महासागराच्या पाण्याखालील भूकवचाच्या खंडीय क्षेत्राचे किनार्‍यापासून खंड-फळी, खंडान्त उतार व खंडीय उंचवटा हे तीन भाग करतात. सागरमग्न खंडभूमीच्या काठापासून ते खंडीय उंचवट्यापर्यंतच्या खंडाच्या काठाच्या उतरत्या भागाला खंडान्त उतार म्हणतात. खंड-फळीचा काठ ते अगाधीय मैदान यांच्या दरम्यानचा हा उतार असून तो १०० ते १,२०० मी. खोलीवरील महासागराच्या द्रोणीपर्यंत खाली गेलेला असतो. पृथ्वीवरील खंडान्त उताराची एकूण लांबी सुमारे ३ लाख किमी. आहे. खंड-फळी व खंडीय उंचवटा यांच्या तुलनेत खंडान्त उतार अधिक तीव्र असतो. खंडान्त उताराचे सरासरी प्रमाण म्हणजे ढाळमान (प्रवणता) ४.५० असून त्याचा पल्ला मात्र २ अंशापेक्षा कमी ते ४० अंशांहून अधिक असू शकतो. खंडान्त उताराची किमान प्रणवता मुख्य नद्या नसणार्‍या स्थिर किनार्‍यासमोरील भागांत, तर कमाल प्रवणता तरुण पर्वतश्रेणी व अरुंद खंड-फळी यांच्या समोरील किनारी भागांत असते. पॅसिफिक महासागरातील बहुतेक खंडान्त उतार अटलांटिक महासागरातील खंडान्त उतारापेक्षा अधिक तीव्र आहे; तर हिंदी महासागरातील खंडान्त उताराचे मान सर्वाधिक सपाट प्रकारचे आहे. जवळजवळ निम्मे खंडान्त उतार खोल सागरी खंदकांत किंवा अधिक उथळ खळग्यांत उतरत गेलेले आहेत. उरलेले बहुतेक खंडान्त उतार पंख्याच्या स्वरूपातील अवसादांत (गाळांत), त्रिभुज प्रदेशांत व खंडीय चढात गेलेले आढळतात. खंडीय भूकवच ते महासागरी भूकवच हे संक्रमण बहुधा खंडान्त उताराखाली झालेले दिसते. पाण्याखालील तीव्र उताराच्या अनेक खोल निदर्‍यांनी खंडान्त उतार कापला जाऊन दंतूर झाला आहे. या निदर्‍यांमधून विविध प्रकारचे अवसाद गुरुत्वाद्वारे खंडीय उतारापर्यंत वाहून नेणार्‍या वाहिन्या तयार झाल्या आहेत. काही निदर्‍या खंड-फळीतून सलगपणे गेल्या आहेत. तेथील समुद्रपातळी खाली गेलेली असतानाच्या कालावधीत आधीच्या नद्या होत्या. खंडीय उंचवट्यातील काही भागांतून निदर्‍या पुढे गेलेल्या असू शकतात. समुद्रपातळी खाली गेलेली असतानाच्या काळात खंडीय उंचवट्यावर अवसाद साचण्याची त्वरा जास्त असल्याने तेथे अवसाद मोठ्या प्रमाणात आला. नंतर तेथे अवसाद कमी प्रमाणात येत आहे.

गुरुत्वाद्वारे वाहून नेलेल्या अवसादातील कणांचे आकारमान अगदी भिन्न होते. चिखल ते रेती या आकारमानांच्या अवसादांचे विविध जाडी असलेले थर साचले. जाडी अंशतः कणांच्या आकारमानाशी व अंशतः तेथे येणार्‍या अवसादाच्या घनफळाशी निगडीत आहे. या थरांमध्ये कणांची आकारमानानुसार प्रतवारी झालेली दिसते. म्हणजे कणांचे आकारमान वरील दिशेत कमी होत गेलेले दिसते.

गुरुत्वाशिवाय अवसाद पुरविणारे दोन स्रोत आहेत. समोच्चता रेषांना समांतर वाहणारे, प्रवाह खंडीय काठाच्या काही भागांवर अवसाद निक्षेपत करतात. असे काँटुराइट खडक शेकडो मीटर जाड असू शकतात. प्लवकांची जीवाश्म कवचे हा अवसादाचा दुसरा स्रोत आहे. ही कवचे जलस्तंभांतून खाली येऊन सावकाशपणे साचतात. फोरँमिनी फोरा व कोकोलिथोफोर या आदिजीवांची कॅल्साइट व ॲरागोनाइट यांची कॅल्शियम कार्बोनेटीची कवचे आणि डायाटम व रेडिओलॅरिया या आदिजीवांची ओपलची म्हणजे सिलिकामय कवचे यात असतात.

समीक्षण : वसंत चौधरी