स्पालान्झीनी, लाझारो : ( १० जानेवारी, १७२९ ते १२ फेब्रुवारी, १७९९ ) इटली येथे लाझारो स्पालान्झीनी यांचा जन्म झाला. लाझारो यांचे महाविद्यालयीन  शिक्षण जेसूट महाविद्यालयात झाले. त्यांनी बोलोग्ना विद्यापीठात काही दिवस कायद्याचे शिक्षण घेतले. लवकरच ते विज्ञानाकडे वळले. भौतिकशास्त्राच्या प्रसिद्ध प्रोफेसर लौरा बास्सी या त्यांच्या प्रेरणास्थान होत्या. तत्त्वज्ञान आणि गणिताचे धडे त्यांनी लौरा यांच्याकडूनच घेतले. १७५४ साली रेग्गिओ विद्यापीठात ते तर्कशास्त्र, जीवन तत्त्वज्ञान आणि ग्रीकभाषेचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १७६२ साली ते कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून नियुक्त झाले. १७६३ साली मोडेना येथे त्यांनी आपले शिक्षकाचे कार्य तितक्याच निर्धाराने आणि यशस्वीरीत्या  सुरूच ठेवले. परंतु त्यांच्या अभ्यासाचा कल नेहमीच निसर्गशास्त्राकडे राहिला. १७६८ पर्यंत त्यांनी इटलीमधील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठासकट अनेक विद्यापीठांची निमंत्रणे स्वीकारली नाहीत. १७६८ साली मात्र मारिया तेरेसा यांच्या निमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला आणि पाविया विद्यापीठात सन्मानाच्या निसार्ग इतिहास अध्यासन (Chair of Natural History) या पदावर रुजू झाले. तेथील संग्रहालयाचे ते निदेशक झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मेडिटरेनीयन समुद्र किनाऱ्यावरील प्रवासात सापडलेले अनेक ऐतिहासिक नमूने गोळा करून संग्रहालय समृद्ध केले. १७६८ सालच्या जून महिन्यात त्यांना रॉयल सोसायटीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. १७७५ मध्ये रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमीचे ते परदेशस्थ सभासद म्हणून निवडले गेले.

साधारण १७४८ च्या आसपास जीवाची निर्मिती अचानक झाली असा समज प्रबळ होता. या विचारधारेला अबायोजेनेसिस असे म्हणत. या काळात सूक्ष्मदर्शक यंत्र उपलब्ध होते. कोम्ते दी बफोन (Comte de Buffon) आणि टरबेरविल नीडहम (Turberville Needham) यांनी त्या वेळी असे गृहितक मांडले की, सेंद्रिय पदार्थापासून, जर पुरेसा वेळा दिला तर, एका उपजत अशा शक्तीतून जीवाची निर्मिती होते. १७६५ साली  लाझारो स्पालान्झीनीने मात्र असे दाखून दिले की अशी उपजत शक्ती कुठल्याच पदार्थात नसते आणि जर असेलच तर ती एक तासभर ते द्रावण उकळल्यास नष्ट होते. एकदा द्रावण उकळल्यानंतर जर ते चंचुपात्र हवाबंद बुचाने सील केले तर त्या द्रावणातील सगळे जंतू मरतात आणि बाहेरील हवेतूनसुद्धा जंतू आत जाऊ न शकल्यामुळे ते द्रावण निर्जंतुक राहते. एकदा अशाच प्रकारचा प्रयोग नीडहम यांनी केला आणि चंचुपात्रात द्रावण उकळून घेतल्यावरसुद्धा ते थोड्यावेळाने थंड झाल्यावर त्यात जंतूंची वाढ झाल्याचे त्यांनी दाखून दिले. असे कसे झाले म्हणून स्पालांझीनी यांनी त्या चंचुपात्राचे सूक्ष्म अवलोकन केले. त्यांना असे दिसून आले की, नीडहमने वापरलेल्या चंचुपात्राला बारीकसा तडा गेला होता. त्यातून हवेतील जंतू त्यात शिरले आणि त्यांची द्रावणात वाढ झाली. त्या नंतर स्पालान्झीनी यांनी तोच प्रयोग अतिशय काळजीपूर्वक करून असे दाखून दिले की चंचुपात्रातील द्रावण चांगले उकळून घेतले आणि त्याचे तोंड ज्वालेने तापवून मग हवाबंद सील केले (hermetically sealed) तर द्रावणातील सर्व जंतू नष्ट होतात आणि भविष्यात द्रावणात त्यांची वाढ होत नाही. म्हणजेच जीवाची निर्मिती व्हायला जीवाची आवश्यकता असते. कुठल्याच रसायनात अशी उपजत शक्ती अस्तित्वात नाही हे त्यांनी सिद्ध केले. अर्थात त्या वेळी स्पालान्झीनी यांच्याकडे जीवाणू बघता येतील इतके सक्षम सूक्ष्मदर्शकयंत्र नव्हते. अन्नाचे डबे जर हवाबंद केले तर त्यातील अन्न जंतुविरहित टिकवता येईल असे त्यांनी प्रतिपादन केले होते. पुढे लुई पाश्चर यांना अबायोजेनेसिस विचारधारेला विरोध करण्यासाठी हा प्रयोग मार्गदर्शक ठरला.

आकृती :

  • उघड्या तोंडाच्या चंचुपात्रात द्रावण तापवले – थंड केले – थोड्या वेळाने त्यात जंतूंची वाढ दिसली.
  • हवाबंद तोंडाच्या चंचुपात्रात द्रावण तापवले – थंड केले – थोड्या वेळाने त्यात जंतूंची वाढ दिसली नाही

त्यांना १७८५ साली पडुआ विद्यापीठात पाचारण करण्यात आले. त्यांनी तिथेच राहावे म्हणून त्यांचे वेतन दुप्पट करण्यात आले आणि त्यांना एक वर्षभराची अभ्यास दौऱ्यासाठी रजादेखील मंजूर करण्यात आली. या कालावधीत त्यांनी टर्की देशातील चाल्की येथील तांब्याच्या खाणी आणि प्रिन्सिपी येथील लोखंडाच्या खाणींना भेट देऊन अनेक शास्त्रीय निरीक्षणे केली. हा अभ्यास दौरा पूर्ण करून परतल्यावर व्हिएन्ना येथे जोसेफ II याने त्यांचे जोरदार स्वागत केले. पाविया येथे त्यांच्या विद्यार्थ्याने देखील त्यांचे भव्य स्वागत केले. आता त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळ जवळ ५०० झाली होती. १७८८ साली त्यांनी व्हेसुविअस आणि लीपारी व सिसिली बेटांवरील ज्वालामुखीचा अभ्यास दौरा करून ४ वर्षानंतर त्यावर विस्ताराने संशोधनपर लेख लिहिला. त्याचे नाव  Viaggialle due Sicilieed in alcunepartidell’ Appennino.

सस्तन प्राण्यात प्रजोत्पादनासाठी शुक्रजंतू आणि स्त्रीबीज आवश्यक असते असे त्यांनी सांगितले होते. बेडकात आणि कुत्र्यात कृत्रिम रेतन करण्यात ते यशस्वी झाले होते. वटवाघुळे ही मार्ग शोधण्यासाठी काळ्याकुट्ट अंधारात डोळ्याचा वापर करीत नाही तर वेगळ्याच ज्ञानाचा वापर करतात ज्याला त्याने इकोलोकेशन असे संबोधले होते. त्यांनी आपल्या पचन क्रियेविषयीच्या प्रबंधात (Dissertationi di fisicaanimale e vegetale, 2 vol. 1780) असे स्पष्ट म्हटले आहे की, पचन ही प्रक्रिया केवळ अन्नाचे पोटात दळण होणे असे नसून त्यात पाचक रसांचा मोठा सहभाग असतो.

अभ्यासासाठी प्रचंड प्रवास करणारे, उत्तम संग्राहक, उत्तम शिक्षक आणि नेहमीच वादात राहिलेले स्पालान्झीनी हे त्या काळी प्रसिद्धीच्या प्रचंड झोतात होते. संग्रहालयशास्त्र, ज्वालामुखीशास्त्र, हवामान शास्त्र, जीवाष्म शास्त्र, खाणकाम शास्त्र, जीवशास्त्र अशा अनेक शास्त्रशाखांमध्ये  त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

पाविया येथे मूत्राशयाच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचे मूत्राशय त्यांच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी काढून घेतले होते जे आज देखील पावियाच्या संग्रहालयात बघायला मिळते.

संदर्भ :

समीक्षक : मुकुंद बोधनकर