झिंकरनॅजेल, रॉल्फ मार्टिन : ( ६ जानेवारी १९४४ -) रॉल्फ मार्टिन झिंकरनॅजेल यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील रिहॅन येथे झाला. त्यांचे वडील जीवशास्त्रामध्ये पीएच्.डी. होते. बाझलमधील मोठ्या फार्मा कंपनीमध्ये ते काम करीत. राल्फ यांचे प्राथमिक शिक्षण रिहॅन येथील पब्लिक स्कूलमध्ये झाले. बाझलमधील त्यांची शाळा विज्ञानावर अधिक भर देणारी होती. लॅटिन भाषा त्या काळी कायदा किंवा वैद्यक शिक्षणासाठी आवश्यक असल्याने त्यांना चार वर्षे लॅटिन विषयाचा अभ्यास करावा लागला.

वैद्यकशास्त्रातील पदवीनंतर त्यांची आफ्रिकेत जाऊन कुष्ठरोग्यांमध्ये काम करण्याची इच्छा होती. पुरेसा अनुभव नसल्यामुळे त्यांना कोणत्याही संस्थेकडून आवश्यक परवानगी मिळाली नाही. स्वित्झर्लंडमधील रूग्णालयामध्ये शल्यक्रियातज्ज्ञ म्हणून काम स्वीकारले परंतु तेही त्यांना फारसे रुचले नाही. स्वित्झर्लंडमधील बाझल विद्यापीठाच्या शरीररचनाशास्त्र संस्थेत त्यांनी लांब हाडांच्या टोकाशी असणाऱ्या अधिवर्ध (epiphysis) भागातील केशवाहिन्यांची (capillaries) वाढ कशी होते ह्याचा अभ्यास केला.  त्यामुळे त्यांना १९७० मध्ये एम.डी. मिळणे सोपे झाले.

त्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडमधील लॅाझन विद्यापीठात जीवरसायनशास्त्रात संशोधन केले. संशोधनातून त्यांना प्रतिक्षमताशास्त्रातील, जीवरसायनिक भागामध्ये आवड निर्माण झाली. त्यातून त्यांनी ऑस्ट्रेलियातील कॅनबेरायेथील जॉन कर्टिन स्कूल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये ज्येष्ठ सहकारी पीटर डोहर्टी यांच्याबरोबर प्रतिक्षमता विज्ञानात संशोधन केले.

संशोधन कार्य सुरू असतानाच झिंकरनॅजेल ह्यांनी उंदरांमधील जीवाणू-विषाणू संसर्ग आणि विशिष्ट जनुक संचांचा (H-2 gene complex) भक्षक पेशीय प्रभावित प्रतिक्षमतेवर (macrophage cell-mediated immunity) परिणाम या विषयावर प्रबंध लिहिणे सुरू ठेवले.

उंदरांच्या शरीरातील रोगप्रतिकारक्षमता जाणून घेण्यावर पीटर डोहर्टी व झिंकरनॅजेल यांच्या संशोधनाचा रोख होता. विषाणू संसर्गामुळे उंदरांच्या मेंदू-मज्जारज्जूवरील आवरणाचा क्षोभ होतो (meningitis). जीवाणू विषाणूबाधित उंदरांच्या शरीरातील टी-लसिकापेशी (T-lymphocytes) या एका प्रकारच्या श्वेतपेशी, विषाणुबाधित (biological viruses) पेशी नष्ट करतात. त्यामुळे  विषाणुबाधित प्राण्यांचे विषाणुंपासून टी-लसिकापेशीमुळे रक्षण होते असे त्यांच्या लक्षात आले.

उंदरांसारख्या लहानशा प्राण्यांच्या शरीरातसुद्धा अब्जावधी पेशी असतात. एवढ्या पेशींमधून विषाणू संसर्ग झालेल्या  पेशी कशा ओळखल्या जातात याचा शोध घेताना त्यांना असे आढळले की विषाणूबाधित पेशींच्या बाह्य-आवरणाबाहेर डोकावणारे प्रतिजन रेणू निरोगीपेशी आवरणाबाहेर डोकावणाऱ्या प्रतिजन रेणूंपेक्षा वेगळे असतात. या विशिष्ट प्रतिजन रचनेमुळे विषाणूसंसर्ग झालेल्या पेशी लसिकापेशी स्पर्शाने शोधून काढतात. पेशींमध्ये विषाणू असल्याची  खात्री पटल्यानंतर  त्या पेशींचा  नाश केला जातो.

कणा असणाऱ्या सर्व प्राण्यांच्या शरीरात प्रमुख ऊतीसामंजस्य प्रथिने (MHC- Major Histocompatibility complex) नावाच्या विशिष्ट प्रथिनांचा एक मोठा गट असतो. ऊतीसामंजस्य  प्रथिनांपैकी काही, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सर्व पेशींमध्ये आणि काही फक्त भक्षक पेशींमध्ये विखुरलेली असतात असे रोल्फ झिंकरनॅजेल आणि पीटर डोहर्टी यांच्या लक्षात आले.

ऊतीसामंजस्य प्रथिने विविध प्रकारची असतात. एका जातीच्या प्राण्यात असलेली प्रथिने इतर जातीच्या प्राण्यांत आढळत नाहीत (species specificity). तसेच एकाच जातीच्या प्राण्यांतील विविध व्यक्तींच्या ऊतीवंशपरत्वे थोड्या वेगळ्या असतात (genetic variation). ऊतीअसामंजस्यामुळे (histoincompatibility) अनेकदा रोपण केलेले अवयव स्वीकारले जात नाहीत.

ह्या महत्त्वाच्या संशोधनासाठी रॉल्फ मार्टिन झिंकरनॅजेल आणि पीटर डोहर्टी यांना शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यक विषयातील नोबेल पुरस्कार १९९६ साली विभागून देण्यात आला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा