेसाठी व्याख्याने देतील आणि शाळांनाही भेटी देतील, हे पाहिले जाते. संशोधक एकमेकांना भेटतील, परस्परांशी चर्चा करतील, एकमेकांना सहकार्य करतील, मूलभूत गणित आणि संबंधीत शाखांतील नव्या प्रांतातील शोधांच्या माहितीची देवाणघेवाण करतील, असे मोकळे व पोषक वातावरण एचएमआयने उपलब्ध करून दिले आहे. यामुळे अनुभवी संशोधक आणि बुद्धिमान तरूण यांच्यातील संवाद वृद्धिंगत झाला आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक असणारे, आयर्लंडमधील वातावरण, गणितींच्या भरभराटीला पोषक करण्याचे उद्दिष्टही एचएमआयने कायम डोळ्यांसमोर ठेवले आहे. आयर्लंडमधील नेतृत्त्व जाणते की, ज्ञानाच्या अर्थशास्त्रातही गणिताचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे गणित हा सर्वांच्याच जीवनकौशल्याचा गाभा बनणे जरूरीचे आहे.
एचएमआयमध्ये संशोधनासाठी निवडलेले विषय स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्समध्ये चालणाऱ्या संशोधनावरच बेतलेले आहेत. पुंज गेज सिद्धांत (Quantum Gauge Theories), रज्जु सिद्धांत (String Theory), संकलनीयता (Integrability), पुंज क्षेत्रांसाठी मॉन्टे कार्लो पद्धती (Monte Carlo methods for quantum fields), बीजगणित, विश्लेषण आणि भूमिती, अंकशास्त्र आणि स्वयंरुपी रूपे (Automorphic Forms) या विषयांवर तेथे संशोधन चालू आहे.
सायमनस् विख्यात प्राध्यापक, सायमनस् निमंत्रित संशोधक छात्र आणि सायमनस् पोस्ट-डॉक्टरल छात्रवृत्ती कार्यक्रम यांसाठी सायमनस् फौंडेशनने ( The Simons Foundation) एचएमआयमला सहा-लक्ष डॉलर्सचे अनुदान दिले आहे. देश आणि विदेशांतूनही संस्थेला देणग्या व निधी उपलब्ध होत असतो.
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर