येर्सिन, अलेक्झांडर इमिल-जाँ : ( २२ सप्टेंबर १८६३ – १ मार्च १९४३ ) अलेक्झांडर येर्सिन यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील लावशमध्ये (Lavaux) झाला. शिक्षणासाठी फ्रान्समध्ये गेल्यानंतर  त्यांनी फ्रेंच नागरिकत्व स्वीकारले. अलेक्झांडर येर्सिन ह्यांच्या वडिलांचे नावही अलेक्झांडर येर्सिन असेच होते. यूरोपमध्ये अशा पितापुत्रांना सिनियर व ज्युनिअर असे म्हणण्याची पद्धत आहे. सीनियर अलेक्झांडर येर्सिन शाळेत निसर्ग विज्ञानाचे शिक्षक होते. ज्युनिअर अलेक्झांडर यांच्या जन्मापूर्वी केवळ दोन आठवड्यापूर्वी त्यांच्या वडलांचे निधन झाले.

येर्सिन ज्यु. यांचे वैद्यकीय शिक्षण जर्मनीतील मारबर्ग विश्वविद्यालय आणि फ्रान्समधील पॅरिस विश्वविद्यालयात झाले. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांना विकृतीशास्त्रात आणि रोग संक्रमणात रस वाटू लागला. विकृतीशास्त्र प्रयोगशाळेत रेबीजमुळे मृत झालेल्या  रोग्याच्या शरीरातील भाग निदानासाठी काढताना त्यांना जखम झाली. त्यानंतर  लुई पाश्चर ह्यांच्या संस्थेत रेबीजवरील ते  उपचारासाठी गेले. तेथे इमील रूह् यांनी  प्रायोगिक अवस्थेतील रेबीजविरोधी लस त्यांना टोचली. त्यामुळे ते बरे झाले. रेबीज विरोधी कामासंबंधीच्या आवडीमुळे येर्सिन यांनी लुई पाश्चर यांच्याबरोबर काम केले.  त्यांचे काम मुख्यतः क्षय आणि घटसर्पाभोवती केंद्रित झाले होते. क्षयाच्या जीवाणूंवरील संशोधनाबद्दल येर्सिन यांना पीएच्. डी. मिळाली.

इमील रूह् आणि अलेक्झांडर येर्सिन या दोघांनी लुई पाश्चर यांनी बनवलेली आलर्क (Rabies) रोधी लस रक्तद्रव्य वापरून अधिक  प्रभावी केली.

इमील रूह्  (Émile Roux),अल्बर्त काल्मेत (Albert Calmette) आणि अमेदी बॉरल (Amédée Borrel) या तिघांनी घटसर्पाची लक्षणे जीवाणूंनी नाही तर, जीवाणूंनी निर्माण केलेल्या जीवविषांमुळे (toxin) दिसू लागतात असे सप्रयोग  सिद्ध केले. या तिघांनी येर्सिन यांच्या मार्गदर्शनाखाली जगात प्रथमच प्लेगविरोधी लस तयार केली. यातूनच पुढे प्लेग प्रतिबंधक आणि प्लेगविरोधी उपचारांना दिशा मिळाली.

येर्सिन यांनी १८९४ मध्ये ब्यूबॉनिक प्लेगच्या (गाठीचा प्लेग) जीवाणूचा  शोध लावल्यामुळे नव्या वर्गीकरणात त्याला येर्सिनिया असे संबोधण्यात येते. शिबासाबुरो किटासातो  या जपानी सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञांनी त्याच वर्षी स्वतंत्ररित्या हे सूक्ष्मजंतू ओळखले होते. येर्सिन यांनी प्लेगपिडित उंदीर आणि प्लेग पिडीत माणसाच्या शरीरात सापडणारा जीवाणू एकच आहे हे ही शोधून काढले.

आग्नेय चीनमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव झाला तेव्हा येर्सिन ह्यांना  तो आटोक्यात आणण्यासाठी पाठवण्यात आले. येथील प्लेगचे जीवाणू अतिप्रभावी होते. संसर्ग झालेले ९५% रुग्ण लक्षणे दिसू लागताच मृत्युमुखी पडत. अशा स्थितीत काम करून येर्सिन ह्यांनी प्लेगचे जीवाणू वेगळे  करून प्लेगविरोधी लस तयार केली.

न्हा त्रांग ह्या सध्याच्या व्हिएतनाममधील गावी  येर्सिनयांनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी एक प्रयोगशाळा स्थापन केली. तेथे  मका, तांदूळ, कॉफी, रबर आणि क्वीनिन (Quinine) देणाऱ्या सिंकोनाच्या (Cinchona ledgeriana) झाडांचीही लागवड केली. माणसे, गुरे ह्यांच्या प्लेग, पटकी (cholera), धनुर्वात (tetanus), देवी (small pox) या रोगांवर अभ्यास संशोधन आणि उपचार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

शेवटी न्हा त्रांग या  त्यांच्या व्हिएतनाममधील  कर्मभूमीत अलेक्झांडर येर्सिन यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा