झेलेनी, मिलान : (२२ जानेवारी १९४२ -) मिलान झेलेनी यांचा जन्म क्लक शालोव्हाइस (Klucké Chvalovice) या खेड्यात त्यावेळच्या पूर्व बोहेमिया म्हणजे आताचे चेक गणराज्य येथे झाला. त्यांनी प्रागमधील युनिव्हर्सिटी विद्यापीठ येथे अध्ययन करून अर्थशास्त्रात पदवी मिळवली. ते नंतर अमेरिकेत स्थलांतरित झाले. न्यूयॉर्क राज्यातील रोचेस्टर विद्यापीठातून एम.एस. पदवी ही प्रणाली व्यवस्थापन (Systems Management) आणि प्रवर्तन संशोधन आणि व्यापार अर्थशास्त्र या विषयात त्यांनी पीएच्. डी. मिळवली.

झेलेनी यांनी १९७१-८२ दरम्यान अमेरिका, डेन्मार्क आणि यूरोपमधील काही विद्यापीठांत सांख्यिकी, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्र या विषयांचे अध्यापन केले. मात्र १९८२ पासून ते व्यवस्थापन प्रणाली या विषयाचे प्राध्यापक म्हणून न्यूयॉर्क येथील लिंकन सेंटर येथील फोर्डहॅम येथे कार्यरत आहेत.

झेलेनी हे दुसऱ्या पिढीतले बिनीचे प्रवर्तन संशोधन तज्ञ मानले जातात. त्यांनी पारंपरिक रेषीय प्रायोजन (linear programming) याला वेगवेगळ्या तऱ्हेने व्यापक आणि समृद्ध केले. रेषीय प्रायोजन प्रश्नात सहसा एक रेषीय उद्दिष्ट फल आणि रेषीय फलांनी मांडलेल्या मर्यादा व्यवस्थेसाठी इष्टतम उत्तर शोधले जाते. प्रत्यक्षात एकापेक्षा अधिक उद्दिष्ट फल किंवा निकष असू शकतात. उदा., सर्वाधिक फायदा व्हावा, उत्पादनासाठी किमान वेळ लागावा आणि यंत्र सामुग्रीची झीज कमी व्हावी. अशा प्रश्नासाठी त्यांनी बहु-उद्दिष्ट (Multi-Objective) रेषीय प्रायोजन आणि त्याचे प्रगत स्वरूप बहु-निकष निर्णयशास्त्र (Multiple Criteria Decision Making) हे विकसित केले. त्यासाठी त्यांनी पहिले रेषीय प्रायोजनासाठी उपलब्ध सिम्प्लेक्स पद्धतीचे (Simplex method) व्याप्तीकरण आणि त्यानंतर नवीन पद्धती विकसित केल्या. त्या संगणकाद्वारे कार्यान्वित होतात.

तडजोडीचे प्रायोजन (Compromise Programming) ही झेलेनी यांनी विकसित केलेली आणखी एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. निर्णय घेताना अनेक पर्याय समोर असतात, परंतु त्यातील काही एकमेकांना छेद देणारे असू शकतात त्यामुळे त्यांची एकमेकाशी थेट तुलना करणे शक्य नसते. अशा परिस्थितीत एक आदर्श पर्याय रचून बाकीचे पर्याय त्याच्यापासून किती अंतरावर आहेत हे मोजायचे आणि जो पर्याय आदर्श पर्यायाच्या सर्वात जवळ असेल तो पर्याय तडजोड म्हणून मान्य करायचा अशी ती कल्पना आहे. जर दोन किंवा अधिक पर्यायांसाठी अंतरात समसमानता (tie) म्हणजे बरोबरी आली तर एक नवा निकष वापरून ती समसमानता तोडायची हा मार्ग असतो. झेलेनी यांनी आवश्यक अशी गणिती संरचना करून तडजोडीचे प्रायोजन याला औपचारिक बैठक दिली. ही पद्धत अनेक निर्णयकर्ते असले आणि प्रत्येकाची पर्यायांबाबतची मते वेगवेगळी असली तरी अंतिम निर्णय घेता येतो. तरी तडजोडीचे प्रायोजन याचा वापर व्यक्तिगत ते जागतिक स्तरावरील निर्णय प्रक्रियांमध्ये केला जातो. उदाहरणार्थ, वाहन खरेदी, संघातील खेळाडूंची निवड, आणि उत्पादन विक्रीसाठी धोरण ठरवणे.

साधारणपणे निर्णय घेताना आपण दिलेल्या प्रणालीसाठी इष्टतम उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो, मात्र झेलेनी यांनी असे मांडले की त्यापेक्षा इष्टतम प्रणाली संरचित करणे (designing an optimal system) हे अधिक फायदेशीर आणि संयुक्तिक असते. त्या संदर्भात त्यांनी विकसित केलेली ‘De Novo Programming’ ही पद्धत निर्णयशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र यांच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. याचे गणिती प्रारूप त्यांनी विकसित केले आणि ते अनेक क्षेत्रांत यशस्वीपणे वापरले गेले आहे.

दिलेल्या प्रश्नासाठी किंवा इष्टतम प्रणाली निर्मितीसाठी गणिती प्रारूप वापरून उत्तर काढले तरी ते प्रत्यक्षात वापरताना मानवी बाजू विसरता कामा नये अशी झेलेनी यांची भूमिका राहिली आहे. त्यांच्या मते मानवाच्या हितासाठी इष्टतम प्रणाली निर्माण करणे याचबरोबर अशा प्रणालीचे व्यवस्थापन मानवी दृष्टीकोनातून होणे, तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी १९८०मध्ये मानव प्रणाली व्यवस्थापन (Human Systems Management) अशी चळवळ सुरू केली आणि त्याच शीर्षकाचे एक जर्नल सुरू केले. ते त्याचे सलग ३४ वर्षे प्रमुख संपादक राहिले आणि त्या जर्नलला जागतिक दर्जा मिळवून दिला.

त्याशिवाय झेलेनी यांनी ज्ञान व्यवस्थापन तसेच तंत्रज्ञान स्वीकार (adoption) या क्षेत्रात संशोधन करून विविध पर्याय आणि धोरणे सुचवली आहेत. त्या विषयांना वाहिलेल्या कित्येक जर्नल्सच्या संपादक मंडळांचे ते सदस्य आहेत. प्रवर्तन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, ज्ञान व्यवस्थापन आणि मानवतावाद यांची सांगड घालणारे त्यांचे संशोधन कार्य राहिलेले आहे. त्यांच्या नावावर २० हून अधिक पुस्तके आहेत आणि त्यातील काही त्यांच्या मूळ चेक भाषेत आहेत. तसेच झेलेनी यांचे ६००हून अधिक शोधलेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या लेखांचे विषय प्रवर्तन संशोधन, अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र, ज्ञान व्यवस्थापन, फझी संच, बाटा व्यवस्थापन प्रणाली, मानव नवनिर्मिती, मानसशास्त्र व अनुमानशास्त्र, स्वयंप्रेरित सामाजिक व्यवस्था, जैविक प्रणाली, कृत्रिम जीवन असे वैविध्यपूर्ण असून ते झेलेनी यांची बहुआयामी विद्वत्ता दाखवतात.

साहजिकच झेलेनी यांना जगभरातून अध्यापन आणि व्याख्याने यासाठी वेळोवेळी आमंत्रित केले जाते. त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार आणि मानसन्मान त्यांना मिळाले आहेत, त्यात नोर्बर्ट वायाणार पुरस्कार, अलेक्झांडर फॉन ह्मबोल्ट पुरस्कार, बर्नस्टाईन स्मृती व्याख्यान आणि द एजवर्थ-पारेटो पुरस्कार आहेत.

संदर्भ : 

समीक्षक : विवेक पाटकर