वॉरफील्ड, जॉन एन. : ( २१ नोव्हेंबर १९२५ – १७ नोव्हेंबर २००९ ) 

वॉरफील्ड यांचा जन्म अमेरिकेत मिसौरी राज्यात आणि उच्च शिक्षण कोलंबियातील मिसौरी विद्यापीठात झाले. त्यांनी तेथून गणित व विद्युत अभियांत्रिकीत पदवी आणि नंतर विद्युत अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी मिळवली. याच ज्ञानशाखेत वेस्ट लफाएट या इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठातून त्यांनी पीएच्.डी. पदवी प्राप्त केली.

त्यांनी अमेरिकेत सुमारे दहा वर्षे विविध कंपन्यांत काम करून सैद्धांतिक आणि प्रायोगिक संशोधन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे विकसन आणि जेट विमानासाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्रणालींची विश्वसनीयता तपासणे अशा कामांचा अनुभव घेतला. तेथे केलेल्या संशोधनावर त्यांना दोन एकस्वेही मिळाली. मात्र त्यानंतर वॉरफील्ड यांनी सुमारे ४५ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यात शेवटची २३ वर्षे जॉर्ज व्हर्जिनिया राज्यातील मेसन युनिव्हर्सिटीत त्यांची कारकीर्द घडली.

अभियांत्रिकी क्षेत्रात प्रत्यक्ष काम करताना त्यांच्या लक्षात आले की, प्रणाली व्यवस्थापनामध्ये व्यामिश्रता (complexity) हाताळण्यासाठी आवश्यक अशी तत्त्वे व तंत्रे यांच्या अभावामुळे योग्य धोरणे न वापरता सहसा सुचेल तो निर्णय घेतला जातो. म्हणून वॉरफील्ड यांनी व्यामिश्रता या संकल्पनेचा सखोल अभ्यास करून एक सैद्धांतिक गणिती चौकट निर्माण केली. त्याने व्यामिश्रता विज्ञानाची सुरुवात झाली. त्याची कल्पना अशी आहे. कुठल्याही प्रश्नाची किंवा परिस्थितीची पर्याप्त आणि अचूक व्याप्ती किंवा मिती (dimensions) लक्षात घेणे महत्त्वाचे असते हे त्यांनी मानले. तरी अशा प्रभाव टाकणाऱ्या शक्य तितक्या मितींचे चित्रण करण्यासाठी वॉरफील्डनी एक पद्धत विकसित केली. नंतर त्या सर्व मितींमधून महत्त्वाच्या मिती कोणत्या हे तपासून त्या सर्वांना योग्यप्रकारे हाताळेल असे उत्तर काढता येईल, हे त्यांनी दाखवले. विशेष म्हणजे या सर्व पायऱ्या पार पाडताना विषयतज्ञ तसेच अन्य लाभधारकही आपले मत त्या चौकटीत सहज मांडू शकतात आणि सर्वांच्या अनुभवाचा फायदा घेऊन सर्वमान्य उत्तरही मिळते. अशा तऱ्हेने वॉरफील्ड यांनी परस्परांवर प्रतिक्रिया करणारे व्यवस्थापन म्हणजे आय.एम. (Interactive Management) ही व्यवस्थापनाची नवी पद्धत पुढे आणली.

त्यांचे आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे १९७० च्या दशकात आय.एस.एम. (Interpretive Structural Modelling) या प्राथमिकता ठरवण्याच्या प्रारूपाची रचना करणे. वॉरफील्ड यांनी असे पहिले की मनुष्याची माहिती हाताळण्याची क्षमता मर्यादित असल्यामुळे अनेक बाबी एकाच वेळी सुसंगतपणे करणे शक्य नसते. तरी त्यांचा अग्रक्रम नीट लावल्यास संपूर्ण कार्य किंवा प्रकल्प सुरळीतपणे पार पडण्यास मदत मिळते. म्हणून त्यांनी त्यांच्या आय.एस.एम. पद्धतीत असे मांडले की दिलेल्या बाबींपैकी एकावेळी फक्त दोन बाबींची एकामेकांशी तुलना एका आगाऊ ठरवलेल्या नियमाने करायची. उदा., ‘अधिक महत्त्वपूर्ण’ किंवा ‘अधिक सुरक्षित’. समजा एकूण १५ बाबी आहेत; दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी बाब-१ ही बाब-२ पेक्षा अधिक ‘महत्त्वपूर्ण’ आहे का ? असा प्रश्न विचारायचा. त्याचे सर्वानुमते उत्तर ‘होय’ आल्यास १, उत्तर ‘नाही’ किंवा ‘ठरवता येत नाही’ असे आल्यास ०, असे सारणीमधील (१, २) या घरात मांडायचे. अशी तुलना सर्व बाबींची करून १५ x १५ अशी तुलना सारणी (Comparison Matrix) तयार होईल (तिच्या डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या मुख्य विकर्णावर म्हणजे (१, १), (२, २), .., (१५, १५) या घरांत १ असेल). तिच्यावर सारणी बीजगणित आणि आलेख सिद्धांतामधील (Graph Theory) गणिती संकल्पना व सूत्रे वापरून या बाबींचे एकमेकाशी संबंध एका आलेखाच्या रूपात मांडता येतात. तरी त्यातील सर्वात वरच्या बाबी प्रथम, नंतर त्याखालच्या स्तरावरील बाबी असे अग्रक्रमानुसार चित्र मिळते. स्पष्ट आणि अर्थपूर्ण चित्र देणारी आणि कोणालाही गणिती खोलात न जाता समजेल आणि वापरता येईल अशी ही आय.एस.एम. पद्धत आहे. बाबी किंवा घटकांचा असा अग्रक्रम संसाधनांचे इष्टतम वाटप करण्यासही मदत करतो. मूळ आय.एस.एम. पद्धती आता अधिक प्रगत केली गेली असून त्यासाठी अनेक संगणक आज्ञावली (software packages) उपलब्ध आहेत. तिचा उपयोग मागील ४० वर्षांत जगभर असंख्य व्यक्तिगत आणि सार्वत्रिक पातळीवर निर्णय घेण्यात झाला आहे.

वॉरफील्ड यांनी नंतर व्यामिश्रता विज्ञान, परस्परांवर प्रतिक्रिया करणारे व्यवस्थापन आणि आय.एस.एम. यांना एकत्र करून व्यापक संरचनाशास्त्र (Generic Design Science) याची उभारणी केली आणि १९९० साली या विषयावर पुस्तक प्रसिद्ध केले. याचा वापर गणिती चौकटीत, परंतु सर्वांना आपले मत, अनुभव सहजपणे मांडता येतील आणि मिळालेले उत्तर तपासता येईल, बदल करून बघता येईल, अशाप्रकारे कुठल्याही क्षेत्रात करणे शक्य झाले आहे. त्यांच्या योगदानाने प्रवर्तन संशोधन आणि व्यवस्थापनशास्त्रात नवे स्वागतार्ह प्रारूप उदयास आले.

वॉरफील्ड हे १९६८-७१ दरम्यान आयईईई ट्रान्झॅक्शन्स ऑन सिस्टिम्स, मॅअँड सायबरनॅटिक्स या जर्नलचे संपादक होते. तसेच सिस्टिम्स रिसर्च या जर्नलचे संस्थापक आणि मुख्य संपादक म्हणून १९८१-९० या काळात त्यांनी जबाबदारी सांभाळली. आयईईई सिस्टिम्स, मॅन अँड सायबरनॅटिक्स सोसायटी तसेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर द सिस्टिम्स सायन्सेस या प्रतिष्ठित संस्थांचे वॉरफील्ड अध्यक्ष राहिलेले आहेत.

वॉरफील्ड यांच्या नावावर ८ पुस्तके, तसेच १०० हून अधिक शोधलेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘इंटरनॅशनल एन्सायक्लोपिडिया ऑफ सिस्टिम्स अँड सायबरनॅटिक्स’च्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते.

त्यांना आयईईई सिस्टिम्स, मॅन अँड सायबरनॅटिक्स सोसायटीचे जोसेफ डब्ल्यू. वोल, हा दुर्मिळ आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. तसेच वॉरफील्ड यांना आयईईई थर्ड मिलेनियम पदक प्रदान करण्यात आले.

संदर्भ :

  • Klir, George J., “John N. Warfield (1925–2009): A Pioneer in the Systems Movement”, International Journal of General Systems, Vol. 39, No.2, 2010,pp. 213-214, DOI: 10.1080/03081070903541240
  • Simpson, J. J and Simpson, M., “John N. Warfield’s Systems Science Principles & Laws”, July 2010.
  • https://www.researchgate.net/publication/269996986

समीक्षक : विवेक पाटकर