इरिडियम : मूलद्रव्य

इरिडियम हे आवर्त सारणीतील गट ८ ब मधील घनरूप मूलद्रव्य आहे. इरिडियमची रासायनिक संज्ञा Ir अशी असून अणुक्रमांक ७७ आणि अणुभार १९२·२१  इतका आहे.

पार्श्वभूमी : ऑस्मियम या मूलद्रव्यासोबत इंग्लिश शास्त्रज्ञ स्मिथसन टेनंट यांना १८०३ मध्ये इरिडियमचा शोध लागला. फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ एच. व्ही. कोले-डेकॉटिल्स (H. V. Collet-Descotils), ए. एफ. फुर्क्रॉय (A. F. Fourcroy) आणि एन. एल. व्हॅक्लिन (N. L. Vauquelin) यांनी देखील इरिडियमाची ओळख करून दिली. परंतु टेनंट यांना इरिडियमाच्या शोधाचे श्रेय दिले जाते.

अम्ल अविद्राव्य अशा प्लॅटिनमच्या धातुकांवर प्रयोग करत असताना इरिडियम हे मूलद्रव्य सापडले. इरिडियमाची संयुगे ही विविध रंगी असतात. तेव्हा इंद्रधनुष्य या अर्थाच्या आयरिस या ग्रीक शब्दावरून या मूलद्रव्याला इरिडियम हे नाव योजण्यात आले.

इरिडियम : धातुके

आढळ : इरिडियम हे मूलद्रव्य पृथ्वीच्या कवचात अत्यल्प प्रमाणात (सु. ०.००१ पीपीएम) आढळते. इरिडोस्माइन, प्लॅटिनिरिडियम, ऑरोस्मिरिडियम ही इरिडियमची काही धातुके होत. इरिडियमची धातुके प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका आणि अलास्का (यू. एस.) येथे तसेच म्यानमार (बर्मा), ब्राझील, रशिया आणि ऑस्ट्रेलिया येथे देखील सापडतात.

प्राप्ती : इरिडियम हा प्लॅटिनम गटातील असून, तो नेहमी प्लॅटिनमच्या धातुपाषाणात सापडतो. १८०४ मध्ये स्मिथसन टेनंट यांनी ती शोधून काढली. प्लॅटिनमच्या निष्कर्षणामध्ये (Extraction) मिळणारे ऑस्मिरिडियम द्रव्य जस्ताबरोबर वितळवून नंतर ते हायड्रोक्लोरिक अम्‍लाबरोबर शिजविल्याने बारीक पूड मिळते. ही पूड क्षारीय ऑक्सिडीकारक अभिवाहाच्या योगाने वितळवून अम्‍ल-विद्राव्य स्थितीत आणतात. हीच कृती पुन:पुन्हा करतात. नंतर विद्राव्य सोडियम क्लोरोइरिडेट बनवितात. त्यापासून अविद्राव्य अमोनियम किंवा पोटॅशियम क्लोरोइरिडेट तयार करतात. ते तापविले म्हणजे धातुरूप इरिडियम मिळतो.

शिशामध्ये सोने वगैरे अभिजात धातू विद्राव्य आहेत, परंतु इरिडियम अविद्राव्य असल्यामुळे या गुणधर्मांचा उपयोग करून इरिडियम विलग करतात.

इरिडियम : भौतिक गुणधर्म

भौतिक गुणधर्म : इरिडियम हा धातू रुपेरी रंगाचा असून हवेमध्ये तो गंजत नाही. तीव्र उष्णता दिल्यास थोडेसे बाष्पनशील असलेले ऑक्साइड तयार होते. प्रबल अम्‍लांचा व सामान्य तापमानास अम्‍लराजाचाही (Aqua regia) परिणाम या धातूवर होत नाही.

इरिडियमच्या गटातील इतर धातूंबरोबर व विशेषत: प्लॅटिनमाबरोबर त्याच्या मिश्रधातू बनविता येतात. इरिडियमाचा विद्राव करण्यासाठी क्षारीय (Alkaline) ऑक्सिडीकारक (Oxidising agent) अभिवाह (पदार्थाचा वितळबिंदू कमी करण्यासाठी त्यात मिसळलेला पदार्थ) वापरून तो वितळविणे जरूर असते. इरिडियमची 164Ir ते 202Ir यादरम्यान ३७ कृत्रिम किरणोत्सर्गी (Radioactive) समस्थानिके आहेत.

रासायनिक गुणधर्म : सहसंयुजी (दोन अणूंत इलेक्ट्रॉनांची भागीदारी असणारे) संयुग घडविण्याकडे इरिडियमाचा अतिशय कल आहे.

हेक्झाक्लोरोइरिडेट [IrCl6]2-, हेक्झाब्रोमोइरिडेट [IrBr6]2- ही इरिडियमची (+४) आयनिक संयुगे होत. रुथेनियम आणि ऑस्मियम यांपेक्षा इरिडियम हे अधिक क्रियाशील आहे.

 उपयोग : इरिडियमच्या न गंजण्याच्या गुणामुळे ऑक्सिडीभवन होणार नाही, अशा वातावरणात उच्च तापमानासाठी वापरण्यात येणाऱ्या मुशींकरिता तो वापरतात. जेथे शुद्ध प्लॅटिनम मऊ असल्यामुळे वापरता येत नाही, तेथे प्लॅटिनम-इरिडियम यांचा कठीण असलेला मिश्रधातू वापरतात. हा मिश्रधातू दागिने तयार करण्यासाठी तसेच विद्युत उपकरणांतील रोधक तारा, विद्युत अग्रे इत्यादींसाठी वापरतात. ऑस्मियम व इरिडियम यांच्या मिश्रधातूचा फौंटनपेनांची निबे बनविण्यासाठी उपयोग करतात. इरिडियम -१९२ या किरणोत्सर्गी समस्थानिकाचा कर्करोगावरील उपचारासाठी उपयोग करतात.

संदर्भ :