झादिह, लोत्फी. ए. : (४ फेब्रुवारी १९२१ – ६ सप्टेंबर २०१७) झादिह यांचा जन्म त्यांचे वडील रशियातील अझरबैजान राज्यात बाकू (Baku, Azerbaijan) येथे असताना झाला, नंतर त्यांचे कुटुंब तेहरान, इराण म्हणजे त्यांच्या मूळ देशी परतले. येथे त्यांचे शालेय शिक्षण अल्बोर्झ कॉलेज या अमेरिकन मिशनरी शाळेत झाले. तेथील शिक्षकांची अध्यापनाला वाहून घेतलेली आस्था पाहून ते फार प्रभावित झाले. त्यामुळे पुढे अमेरिकेत जाऊन अध्यापन करण्याची त्यांनी खूणगाठ बांधली.

प्राथमिक शिक्षण रशियन भाषेत झाल्यामुळे त्यांची पर्शिअन भाषेवरील पकड प्रभावी नसली तरी विद्यापीठीय प्रवेशासाठी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत ते तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते वर्गात नेहमी पहिल्या क्रमांकावर राहिले. झादिह तेहरान विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदवीधर झाले.

मग त्यांनी अमेरिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि खडतर प्रवास करत ते फिलाडेल्फिया येथे पोचले. तेथे त्यांनी एम.आय.टी. या प्रसिद्ध विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि विद्युत अभियांत्रिकी विषयात एम.एस. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर झादिह यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीत पीएच्.डी. पदवी मिळवली. त्याच विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. मात्र १९५९ पासून बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात ते शेवटपर्यंत प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले.

झादिह यांनी जॉन आर. रागझिनी यांच्यासोबत (John R. Ragazzini) विविक्तपणे काळात होणाऱ्या संदेश प्रक्रियेचे विश्लेषण करण्यासाठीएक नवी गणिती पद्धत विकसित केली, जी झेड-रुपांतरण (z- transform) या नावाने प्रसिद्ध आहे. तिचा मोठ्या प्रमाणावर वापर अंकीय प्रणाली नियंत्रणाशी (digital system control) संबंधित उद्योग आणि संशोधनात आजही केला जातो. त्यांनी त्यांच्या अभियांत्रिकी संशोधनाबाबत १० एकस्वे (पेटण्टस) प्राप्त केली.

मात्र झादिह यांना अफाट प्रसिद्धी मिळवून देणारा फझी सेटस् (Fuzzy Sets) हा १६ पानी शोधलेख इन्फोर्मेशन अँड कंट्रोल या मासिकात, (खंड ८, अंक ३, पृष्ठे ३३८-३५३) १९६५ साली प्रकाशित झाला. एक लाखाहून अधिकवेळा त्याचा संदर्भ आत्तापर्यंत दिला गेला आहे आणि जागतिक पातळीवर संदर्भ म्हणून दिल्या जाण्याऱ्या सर्वात अधिक अशा निवडक संदर्भांच्या यादीत हा लेख आहे, यावरून त्याचे महत्त्व आणि उपयोगिता लक्षात येते. फझी या इंग्रजी शब्दाचा अर्थ अस्पष्ट असा आहे. तरी संचाची व्याख्या करताना दिलेली वस्तू संचात घ्यावी किंवा नाही याबाबत स्पष्टता नसल्यास संच कसा तयार करावा याचे मार्गदर्शन झादिह यांनी देऊन फझी संचाची कल्पना मांडली. उदाहरणार्थ, गोपाल हा उंच आहे हे विधान ढोबळ आहे, तरी तो उंच माणसांच्या संचात घ्यायचा किंवा नाही हे ठामपणे सांगणे कठीण जाऊ शकते. कारण सर्वसामान्य माणसांच्या तुलनेत तो उंच असेल, परंतु बास्केटबॉल खेळाडूंच्या तुलनेत खुजा ठरू शकतो. भाषेच्या मर्यादेमुळे अशी निवड करताना संदिग्धता (ambiguity) येते, जी संभाव्यता सिद्धांतामधील (Probability Theory) अनिश्चितता (uncertainty) या संकल्पेनापेक्षा वेगळी आहे. आणि असे प्रश्न व्यवहारात पदोपदी येतात. त्यामुळे फझी संचाची कल्पना बहुविध क्षेत्रांत महत्त्वाची ठरली आहे, विशेषत: संगणक क्षेत्रात माहितीचे वर्गीकरण आणि चित्रांची ओळख संगणकाद्वारे करण्यासाठी. यामुळे मृदू गणन (soft computing) हे एक नवे दालन गणित आणि संगणकशास्त्रात उघडले गेले तसेच निर्णय घेण्याच्या पद्धतींना एक नवी दिशा मिळाली.

गणिती तर्कशास्त्रातही त्यामुळे एक नवीन विचारप्रवाह सुरू झाला. पुढे त्यांनी फझी लॉजिक (तर्कशास्त्र) याविषयावर एक विस्तृत सिद्धांत मांडला. त्यांच्या तर्कशास्त्राप्रमाणे प्रश्नांचे उत्तर (१) होय किंवा नाही (०) अशा दृढ (rigid) द्विमान पद्धतीत न देता उत्तराच्या विविध छटा (०, १) या अंतराळातील विविध मूल्यानुसार लवचिकपणे दिल्यास कुठल्याही समस्येवर वास्तविकपणे समाधान मिळवणे शक्य होऊ शकते. त्यामुळे कुठलीही तुलना करताना भाषेच्या मर्यादेमुळे निर्माण होणारी संधिग्नता अचूकपणे हाताळता येते. झादिह यांनी त्याधारे संपूर्ण फझी अंकगणित आणि फझी बीजगणित यातील प्रक्रिया करण्याच्या पद्धती विकसित करुन अतिशय सखोल गणिती योगदान केले. या विषयाचा व्यापक गणिती विस्तार आणि विविध क्षेत्रांत उपयोजन झाले आहे. उदाहरणार्थ, स्वयंचलित धुलाई यंत्र किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन अशा उपकरणांचे नियंत्रण फझी तर्कशास्त्रावर आधारित असते.

सुरुवातीस जरी फझी सेटस् आणि सिस्टिम्स या संकल्पना गणिती वर्तुळात वादाच्या ठरल्या परंतु आता त्यांना पूर्ण मान्यता मिळाली असून या विषयांना वाहिलेल्या अनेक परिषदा नियमितपणे भरवल्या जातात तसेच पुस्तके आणि नियतकालिके प्रसिद्ध होत आलेली आहेत.

झादिह हे इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉम्प्युटेशनल कॉग्निशनचे संपादक होते.त्यांच्या नावावर २००हून अधिक शोधलेख आणि २०हून अधिक पुस्तके आहेत.

साहजिकच त्यांना बहुविध मानसन्मान प्राप्त झाले. अनेक जागतिक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांची फेलोशिप आणि २४ विद्यापीठांनी मानद डॉक्टरल पदवी देऊन झादिह यांचा सत्कार केला आहे. त्यांना मिळालेल्या पारितोषिकांपैकी काही उल्लेखनीय अशी आहेत: आयईईई एज्युकेशन फाउंडेशन पदक, आयईईई रिचर्ड डब्ल्यू. हॅमिंग पदक, रिचर्ड इ.बेलमन कंट्रोल हेरीटेज पुरस्कार, एसीई ॲलन नेवेल पुरस्कार, व्ही. काउफमन पुरस्कार आणि सुवर्णपदक, बेंजामिन फ्रँकलिन पदक आणि गोल्डन गूज पुरस्कार.

संदर्भ : 

  • Trillas, “Lotfi A. Zadeh: On the man and his work”, Scientia Iranica – Transactions D: Computer Science & Engineering and Electrical Engineering, Vol. 18, No. 3, 2011, pp. 574-579.

समीक्षक : विवेक पाटकर