(अल्बिनिझम). विवर्णता हा मानवामध्ये आढळणारा जनुकीय विकार आहे. या विकारात त्वचा, केस आणि डोळे या इंद्रियांमध्ये मेलॅनीन (कृष्णरंजक) रंगकणांचा पूर्ण किंवा आंशिक अभाव दिसून येतो. त्वचेतील रंगकणांच्या अभावामुळे विवर्णता विकार असलेल्या व्यक्तीला सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांचा त्रास होतो. विवर्णता या विकारावर अद्यापही उपचार उपलब्ध नाहीत. मनुष्यामध्ये विवर्णतेचे दोन प्रकार आढळून येतात : (१) नेत्र-त्वचा विवर्णता आणि (२) नेत्र विवर्णता.

नेत्र-त्वचा विवर्णता

नेत्रत्वचा विवर्णता : या विकारामुळे डोळे, त्वचा आणि केस दुधी-पांढऱ्या रंगाचे दिसतात. त्वचा किंचित गुलाबी दिसते. अशी व्यक्ती उन्हात अधिक काळ राहिल्यास त्वचादाह होतो. काही वेळा अशा व्यक्तीला त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. नेत्र-त्वचा विवर्णता हा विकार जनुकीय उत्परिवर्तनामुळे उद्भवतो. या जनुकीय उत्परिवर्तनामुळे व्यक्तीची त्वचा, केस आणि डोळे यांत सामान्यपणे आढळणारे गडद करड्या रंगाचे मेलॅनीन रंगद्रव्य कमी प्रमाणात निर्माण होते किंवा निर्माण होत नाही. एका तीव्र प्रकारात, टीवायआर (TYR) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जनुकामध्ये उत्परिवर्तन घडून येते आणि टायरोसिनेज या मेलॅनीन रंगद्रव्याच्या निर्मितीस आवश्यक अशा विकराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. परिणामी, मेलॅनीननिर्मिती होत नाही. नेत्र-त्वचा विवर्णतासंबंधित जनुकीय दोष पुढच्या पिढीमध्ये युग्मविकल्पी अप्रभावी (रिसेसीव्ह अलील) पद्धतीने प्रकट होत जातात. म्हणजे माता आणि पिता या दोघांच्याही संबंधित जनुकांमध्ये आवश्यक ते उत्परिवर्तन घडून आल्यामुळे हे घडते. सर्वसाधारणपणे २० हजार व्यक्तींमागे एका व्यक्तीत हा विकार आढळून येतो.

नेत्र विवर्णता : या विकारामुळे फक्त डोळे बाधित होतात. हा विकार क्वचितच आढळणारा असून सर्वसाधारणपणे ५० हजार व्यक्तींमागे एका व्यक्तीत दिसून येतो. या विकाराशी संबंधित जनुके एक्स (X) गुणसूत्रावर असतात आणि त्या विशिष्ट जनुकांमध्ये उत्परिवर्तन झाल्यामुळे हा विकार होतो. स्त्रियांमध्ये दोन एक्स (X) गुणसूत्रे असतात. त्यांपैकी एक एक्स (X) गुणसूत्र वाहक असल्यास दुसऱ्या एक्स (X) गुणसूत्रामुळे त्यांतील जनुकीय दोषांचा परिणाम कमी होतो म्हणजे ते अप्रभावी ठरते. त्यामुळे स्त्रियांमध्ये या विकाराची लक्षणे कमी तीव्र असतात. स्त्रीच्या दोन्ही एक्स (X) गुणसूत्रांमध्ये दोष झाला, तर त्यांच्यात नेत्र विवर्णता उद्भवते. पुरुषांमध्ये एक्स (X) आणि वाय (Y) अशी दोन गुणसूत्रे असतात. पुरुषांच्या एक्स (X) गुणसूत्रात जर विवर्णता संबंधित दोष निर्माण झाला, तर हा विकार पुढच्या पिढीत उद्भवतो. नेत्र विवर्णता विकारात पेशींमध्ये मेलॅनीन निर्माण करणाऱ्या मेलॅनिनकाय या अंगकांची अपसामान्य वाढ होते.

विवर्णतेच्या दोन्ही प्रकारच्या विकारांमुळे डोळ्यांतील बाहुल्या गुलाबी रंगाच्या दिसतात, तर डोळ्यांच्या पापण्या रंगद्रव्यहीन रंजितपटलातील रक्ताद्वारे प्रकाश परावर्तित झाल्यामुळे लाल दिसतात. अशा व्यक्तींना तीव्र प्रकाशात नीट दिसत नाही. विवर्णतेमुळे काही दृष्टिविकार, उदा., दृष्टिपटलावर प्रकाश केंद्रित न झाल्यामुळे होणारा अबिंदुकता विकार, तीव्र प्रकाश सहन न होणे, डोळ्यांची होणारी अनैच्छिक हालचाल इ. संभवतात.

प्राण्यांमधील विवर्णता : प्राणी तसेच वनस्पती यांच्यातही विवर्णता विकार आढळून येतो. ज्या प्राण्यांमध्ये विवर्णता आढळतो असे प्राणी नैसर्गिक वातावरणात वेगळे उठून दिसत असल्यामुळे त्यांना अन्य शिकारी प्राण्यांपासून बचाव करणे कठीण असते. त्यामुळे विवर्णाभ प्राणी (अल्बिनो) हे प्राणिसंग्रहालयात संरक्षणाखाली वाढवितात. उदा., पांढरा हत्ती, पांढरा मोर, पांढरा ससा, पांढरा नाग, प्रयोगशाळेतील पांढरे उंदीर इत्यादी. परंतु हिमलांडगा आणि हिमअस्वल यांचा रंग पांढरा असला, तरी ती विवर्णतेची उदाहरणे नाहीत. त्यांच्यात पुरेसे रंगद्रव्य तयार झालेले असते आणि त्यात पिवळसर छटा असते.

वनस्पतींमधील विवर्णता : काही मोजक्या वनस्पतींमध्येही विवर्णता आढळते. त्यांच्यात हरितद्रव्य कमी असल्यामुळे त्यांची पाने व फुले पांढरी असतात. उदा., विवर्ण रेडवुड आणि विवर्ण ॲडर माउथ ऑर्किड. विवर्ण रेडवुड हा दुर्मीळ वृक्ष असून त्याचे काटे पांढरे असतात. हा वृक्ष शेजारच्या वृक्षांच्या मुळांपासून अन्न मिळवतो. विवर्ण ऑर्किड न्यू इंग्लंडमध्ये आढळते. त्याला फिकट हिरवी पाने व पांढरी फुले येतात. पानांमध्ये असलेल्या थोड्या हरितद्रव्यावर या वृक्षाचे पोषण होते. मक्याच्या पिकामध्ये तसेच कुरणांतील दुर्वांमध्ये क्वचित विवर्णता आढळून येते.