आतड्याच्या प्रदाहक आजारांमध्ये क्रॉन आजार (Crohn’s disease) आणि व्रणकारी बृहदांत्रशोथ (Ulcerative colitis) अशा दोन आजारांचा समावेश होतो. यातील क्रॉनचा आजार हा तोंडापासून ते गुदाशय, गुदद्वारापर्यंत आतड्यांच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. तर व्रणकारी बृहदांत्रशोथामध्ये मोठ्या आतड्यात सूक्ष्म अगणित जखमा दिसून येतात. हा आजार फक्त मोठ्या आतड्यापुरता सीमित राहतो.

या दोन्ही आजारांचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मानसिक ताणतणाव ही या आजारांची कारणे नाहीत, परंतु ते आजार वाढविण्यास हातभार मात्र लावतात. या दोन्ही आजारांवर थोडे नियंत्रण मिळविता येते, परंतु ते पूर्णपणे बरे होत नाहीत. त्यांची तीव्रता मात्र उपचारांनी कमी करणे शक्य असते. औषधोपचाराविनाही या दोन्ही आजारांची तीव्रता कमी-जास्त होण्याचा कल असतो. हे आजार मनोकायिक आजारांच्या यादीत मोडतात का, यावरही संशोधन चालू आहे.

स्वयंप्रतिरोधक रोग (Autoimmune diseases) : शरीराची प्रतिकारशक्ती वापरून सूक्ष्मजंतू किंवा विषाणू यांपासून बचाव केला जातो. तसेच दुसरी व्यक्ती, प्राणी यांच्या पेशी, ऊती किंवा अवयव माणसांच्या शरीरात रोपण केल्या, तर त्यांच्यावरही आपली प्रतिकारशक्ती कडाडून हल्ला करते, त्यांना बाहेर फेकून किंवा मारून टाकले जाते. क्वचित प्रसंगी प्रतिकारशक्तीची आप-परभाव समजण्याची क्षमता कमी झाल्याने त्यांचाकडून स्वत:च्याच पेशींवर हल्ला केला जातो, त्यामुळे जे आजार निर्माण होतात त्यांना स्वयंप्रतिरोधक आजार असे म्हणतात. क्रॉनचा आजार आणि अंत:स्थ जखमांचा आजार हे स्वयंप्रतिरोधक आजारांच्या सदरात मोडतात का, यावरही संशोधन सुरू आहे.

बरिल क्रॉन (Bur rill Crohn) आणि सहकाऱ्यांनी १९३२ मध्ये या आजारावर संशोधन केले. त्यापूर्वी हा आजार आतड्यांचा क्षयरोग आहे अशा समज होता. सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करून त्याने क्रॉनचा आजार वेगळे असल्याचे सिद्ध केले.

क्रॉन आजार आणि व्रणकारी बृहदांत्रशोथ हे जास्त प्रमाणात प्रगत, पाश्‍चात्त्य लोकांमध्ये आढळतो. तसेच मूळव्याध, भगेंद्र हे गुदद्वाराचे आजारही त्यांच्यात जास्त प्रमाणात आढळतात. याची कारणमीमांसा करताना काही संशोधकांच्या मते, प्रगत देशातील लोकांच्या आहारात तंतुमय पदार्थ कमी असल्याने त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त असतो. तर अप्रगत देशातील लोकांच्या आहारात तंतुमय पदार्थ मुबलक असल्याने त्यांना बद्धकोष्ठता कमी आणि म्हणून मोठ्या आतड्याचे व गुदद्वाराचे आजार कमी असतात. विष्ठेचे प्रमाण जास्त असेल तर ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न बृहदांत्र/मोठे आतडे हालचाल वाढवून लवकर करतात. याउलट विकसित लोकांच्या आतड्यातील मलाचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या मोठ्या आतड्याची हालचालही मंदावते. बद्धकोष्ठतेमुळे आतड्याच्या अंत:त्वचा अधिक कालावधीकरिता मलाच्या संपर्कात येते. परिणामी त्यांच्यात आतड्यांचे दाहक आजारांचे प्रमाण अधिक असावे.

आजाराचे प्रमाण : सर्वसामान्य जनतेत क्रॉन आजार आणि व्रणकारी बृहदांत्रशोथ या आतड्याच्या दाहक आजाराचे प्रमाण ०.५ ते  २४.५ प्रति लाख असे दिसून येते. परंतु भारतात एक दशलक्ष लोकांत ते १ पेक्षाही कमी आहे.

लक्षणे : दाहक अशा क्रॉन आणि अंत:स्थ जखमांचा आजार या दोन्हींमध्ये पोटात दुखणे, पोट फुगणे, मळमळ, उलट्या, जुलाब, निशास्वेदन (Night sweats), तोंड येणे आणि ताप अशी लक्षणे आढळतात. आतड्यातून कमी-अधिक प्रमाणात आव आणि रक्त पडते. त्यामुळे थकवा, वजन कमी होणे, रक्तक्षय याही गोष्टी पाहण्यात येतात. गुदद्वाराशी जखमा किंवा भगेंद्र होऊ शकतात.

निदान : (१) विष्ठा तपासणी : यात आव, रक्त सापडणे, इतर जंतूंचा अभाव (अमीबा व इतर)

(२) क्ष-किरण, संगणकीकृत छेदचित्रीकरण (CT scan), अनुस्पंदन प्रतिमादर्शन (MRI) या तपासण्यांत आतडी एकमेकांना चिकटली असल्याचे किंवा त्याचा मार्ग अरुंद किंवा बंद झाल्याचे दिसून येते. आतड्यांच्या भिंती सूजेमुळे जास्त जाड दिसतात.

(३) कुपीबंद अंतर्दर्शन (Capsule endoscopy) : अलीकडे लहान कुपीमध्ये सूक्ष्म कॅमेरा ठेवून ती कुपी रूग्णास गिळावयास दिली जाते. कुपीमधील सूक्ष्म कॅमेऱ्याच्या साहाय्याने आतड्यांच्या आतील संपूर्ण छायाचित्रण केले जाते. नंतर गुदद्वारावाटे मलविसर्जनाबरोबर बाहेर टाकली जाते. ही कुपी नंतर स्वच्छ व निर्जंतुक करून पुर्नवापरासाठी सज्ज होते. मात्र या कुपीच्या साहाय्याने आतड्याचा छोटा तुकडा सूक्ष्म तपासणीसाठी घेता येत नाही.

(४) दोन्ही आजारांची खात्री करण्यासाठी आतड्यांची दुर्बिणीने तपासणी करून अंत:स्तराचा छोटा तुकडा काढून (Biopsy) त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी हा प्रभावी पर्याय आहे.

उपचारपद्धती : औषधोपचार  : या दोन्ही आजारांत चढ-उतार हाच त्यांचा स्थायीभाव आहे. मात्र धूम्रपान आणि ताणतणावांनी यांची असलेली तीव्रता नक्की वाढते. तेव्हा पोटदुखी, जुलाब, विष्ठेमधून आव-रक्त पडण्याचे प्रमाण वाढते. आजाराच्या उताराच्या काळात ही लक्षणे कमी होतात.

काही औषधांनी या आजारांची तीव्रता कमी होते. यात मेसॅलामाइन, सल्फासॅलॅझीन किंवा स्टेरॉइडे यांचा प्रथम बस्तीतून (Enema) प्रयोग केला जातो म्हणजे त्या औषधांचे दुष्परिणाम किमान होतात. परंतु त्यांचा पुरेसा उपयोग झाला नाही, तर हीच औषधे तोंडाने देतात. मेट्रोनिडॅझॉल किंवा सिप्रोफ्लॉक्झॅसीन ही प्रतिजैविके दुय्यम शोथकारक जंतुसंसर्ग (Secondary inflammatory infection) कमी होण्यासाठी उपयोगी पडतात.

प्रतिकारशक्तीरोधक औषधे (Immunosuppressants) : आपल्याच प्रतिकारशक्तीच्या समजुतीच्या घोटाळ्यातून आपली प्रतिकारशक्ती आपल्याच आतड्यावर जेव्हा हल्ला करते (AUTO IMMUNE), तेव्हा त्याला नियंत्रण करण्यासाठी ही औषधे वापरली जातात. परंतु त्यात रुग्णाची प्रतिकारशक्ती आपणच कमकुवत केल्याने इतर जंतुसंसर्ग किंवा कर्करोग होण्याची शक्यता वाढवण्याचा धोका आपण जाणीवपूर्वक स्वीकारलेला असतो. त्यांचे दुष्परिणाम वरचढ ठरले, तर मात्र ही औषधे बंद करावी लागतात.

या सदरात मोडणारी औषधे कॉर्टिकोस्टेरॉइडे, ६-मरकॅप्टोप्युरिन, मेथोट्रेक्सेट ही कर्करोगांवर वापरावयांची औषधे आहेत. हाडांच्या पोकळीत निर्माण होणाऱ्या रक्तपेशी, यकृताच्या पेशी, मेंदूच्या पेशी आणि बीजांडकोशातील वेगाने वाढणाऱ्या पेशींना अशी औषधे मारक ठरतात. त्यामुळे शरीरातील या सर्व कार्यांवर विपरित परिणाम कितपत होतो आहे, हे पाहण्यासाठी दक्ष रहावे लागते.

या विषारी औषधांचाही उपयोग आतड्याच्या दाहक आजारांसाठी झाला नाही, तर थोड्या काळासाठी इन्फ्लिक्सीमॅब (INFLIXIMAB-ANTIBODY ) नावाचे प्रतिपिंड वापरले जाते. हे सर्व उपयोग मूळ आजारांपासून रूग्णाच्या जीवितास धोका असेल, तरच करावेत. कारण त्यांचे दुष्परिणामही गंभीरच असतात.

नियंत्रणात्मक उपचार  : या प्रदाहक आंत्ररोगांवर गुणकारी असे औषध अद्याप सापडलेले नाही. काही औषधांमुळे या आजारांवर अंशत: ‍नियंत्रण करता येते परंतु संपूर्णपणे बरे होण्यासाठी कुठलाच उपाय उपलब्ध नाही.

(अ) आहार : या आजारांमध्ये जर आतड्यांना अर्धवट अडथळा (Obstruction) निर्माण झाला असेल, तर आहारात तंतुमय पदार्थ कमी असावेत असे दिसून येते. अशा वेळी आहार जास्त प्रमाणात पातळ परंतु पौष्टिक पदार्थांचा समावेश करतात. आतड्याच्या अडथळ्याचे प्रमाण जास्त असेल, तर तोंडाने काहीही सेवन न करता अन्न पूर्णपणे शिरेतून (Intravenous) दिले जाते. त्यातून प्रथिने, कर्बोदके, ब-१२ व फॉलिक अम्ल ही जीवनसत्त्वे दिली जातात. शरीराला अशा संपूर्ण आंत्रेतर पोषणावर (Total parenteral nutrition) ठेवावे लागते. त्यामुळे आतड्याला आवश्यक ती संपूर्ण विश्रांतीही मिळते.

(ब) लसीकरण : आतड्यांच्या या दोन्ही आजारांत रूग्णांना सर्वसामान्य माणसांना दिल्या जाणाऱ्या सर्व लसी देण्याची आवश्यकता असते. त्यात  घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला (DTP), न्यूमोनिया लहानपणी आणि त्यानंतर ठरावीक अंतराने पुनर्वृद्धी (Booster) मात्रा तसेच माणसांच्या पॅपिलोमा विषाणू (HPV) विरोधातील, विषाणूजन्य कावीळ (Hepatitis-A & B) प्रतिबंधक लस, मेंदू आवरण शोथ (Meningococcal), गोवर (Measles), गालगुंड (Mumps), रूबेला अशा अनेक आजार प्रतिबंधक लसी द्याव्या लागतात. फ्ल्यूची लस लहानपणी आणि त्याची पुनर्वृद्धी मात्रा नंतरही दरवर्षी द्यावी लागते.

क्रॉन आजार आणि व्रणकारी बृहदांत्रशोथ या आजारांमध्ये धूम्रपान पूर्णपणे निषिद्ध आहे.

गंभीर समस्या : क्रॉन आणि व्रणकारी बृहदांत्रशोथ यांकरिता गुणकारी औषध किंवा संपूर्ण बरे होण्यासाठी शस्त्रक्रिया देखील चांगला पर्याय देत नाहीत. परंतु या दोन्ही आजारांत गंभीर समस्या निर्माण होतात तेव्हा शस्त्रक्रिया अनिवार्य ठरते.

(१) आतड्यांच्या मार्गातील अडथळा (Obstruction) : लहान किंवा मोठ्या आतड्यांच्या पोकळीत अरुंदपणा येऊन किंवा आतडी बाहेरून एकमेकांस चिकटून पीळ पडून आतड्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. असे झाल्यास पोट दुखणे, फुगणे, उलट्या आणि संपूर्ण बद्धकोष्ठ या समस्या तातडीने दूर करण्यासाठी पोटाची शस्त्रक्रिया करावी लागते. जरूर तेव्हा आतड्याचा अरुंद झालेला, आजाराने खराब झालेला संपूर्ण भाग काढून टाकावा लागतो.

(२) आतड्यांभोवती किंवा गुदाशयाभोवती पोटात पू झाला तर तो काढून पोट, आतडी बाहेरून स्वच्छ धुऊन काढावी लागतात.

(३) आंत्र भगेंद्र (Internal fistulas) : आतडे-आतडे, आतडे-मूत्राशय किंवा स्त्रियांमध्ये आतडे-जननेंद्रिये यांच्यामध्ये अनैसर्गिक छिद्रांमुळे अंत:भगेंद्र अशा गंभीर समस्या निर्माण होते. तेव्हाही एक किंवा दोन टप्प्यात शस्त्रक्रिया करून रूग्णाचा जीव वाचवावा लागतो.

(४) क्रॉन आजारामध्ये काही वेळा गुदद्वारावर वेदनादायी जखमा किंवा अनेक भगेंद्रे निर्माण होतात तेव्हा शस्त्रक्रियेची गरज पडते.

(५) आतड्याला छिद्र पडून आतड्यातील मल संपूर्ण पोटात पसरतो तेव्हाही पर्युदरशोथासाठी (Peritonitis) तातडीची शस्त्रक्रिया एक किंवा दोन टप्प्यात करावी लागते.

६) क्रॉन आजार किंवा व्रणकारी बृहदांत्रशोथ यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. तेव्हा तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज पडू शकते.

(७) आतड्यांच्या अशा आजारात जेव्हा दीर्घ काळ दाहाने कर्करोगाचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा शस्त्रक्रिया करावी लागते.

(८) या आतड्याच्या आजारात इतर शारीरिक व्याधी होणेही संभवते. यात लाल त्वचा होण्याचा रोग (Erythema nodosum), डोळ्याचा असितपटलशोथ (Uveitis), संधिवात, यकृताचे आजार, पित्तवाहक नलिकांचा कर्करोग यांचा समावेश आहे.

थोडक्यात तुलनात्मकतेने लवकरच्या म्हणजे २५-३२ वर्षे या वयात होणारे हे दोन्ही आजार औषधांनी बरे होत नाहीत. या दीर्घकालीन आजारांवर शस्त्रक्रिया करूनही पूर्ण समस्या सुटत नाहीत.

पहा : कर्करोग; बृहदांत्र विपुटीविकार आणि विपुटीशोथ; व्रण.

संदर्भ :

  • ASHLEY CENCE et.al, ACS Surgery-7, Vol-2 Jaypee Brothers Mesical Publishers (P) Ltd., New Delhi – 2009.
  • John Alexander Williams, ABDOMINAL SURGERY CROHN’s DISEASE Of the Small Intestine Appleton & Lange, 1997.
  • Michel J. Zinner ABDOMINAL SURGERY, 10th Edition Appleton & Lange, 1997.
  • Michel J. Zinner, Seymour L. Schwarz Vol-II, ABDOMINAL OPERATIONS, 10th Edition Appleton & Lange, London A Simon & Schuster Company, 1997.
  • Daniel C Bangmart, M.D. SEMINAR/Vol. 380, Issue 9853, Nov. 03, 2012; USA.