सौंदर्यप्रसाधनांसाठी प्राचीन काळापासून वापरात असलेली एक वनस्पती. मेंदी ही वनस्पती लिथ्रेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लॉसोनिया इनरमिस आहे. लॉसोनिया प्रजातीत ही एकमेव जाती आहे. तिला लॉसोनिया आल्बा असेही म्हणतात. ती मूळची उत्तर आग्नेय आशिया आणि उत्तर आफ्रिका येथील असून भारत व इतर काही उष्ण देशांत ती लागवडीखाली आहे. मेंदीच्या पानांपासून मिळणाऱ्या लॉसन नावाच्या रंगद्रव्यासाठी, तसेच फुलांपासून मिळणाऱ्या हिना अत्तरासाठी तिला व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आहे.
मेंदीचे झुडूप १·८–७·६ मी. उंच वाढते. ते रोमहीन आणि अनेक फांद्याफांद्यांचे असून लहान फांद्यांच्या टोकांचे रूपांतर काट्यांमध्ये झालेले असते. पाने साधी, लहान, खोडावर समोरासमोर वाढतात. ती रोमहीन, अवृंत, लंबगोल आणि भाल्यासारखी असतात. फुले लहान, अनेक, पांढरट किंवा गुलाबी रंगाची असून स्तबक फुलोऱ्यात येतात. प्रत्येक फुलात चार निदल आणि लहान निदलनलिका असते. पाकळ्या अंडाकार असून निदलनलिकांच्या कडांवर पांढरे किंवा लाल रंगाचे पुंकेसर जोडीने असतात. अंडाशय उभे असून चार कप्प्यांचे असते. फळे लहान, करड्या रंगाची व वाटाण्याएवढी असून कायमस्वरूपी निदलाने वेढलेली असतात. फळ फुटते, तेव्हा त्याचे असमान चार भाग होतात. बिया लहान, असंख्य व तपकिरी काळसर असतात.
मेंदीच्या पानांपासून नारिंगी रंग मिळतो. तो रंग तळहात, तळपाय, केस, दाढी, नखे रंगविण्यासाठी, तसेच कमाविलेले चामडे, लोकर, रेशीम इत्यादी रंगविण्यासाठी वापरतात. निळीबरोबर हा रंग काळा होतो. बाजारात जी काळी मेंदी मिळते ती बहुधा मेंदी व नीळ यांच्या मिश्रणातून तयार करतात. मेंदीच्या मुळांमध्ये लाल रंग असतो. मेंदीच्या खोडाची साल कावीळ, प्लीहावृद्धी, त्वचा रोग इत्यादींवर उपयुक्त असते. पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे इत्यादींवर बाहेरून लावतात. पाने वांतिकारक आणि कफोत्सारक असून तळपायाची आग कमी करायला उपयोगी असतात. मेंदीच्या फुलांना तीव्र सुगंध असून वाफेद्वारे ऊर्ध्वपातन करून त्यांपासून सुगंधी तेल मिळवितात. या तेलाला हिना किंवा मेंदी तेल म्हणतात. ते अत्तरांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. मेंदीचे लाकूड कठीण असून त्याचा वापर हत्यारांचे दांडे करण्यासाठी करतात.