होळीच्या दिवसात गोवा आणि कोकणात सादर केला जाणारा एक प्रमुख लोकोत्सव. या उत्सवात  फक्त पुरुष सहभागी होऊन पारंपरिक संगीत,नृत्य,अभिनय आणि हस्तकलांचे आविष्करण घडवितात. मूळ संस्कृत सुग्रीष्मक या शब्दापासून शिगमो या शब्दाची उत्पत्ती सुगिम्मअ,सुगीम्म,शिगमो अशी झाली,असे मानतात.कोकणात आणि महाराष्ट्रात याला शिमगा म्हणतात.गोव्यातील शिगमो हा कष्टकरी समाजाचा महत्त्वपूर्ण लोकोत्सव आहे. दक्षिण गोव्यात या शिगम्याला ‘धाकटो शिगमो’ आणि उत्तर गोव्यात ‘व्हडलो शिगमो’ म्हणतात. दक्षिण गोव्यातील शिगमो फाल्गुन शुद्ध नवमीला सुरू होऊन पौर्णिमेला संपतो, तर उत्तर गोव्यातील उत्सव पौणिमेला सुरू होऊन रंगपंचमीला समाप्त होतो.काही गावातून तो पुढील दहा दिवसांपर्यंत चालतो.

शिगमो मांडावर नमन घालून सुरू होतो.मांड म्हणजे गावाच्या सामूहिक मालकीची मध्यवर्ती ठिकाणी परंपरेने राखून ठेवलेली  पवित्र जागा.मांडागुरू स्थळाचे दैवत.गावातील सगळी पुरुषमंडळी नवमीच्या संध्याकाळी मांडावर जमून तेलवात लावतात आणि मांडागुरू तसेच स्थानिक दैवते व ग्रामदैवताला आवाहन करतात.नमनाच्या गीताला शिवड किंवा शिंवर असे म्हणतात.ते गायन चालू असताना काही व्यक्तींच्या अंगात येते. त्यांना गडे असे म्हणतात.गड्यांना त्यांचे सहकारी सावरतात. नमनाचे लांबलचक गायन संपल्यावर घुमट, शामेळ, कांसाळे, सनई, सूर्त या वाद्यांचे वादन करून तालगडी, चौरंग,ताळो,ताणयांमेळ,गोफ,मोयलो असे विविध लोकनृत्यप्रकार सादर करतात.नंतर दुसऱ्या दिवसापासून हे सर्व लोकनर्तकपथक गावातील प्रत्येक घरासमोरील सजविलेल्या अंगणात आपल्या नृत्य प्रकारांचे आविष्करण करते.अशा या पथकाला ‘मेळ’ असे म्हणतात.गावातील प्रत्येक वाड्याचा जसा वेगळा मेळ असतो,तसाच तो वेगवेगळ्या जमातींचाही असू शकतो.काही मेळांची स्वतःची गुढी असते.फोंडा तालुक्यातील बहुतेक मेळांकडे अशी गुढी असते. ती गावच्या मेळाच्या मानाचे प्रतीक मानल्याने तिचा योग्य तो मानमरातब सर्वत्र राखला जातो.फोंडा तालुक्यातील मेळ मोठ्या आकाराचे ढोल, तासे, कांसाळी, झांजा, कर्णो, बांको, शिंग, जघांट ही वाद्ये वाजवीत मिरवणुकीने ग्रामदैवताच्या मंदिरापर्यंत जातात,याला रोमट असेही म्हणतात.मंदिरातील सभामंडपात तालगडी अथवा चौरंग-ताळे खेळून गावाच्या परिक्रमेसाठी निघतात.प्रत्येक अंगणात मेळ विविध लोकनृत्ये सादर करतात.मिरवणूक निघताना लहान-मोठ्या गुढ्या, पताका, तोरणे, अब्दागीर, झाडांच्या डहाळ्या,रानफुलांचे गेंद इत्यादी हातात घेऊन नृत्य करत असतात. तसेच राम,सीता,हनुमान, कृष्ण, राक्षस अशी पौराणिक तसेच शिवाजी, मावळे, संतपुरुष अशी ऐतिहासिक पात्रे आणि धनगर,अस्वल,गवळण,वानर,मद्यपी अशी सोंगे असतात.कधीकधी मुखवटे घालून चेष्टा करणारे कलाकार त्यात सामील झालेले असतात.रोमटातील खेळगडे लयबद्ध पदन्यास करताना विविध लोकगीते म्हणतात. ‘चानयेचया पिला तुका तीन गो पाट। रावणान शिते व्हेल्या दाखय वाट’ किंवा ‘विटेवरी उभा कटेवरी हात। काय मौजेचा पंढरीनाथ’ अशी दोन ओळींची गीते असतात. चालताना ते ‘ओस्सय-ओस्सय’ असे म्हणत असतात.ठरलेल्या कालावधीत गावाची परिक्रमा पूर्ण करून मेळ मांडावर परत येतात.तेथे लोकनृत्यांचे सादरीकरण होते. पुन्हा एकदा शिवड गायला जातो. तेव्हा गड्यांच्या अंगात येऊन ते शुद्ध हरपतात.त्यांना शुद्धीवर येईपर्यंत सावरण्यात येते. काही मांडावरील असे अंगात आलेले गडे स्मशानात जाऊन प्रेतांचे अवशेष घेऊन परततात. ते थेट जवळच्या पाणवठ्यावर जाऊन अंघोळ करून मांडावर अथवा मंदिरात जातात.काही गावांतून होळी पेटवलेली असते. त्या आगीतून चालत जातात. अशा प्रसंगी काही मांडांवर ‘गड्या रामायण’ नावाची रामकथा गातात. साळ या डिचोली तालुक्यातील गावात ‘गडे’ हा विधी उत्सवाच्या स्वरूपात साजरा करतात.गावातील गड्यांना देवचार ही अतिमानवी शक्ती जंगलात नेऊन लपविते आणि त्यांना गावचे लोक शोधून आणतात,असे श्रद्धापूर्वक सादरीकरण शिगम्याच्या उत्सवात होते. गोव्याच्या शिगमोत्सवात सादर केल्या जाणाऱ्या लोकनृत्यांमध्ये खूप वैविध्य सापडते.ती लोकनृत्ये पुढीलप्रमाणेः

विरामेळ : वीर म्हणजे गावचे दैवत.त्या दैवताचा संचार शिगमोत्सवाच्या वेळी संपूर्ण गावातून होतो. यात युद्धसदृश्य सादरीकरण करणाऱ्यांचा भरणा असतो.त्यात तीन-चार व्यक्तींच्या हातात नंग्या तलवारी असतात.वेळीप जमातीचा गडी हातात मोरपिसांचा भलामोठा जुडगा घेऊन, तर भगत हातात तलवार घेऊन सामील होतो. मोरपिसांच्या जुडग्याला ‘पिल्लकुचा’ म्हणतात. सोबतीला ढोल, ताशा, शिंग आणि जघांट ही वाद्ये वाजतात.विरामेळ घरासमोरील अंगणात येऊन तलवारी फिरवत नृत्य करतात. वाद्यांचे वादन गती पकडते,तेव्हा पिल्लकुचा घेतलेल्याच्या अंगात येते.त्याला ‘मोड’ असेही म्हणतात. भगत आपल्या हातातील तलवार जोरात फिरवून थांबतो.नंतर तलवार घेतलेले दोघेजण थरारक नृत्य करतात. काही ठिकाणी धारदार तलवारी मांडून त्यावर गड्याला झोपवितात आणि त्याच्या पाठीवर नृत्य केले जाते.याला ‘कातर’ असे म्हणतात. मेळाला कुटुंबाकडून पाच नारळ आणि तांदूळ दिले जातात. मेळ दुसऱ्या अंगणात निघतो. विरामेळाची परंपरा दक्षिण गोव्यातील काणकोण आणि सांगे तालुक्यांत असून या परंपरेचा उगम आदिम काळातील नरबळीच्या प्रथेतून झाला असावा.

तालगडी, तोणयांमेळ, चौरंग, ताळो, ताणयांखेळ, जोत(आरती), गोफ : थोड्या-फार फरकाने ही लोकनृत्ये गोव्यातील शिगमोत्सवात पुरुषकलाकार सादर करतात.घुमट, शामेळ, कांसाळे यांच्या साथसंगतीने लोकगीते गात, हातांत रंगीबेरंगी रुमाल घेऊन नर्तकांच्या जोड्या फेर धरून नाचतात. अधूनमधून ‘भले भले’ असे म्हणत ज्या कुटुंबाच्या अंगणात नृत्य चालू असते त्या कुटुंबाचे भले इच्छितात. तोणयां मेळमध्ये रुमालाऐवजी लाकडी टिपऱ्या हातांत घेऊन एकमेकांच्या टिपरीवर ठोका देऊन द्रुत गतीचे नृत्य करतात. चौरंग नृत्यात एखाद्या गीतकथेच्या तालावर संथ गतीने फेर धरला जातो. शेवटी द्रुत गतीचे कवन गाताना त्या तालावर नृत्य करून थांबतात. या जलद गतीच्या गीत आणि नृत्याला ताळो किंवा तळी असेही म्हणतात.ज्या अंगणात मांडव घातलेला असतो, तेथे मांडवाच्या आढ्याला गोफ बांधून त्याच्या आठ किंवा बारा रंगीत दोऱ्या हातात घेऊन लोकगीतांच्या व वाद्यांच्या ठेक्यावर गोलाकार नृत्य करतात. यांतील बहुतेक गीते कृष्णासंबंधीची असतात. नृत्य करताना गोफ विणला जातो. ठरावीक संकेतानुसार गोफाची वीण नृत्य करीत सोडविली जाते. वेगवेगळया नृत्यानुसार गोफाची वीण विविध प्रकारे साकारते. दक्षिण गोव्यात हा नृत्यप्रकार खूप लोकप्रिय आहे. समईमध्ये तेलवात घालून ती पेटती समई आपापल्या डोक्यावर ठेवून अलगद नृत्य सादर केले जाते. त्याला ‘दिवल्यां नाच’ असे म्हणतात. नर्तक डोक्यावरील समई खाली पडू न देता विविध कसरती करून आपले तोल सावरण्याचे कौशल्य दाखवितात.या नृत्याला काही ठिकाणी तबला आणि हार्मोनियमची साथसंगत असते. ‘तोणयां खेळ’ हा प्रकार सासष्टी तालुक्यातील ख्रिस्ती गावडा जमातीचे पुरुष कलाकार इंत्रूज या उत्सवात घुमट, म्हादळें,कांसाळे यांच्या साथीने कृष्णगीते गाऊन सादर करतात. या गोलाकार नृत्यात पुरुष व स्त्री अशा जोड्या जमवून हातांत सुमारे दोन-तीन फूट लांबीचे दंडुके (तोणी) घेऊन ते एकमेकांच्या दंडुक्यांवर आपटून नृत्य करतात. स्त्रियाच्या भूमिका पुरूष करतात.

घोडेमोडणी : उत्तर गोव्यातील बोर्डे, कुडणे,ठाणे,मोरजी, कासारपाल,नातोडा इत्यादी गावांतून शिगमोत्सवात घोडेमोडणी हे वीरश्रीयुक्त घोडा-नृत्य करतात.गावातील निवडक दोन ते पाच पुरुष वीरयोद्धाचा पोषाख घालतात. बांबूच्या कामट्यानी बनविलेल्या इरल्याला घोड्याचा लाकडी मुखवटा बांधून तो रंगीत लुगडी व फुलांनी सजवितात.योद्धाच्या डोक्यावर फुलांनी सजविलेले पागोटे असते. सजविलेला घोडा योद्ध्याच्या कमरेला बांधून हातात तलवार घेऊन युद्धनृत्य करतात.ढोल,ताशे, शिंग, कांसाळे या वाद्यांच्या तालावर ही घोडेमोडणी मिरवणूक गावाच्या मंदिरापर्यंत किंवा वेशीपर्यंत जाऊन येते.काही वेळा दोन घोडेस्वार एकमेकांना भिडतात. तेव्हा त्यांचे साथीदार त्यांना आवरतात. काही घोडेमोडणीत वेगवेगळी ऐतिहासिक पात्रेही आणतात.

गजानृत्य : शिगमो आणि दसऱ्याच्या निमित्ताने धनगरजमात गजानृत्य करते. सर्व पुरुष लांब सफेद पायघोळ चोळणा घालतात त्यावर हाताच्या पंजाकृती लाल रंगात रंगविलेल्या असतात. डोक्याला सफेद मुंडासे, कमरेला शेला, गळ्यात कंठा, हातात कडे, कानात बाळी, पायांत वाक्या आणि हातात वेतकाठी घेऊन गोलाकार नृत्य करतात. नृत्याला ढोल, ताशा, थाळी व घुमट ही तालवाद्ये आणि कोंडपावा तसेच सुरपावा ही स्वरवाद्ये असतात. ‘होरबला’ आणि ‘चांगबला’ अशी हाकाटी देत गिरक्या मारून वेगवेगळ्या हस्तमुद्रा करीत नृत्य रंगत जाते.

राधाकृष्ण नाच : धनगरपुरुष राधेचा वेश करतो व कृष्णाच्या वेशातील पात्राबरोबर घुमट तसेच झांजीच्या साथीवर गायलेल्या गीतांच्या तालावर नृत्य करतो. ही गीते संवाद-गीते असतात. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यात हा राधा-कृष्णनृत्य प्रकार शिगमोत्सवात सादर होतो.

मोरूलो : शिगमोत्सवात सादर होणारे मोराच्या पदन्यासांसारखे नृत्य. रंगीत वेश परिधान करून मोराविषयीचे गाणे गात मोरासारख्या दुडक्या चालीने हे गोलाकार नृत्य पुरुष सादर करतात. कधीकधी उकीडवे बसूनही नृत्य करीत रांगेत पुढे सरकतात.या नृत्याला घुमट, शामेळ,कांसाळे यांची साथ असते. काही ठिकाणी पखवाज आणि हार्मोनियम साथीसाठी वापरतात.

आरती, जोत, सकारत, करवल्यो : अंगणात येणारा शिगम्याचा मेळ आपल्या नृत्यप्रकाराच्या शेवटी एखादी वर्णनपर गीतकथा गात संथ चालीवर फेर धरतो. त्या वेळी घरातील सवाष्ण बाई एका तबकात पेटवलेले निरांजन, नारळ, पानांचा विडा, तांदूळ आणि गूळ ठेवून ते तबक एखाद्या खेळगड्याच्या हाती देते. तिला तळी किंवा आरती असे म्हणतात. त्या वेळी गायल्या जाणाऱ्या गीतालादेखील आरती,जोत किंवा वळ असे म्हटले जाते. आरती संपताना सर्वजण घरच्या मंडळीना आणि खासकरून सवाष्णीला शाश्वत अहेवपणचा आशीर्वाद देतात. करुण गानकथेच्या तालावर फेर धरून नाचण्याची परंपरा डिचोली आणि सत्तरी तालुक्यांत आहे. या गीतनृत्याला सोकारत अथवा सकारत असे म्हणतात. दोन लहान मुलांना लुगडे नेसवून त्यांना खांद्यावर घेऊन गावातून मेळासोबत फिरवून त्यांचा मानपान केला जातो.त्यांना करवल्यो किंवा करावल्या असे म्हणतात.

शिगम्याच्या उत्सवात फोंडा आणि सांगे भागांत नवरदेवाची मिरवणूक निघते.त्याला ‘न्वहरो’ असे म्हणतात.नवरदेव नटून-थटून नवरीकडे निघतो. परंतु वाटेत प्रेतयात्रा आडवी येते.त्या अभद्र प्रसंगामुळे घाबरून नवरदेव पळ काढतो. गोव्याच्या शिगमोत्सवातील पहिला शिगमो तिसवाडी तालुक्यातील डोंगरी या गावी फाल्गुनऐवजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पहिल्या शुक्रवारी इंत्रूज या नावाने साजरा होतो. (पहा-इंत्रूज) गावागावातील शिगमोत्सव वेगवेगळ्या विधींनी समाप्त होत असला, तरी बहुतेक ठिकाणी धुळवडीने त्याची समाप्ती होते. धुळवडीच्या वेळी गुलाल उधळण्याची परंपरा आहे. मात्र हा गुलाल फक्त पुरुषांच्या अंगावर उधळण्यात येतो. दक्षिण गोव्यातील जांबावली या गावच्या शिगम्याचा ‘गुलाल’ प्रसिद्ध आहे.

शिगमोत्सवाला भारत सरकारने राष्ट्रीय उत्सव म्हणून मान्यता दिली असून संस्कृतिसंवर्धन आणि पर्यटनाला उत्तेजन देण्याच्या हेतूने गोवा शासनाने १९८९ सालापासून राज्यपातळीवर शिगमोत्सव साजरा करण्याची योजना कार्यरत केली. त्यात चित्ररथ आणि लोकनृत्यांच्या पथकांचा मोठा सहभाग असतो.

संदर्भ :

  • फळदेसाई, पांडुरंग, गोंयच्या लोकवेदांचे सौंदर्यशास्त्र, पणजी, २०१७.
  • Khedekar, Vinayak, Vishnu, Folk Dances Of Goa, Udaipur West Zone Cultural Center, 2010 

प्रतिक्रिया व्यक्त करा