इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाईड केमिस्ट्री (आययुपॅक) (शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था, International Union of Pure and Applied Chemistry- IUPAC ) : (स्थापना – १९१९- झुरिक, स्वित्झर्लंड) जर्मनरसायनतज्ञ फ्रिडरिश केकुले यांच्या पुढाकाराने १८६० साली जर्मनीमधील कार्लसरूह (Karlsruhe) या शहरात यूरोपीय रसायनतज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली. सेंद्रिय संयुगांसाठी आंतरराष्ट्रीय नामकरण (Nomenclature) प्रणाली तयार करण्यासाठीची ही प्रथम आंतरराष्ट्रीय परिषद होती. या परिषदेत रसायनांच्या नामकरणावर तसेच त्याना द्यायच्या चिन्हांवर चर्चा झाली. या परिषदेत मांडल्या गेलेल्या कल्पना सेंद्रिय रसायनशास्त्राच्या अधिकृत नामकरणाच्या उत्क्रांतीत झाल्या आणि कालांतराने या परिषदेची परिणीती इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाईड केमिस्ट्री (आययुपॅक) ही संघटना स्थापन होण्यात झाली. या संघटनेची स्थापना १९१९ या वर्षी झाली. आययुपॅक ही संघटना इंटरनॅशनल काउन्सिल फॉर सायन्स (आयसीएस) या संस्थेची सभासद असून विविध देशातील रसायनशास्त्रज्ञांचे प्रतिनिधित्व करते. देशांच्या राष्ट्रीय रसायन संस्था, राष्ट्रीय विज्ञान अकादमी यांसारख्या संस्था आययुपॅकच्या सदस्य असू शकतात.

आययुपॅक झुरिक, स्वित्झर्लंड येथे नोंदणीकृत आहे आणि आययुपॅक सचिवालय म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय कार्यालय अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना राज्यात आहे. या प्रशासकीय कार्यालयाचे प्रमुख आययुपॅकचे कार्यकारी संचालक आहेत. आययुपॅकचे संचालन तिच्या विविध समित्यांद्वारे केले जाते. या समित्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. प्रत्येक समिती वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या राष्ट्रीय पालन संस्थांच्या सदस्यांची बनलेली असते. आययुपॅकची नामकरणपद्धती (nomenclature) आणि चिन्हांची (symbols) आंतरविभागीय समिती ही रासायनिक मौल्ये व संयुगे यांच्या नामकरणाकरिता मानदंड विकसित करण्यासाठी मान्यता प्राप्त जागतिक प्राधिकारी (authority) आहे. तसेच आययुपॅकच्या समित्या विविध प्रकल्प राबवितात ज्यामध्ये नामकरणपद्धती प्रमाणित करणे, जगात रसायनशास्त्र अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी विविध मार्ग शोधणे, या संदर्भातील कामांचे प्रकाशन करणे यासारख्या गोष्टी समाविष्ट आहेत.

रसायनशास्त्र आणि विज्ञानातील इतर क्षेत्रांमध्ये नामकरण प्रमाणित करण्यासाठी जरी आययुपॅक अधिक प्रसिद्ध असली तरी रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र यासह अनेक क्षेत्रात विविध प्रकारच्या प्रकाशनाचे कार्य हा देखील तिच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. या क्षेत्रांमध्ये न्यूक्लियोटाइड बेस सीक्वेन्स (nucleotide base sequence) कोड नावे प्रमाणित करणे, पर्यावरणीय वैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञांसाठी पुस्तके प्रकाशित करणे आणि विज्ञान शिक्षणात सुधारणा आणणे अशा महत्त्वपूर्ण कामांचा समावेश होतो. आययुपॅकची तिच्या कमिशन ऑन आयसोटोपिक ॲबंडन्स अँड ॲटोमिक वेट (the Commission on Isotopic Abundances and Atomic Weight-CIAAW) या जुन्या स्थायी समितीद्वारे  रासायनिक मूलद्रव्यांचे अणुवजन (Atomic Weight)  प्रमाणित करणारी संघटना म्हणूनही ओळख आहे.

आययुपॅकची सेंद्रिय व अकार्बनी संयुगांचे अधिकृत नामकरण करण्याची खूप जुनी परंपरा आहे. अशी नामकरण पद्धती विकसित झाल्यामुळे कुठल्याही संयुगाचे नामकरण एका प्रमाणित नियमांच्या संचाखालीच होते. त्यामुळे नावांची द्विरुक्ती टळते. आययुपॅकच्या सेंद्रिय संयुग नामकरणाचे तीन मूलभूत भाग आहेत. प्रतियोजी (substituents), कार्बन साखळीची लांबी आणि रासायनिक समाप्ती. प्रतियोजी हे मुख्य कार्बन साखळीशी जोडलेले कोणतेही कार्यशील गट असतात. मुख्य कार्बन साखळी ही सर्वात लांब संभाव्य अखंड साखळी असते. रासायनिक समाप्ती ही संयुगामध्ये कोणत्या प्रकारचे रेणू आहेत ते दर्शविते. उदाहरणार्थ, हेक्झेन (Hexane) या पदार्थाच्या इंग्रजी नावाचा शेवट ane ने होतो जे एकल बंध कार्बन साखळीचे (single bonded carbon chain) निर्देशक असते.

मूलभूत आययुपॅक अकार्बनी संयुगांच्या नामकरणाचे दोन मुख्य भाग असतात धनायन (Cation) आणि ऋणायन (Anion). धनायन हे सकारात्मक (positive) भार (charge) असलेल्या आयनचे नाव आहे तर ऋणायन हे नकारात्मक (negative) भार (charge) असलेल्या आयनचे नाव आहे.

आययुपॅकची ॲमिनो आम्ल (Amino acid) आणि न्यूक्लिओटाईड आम्लारी (Nucleotide base) ओळखण्यासाठी देखील संकेतप्रणाली आहे.

आंतरराष्ट्रीय २०११ या रसायनशास्त्र वर्षाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे संयोजन करणाऱ्या आययुपॅक व संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषद (युनेस्को) या प्रमुख संघटना होत्या. मूलत: हे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष आययुपॅकद्वारा इटलीच्या ट्युरीन येथील संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावित केले गेले. २००८ या वर्षीच्या युनेस्को सभेत हा प्रस्ताव स्वीकारला गेला. रसायनशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय वर्षाचा मुख्य उद्देश रसायनशास्त्र लोकप्रिय करणे आणि रसायनशास्त्रातील लोकांची रुची वाढविणे हा होता तसेच या कार्यक्रमाचे आयोजन हे तरुणांना रसायनशास्रात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणे असाही होता. या कार्यक्रमाच्या आयोजनाचे आणखी एक कारण म्हणजे रसायनशास्त्रांनी मानवी जीवनात आणलेल्या सुधारणा लोकांपुढे ठळकपणे आणणे.

आययुपॅक ही रासायनिक मौल्ये व संयुगे यांच्या नामकरणाकरीता मानदंड विकसित करण्यासाठी मान्यता प्राप्त जागतिक प्राधिकारी (authority) असल्यामुळे रसायनशास्त्रात तिचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

समीक्षक : सुधाकर आगरकर