महाराष्ट्रातील गडचिरोली ,भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनी व्याप्त झाडीपट्टी बोलीभागातील लोकप्रीय लोकनाट्य . मुळात हे लोकनृत्य होते कालांतराने त्यात नाट्याचा अंतर्भाव झाला. आठ -दहा नर्तकांनी हातात टाहारा नावाची दीड फूट लांबीची काठी घेऊन केलेला नाच हे या लोककलाप्रकाराचे एकमेवाद्वितीय वैशिट्य आहे. झाडीपट्टीत शेताला दंड, तर झाडाच्या फांदीला डार म्हटले जाते. शेतातील पिकलेला शेतमाल घरी आल्यानंतर शेतकरी आनंद व्यक्त करण्यासाठी समूहनृत्य करीत असावेत. यातून दंडार अवतरली, असे सांगितले जाते. ढढार, दंढार आणि गंडार या संज्ञादेखील दंडारसाठी रुढ आहेत.
झाडीबोली परिसरात दिवाळी पासून पुढील पंधरा दिवस मंडई नावाची यात्रा असते. यावेळी दंडार या लोकनाट्याचा जलसा भरतो. दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत हे दंडार नाटय चालू असते. रात्री सादर होणारी दंडार आणि दुपारी सादर होणारी दंडार यांमध्ये तफावत असते. या वरून दंडार लोकनाट्याचे प्रकारही पडतात . बैठी दंडार, खडी दंडार आणि परसंगी दंडार असे ते प्रकार होत. भडकी दंडार (पूर्व विदर्भ ) आणि भटकी दंडार (आदिवासी जमाती) हे प्रकार देखील प्रचलित आहेत. दुपारी सादर होणारी दंडार ही अर्थातच खाडी दंडार असते. या दंडारीत नाचासोबत विनोदी असे खडे सोंग दाखविले जाते. या सोंगांना झडती असे नाव आहे. रात्री नाट्य प्रवेशासारखे प्रवेश दाखविण्याकडे कल असतो. या दंडारीला परसंगी असे नाव आहे. अन्य प्रसंगी एखाद्या दिवाणखान्यात बसून दंडारीतील लावण्यांचे गायन होते, ती बैठी दंडार होय.
दंडारीत सात-आठ नर्तक पायात घांगऱ्या बांधून आणि उजव्या हातात टाहारा धरून नाचतात. त्यांच्या मागे लावणी गाण्यात तरबेज असणारा शाहीर, ढोलकी वाजविणारा ढोलक्या, चोनके वाजविणारा चोनक्या, टाळकरी आणि री ओढणारा सहायक असतो. ही सारी मंडळी झिलकरी या नावाने ओळखली जातात. प्रथम गण गायीला जातो. त्यानंतर सूत्रधार प्रवेश करतो. त्याच्या नंतर विदूषक येतो. सूत्रधार आणि विदूषक यांच्या संवादातून दंडारीचे उद्दिष्ट स्पष्ट केले जाते . श्रीगजाननाला आवाहन केले जाते . तत्पूर्वी दंडारातील पात्र सदारंगलाल आणि सदागुलज़ार झाडझूड आणि सडासंमार्जन करून रंगभूमी शुचिर्भूत करतात . श्रीगजानन येऊन कार्य सिद्धीस जाण्याचा आशीर्वाद देतात आणि येथे दंडारीचा पूर्वरंग समाप्त होतो. त्यानंतर झडत्या सादर होतात. उत्तररात्री परसंगी दंडार प्रारंभ होते. हेच श्रोत्यांचे प्रमुख आकर्षण असते. या भागात रामायण आणि महाभारत यावर आधारित प्रसंग सादर केले जातात. या दंडारीची संहिता क्वचितच आढळते. दंडारीतील या सादरीकरणावर कवी श्रीधर यांच्या पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय या ग्रंथांचा प्रभाव प्रामुख्याने आढळून येतो . दंडारीच्या सादरीकरणात महिलांचा समावेश झालेला नाही. आजही दंडारीत महिलांची कामे पुरुषच करतात.
दंडारीत विविध प्रकारच्या लावण्या सादर करण्यात येतात . त्यांचे सिनगारी,पाखंडी,लस्करी,रामायनी,ऐतिहासिक आणि सामाजिक असे प्रकार पडतात. हे सारे शब्द दंडारकर्मीनी पाडलेले आहेत. सिनगारी लावणीत नावाप्रमाणे श्रुंगार वर्णन केलेला असतो. हा शृंगार सामान्यतः सर्वसामान्यांच्याअभिरुचीच्या कक्षेतील असतो. शृंगार भडक असेल तर अशा वर्णनाने युक्त लावणीस पाखंडी लावणी असे नाव देण्यात येते . रामायनी लावणीत रामायणातील प्रसंगाचे वर्णन असते. ऐतिहासिक लावणीत महाभारतातील प्रसंगाचे वर्णन असते. समकालीन सामाजिक मुद्देही लावण्यात मांडले जातात,अशा लावण्या सामाजिक लावण्या समजल्या जातात .दंडार या लोकनाट्याचा झाडीबोली विभागातील लोकजीवनावर विशेष प्रभाव आहे. बदलत्या काळाबरोबर हा रंजनप्रकार लयास जाण्याची दुश्चिन्हे आहेत; परंतु झाडीबोली चळवळीच्या माध्यमातून या लोककला प्रकाराच्या पुनरुज्जीवनाचे यशस्वी प्रयत्न होत आहेत.
संदर्भ :
- बोरकर, हरिश्चन्द्र, झाडीपट्टीची दंडार, भंडारा ,१९९९.