केंद्रीय सांख्यिकी कार्यालय :  (स्थापना : २ मे, १९५१) केंद्रीय सांख्यिकी म्हणजे सेन्ट्रल स्टॅटिस्टिक्स कार्यालय (सीएसओ) हे भारताच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी या मंत्रालयाच्या अखत्यारितील सरकारी संस्था आहे. भारतातील सांख्यिकी कामकाजात समन्वय साधणे, सांख्यिकीय मानके विकसित करणे आणि त्यांची अंमलबजावणी पाहणे; ही जबाबदारी सीएसओची आहे.

सीएसओचे प्रमुख हे महासंचालक असे संबोधले जातात आणि त्यांना दोन अतिरिक्त महासंचालक, चार महाउपनिर्देशक, संचालक, संयुक्त संचालक आणि इतर कर्मचारी यांचे सहाय्य असते. सीएसओचे कामकाज दिल्लीतून चालते. मात्र, वार्षिक औद्योगिक सर्वेक्षणाचे औद्योगिक आकडेवारी संबंधातील काही काम कोलकातामधून चालते. सीएसओचे मुख्य कार्य म्हणजे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या सांख्यिकीय कामांमध्ये समन्वय आणून आवश्यक आधारसामग्रीचे संकलन करणे, शासकीय आणि गैर-शासकीय स्रोतांकडून प्राप्त आधारसामग्रीवरून राष्ट्रीय आकडेवारीचे दरवर्षी संकलन आणि प्रकाशन करणे, उद्योगांचे सर्वेक्षण करून, माहिती संकलित करून वार्षिक अहवाल तयार करणे, केंद्र आणि राज्य सरकारांच्या सांख्यिकी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांख्यिकी संस्थांच्या संपर्कात राहणे, नॅशनल सँपल सर्व्हेद्वारा घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणांतील माहितीच्या बाबी ठरविणे आणि नियमितपणे आर्थिक जनगणना करणे. १९७७ मध्ये पहिली आर्थिक जनगणना पार पडली.

वार्षिक सांख्यिकी गोषवारा (Annual statistical abstract), उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (Annual survey of Industries), दर महिन्याच्या आकडेवारीचा सारांश (Monthly abstract of statistics), राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज (Estimates of national income) इत्यादी प्रकाशने  सीएसओकडून नियमितपणे प्रकाशित केली जातात. जबाबदाऱ्यांचा आणि कामांचा मोठा व्याप पाहता सीएसओमध्ये खालील पाच विभाग करण्यात आले आहेत :

 

  • राष्ट्रीय लेखा विभाग (National Accounts Division) – एकूण घरगुती उत्पादन, सरकारी आणि खाजगी अंतिम उपभोग खर्च, मुदत भांडवली रचना आणि इतर स्थूल-आर्थिक समुच्चय ज्यांत समाविष्ट आहेत, अशा बाबींचा राष्ट्रीय लेखा तयार करण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे. दरवर्षी ही आकडेवारी राष्ट्रीय लेखा सांख्यिकी या शीर्षकाने, हा विभाग प्रकाशित करतो. विभागाला इतर महत्त्वाचे अंदाज वर्तवावे लागतात: (१) वर्तमान आणि स्थिर किमतींवर आधारित देशांतर्गत सकल उत्पादनाचा (जीडीपी) त्रैमासिक अंदाज, (२) भांडवली रोखे आणि नियत भांडवल यांचा अंदाज, (३) रेल्वे, संप्रेषण, बँकिंग व विमा आणि केंद्र सरकारच्या प्रशासकीय क्षेत्रांसाठी राज्यनिहाय एकूण सकल मूल्यवर्धित आणि सकल निव्वळ स्थिर भांडवली अंदाज आणि (४) राज्यांकरिता तुल्यबळ घरगुती उत्पादनांचा अंदाज करणे. शिवाय निवेश-निष्पादन देवघेवीच्या सारण्या हा विभाग तयार करतो.
  • सामाजिक सांख्यिकी विभाग (Social Statistics Division) – पर्यावरणीय आर्थिक लेखांकन, अधिकृत तसेच उपयोजित सांख्यिकीतील संशोधन, कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा यांसाठी अनुदानित सहाय्य, संख्याशास्त्रज्ञांसाठी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पुरस्कार, समाज-धर्मीय प्रवर्गांसाठी राष्ट्रीय आधारसामग्री संग्रह (National Data Bank), स्थानिक पातळीवरील विकासाकरिता मूलभूत आकडेवारी, दिशादर्शक योजना, वेळ-आधारित सर्वेक्षण आणि नियमित आणि तात्कालिक सांख्यिकीय प्रकाशने, ही सामाजिक सांख्यिकी विभागाची जबाबदारी आहे.
  • आर्थिक सांख्यिकी विभाग (Economic Statistics Division) – या विभागात आर्थिक जनगणना आणि वार्षिक औद्योगिक सर्वेक्षणांचे आयोजन केले जाते, भारतासाठी औद्योगिक उत्पादनांची सूची (All India Index of Industrial Production), ऊर्जा सांख्यिकी आणि आधारी संरचना सांख्यिकी, वर्गीकरणांचा विकास, उदा., राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण (National Industrial Classification) आणि राष्ट्रीय उत्पादन वर्गीकरण इत्यादींची जबाबदारी या विभागाकडे आहे.
  • प्रशिक्षण विभाग (Training Division) – आवश्यक आधारसामुग्रीचे संकलन, एकत्रिकरण, विश्लेषण आणि तिचा प्रसार यांतील आव्हाने हाताळण्यासाठी मनुष्यबळाचे, सैद्धांतिक व उपयोजित सांख्यिकीमधील प्रशिक्षण ही या विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. हा विभाग राष्ट्रीय सांख्यिकी यंत्रणा प्रशिक्षण अकादमीवर (National Statistical Systems Training Academy) देखरेख ठेवतो. ती भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील, विशेषत: सार्क (SAARC – South Asian Association for Regional Cooperation) देशांतील मानवी संसाधन विकासाच्या अधिकृत सांख्यिकीला उत्तेजन देणारी संस्था आहे.
  • समन्वय आणि प्रकाशन विभाग (Coordination and Publications Division) – सीएसओच्या कामकाजासह राज्य तसेच केंद्रशासित सरकारांच्या मंत्रिमंडळातील संख्याशास्त्राशी संबंधित कामांवर देखरेख ठेवणे आणि त्या सगळ्यांत समन्वय साधणे ही या विभागाची जबाबदारी आहे. दरवर्षी हा विभाग केंद्र आणि राज्य सांख्यिकी संस्थांची परिषद आयोजित करतो, सांख्यिकी दिवस साजरा करतो, आदर्श निष्कर्ष दस्तावेज (Results Framework Document) तयार करतो, नागरिक/ग्राहक यांच्याकरिता सनद आणि वार्षिक कृतीयोजना बनवतो, मंत्रिमंडळाचे फलित अर्थसंकल्प आणि वार्षिक नियोजन तयार करतो. या विभागाकडे क्षमता विकास योजनेची अंमलबजावणी आणि संख्याशास्त्राच्या बळकटीसाठी पाठबळ देण्याची जबाबदारीदेखील आहे. राष्ट्रीय धोरणे तयार करण्यासाठी, यथार्थ आणि विश्वासार्ह अधिकृत सांख्यिकी गोळा करणे, संकलित करणे आणि वितरित करणे; यासाठी राज्य संख्याशास्त्रीय प्रणालीची क्षमता आणि पायाभूत सुविधा सुधारणारी केंद्रशासित योजनाही सीपीडी राबवीत आहे. याचबरोबरीने राज्य / जिल्हा आणि गटविभाग पातळीवर सांख्यिकीचा वापर वाढविणे व वापराला प्रोत्साहन देणे ही कामे हा विभाग करतो. संकलन सांख्यिकी अधिनियम, २००८च्या अंमलबजावणीची जबाबदारी या विभागाकडे आहे. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटबरोबरची प्रशासकीय कामे या विभागाद्वारे हाताळली जातात.

उपयोजित व अधिकृत सांख्यिकीतल्या असामान्य आणि प्रसंशनीय संशोधनाला उत्तेजन देण्यासाठी एक राष्ट्रीय व एक आंतरराष्ट्रीय सांख्यिकी-पुरस्कार या संस्थेमार्फत दिला जातो. तसेच डॉक्टोरल संशोधन आणि संशोधन समन्वयासाठी संशोधकांना प्रकल्प अनुदान व प्रवासभाडे दिले जाते.

थोडक्यात, भारतातील सांख्यिकी तयार करणे आणि त्या आधारे भारताच्या सर्वांगीण विकासाला दिशादर्शक नेतृत्त्व देणे, यात सीएसओची भूमिका महत्त्वाची आहे.

http://www.mospi.gov.in/central-statistics-office-cso-1  हे संस्थेचे संकेतस्थळ आहे.

तथापि भारत सरकारने २३ मे, २०१९ रोजी सीएसओ आणि नॅशनल सँपल सर्व्हे कार्यालय (एनएसएसओ) यांना एकत्र करून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO -National Statistics Office) अशी नवी रचना केली आहे.

संदर्भ :

  समीक्षक : विवेक पाटकर