अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन : ( स्थापना – २७ नोव्हेंबर, १८३९ ) अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन (ए.एस.ए.) ही संख्याशास्त्राला वाहिलेली जगातील सर्वांत मोठी संघटना आहे. तिची स्थापना विलियम कॉग्जवेल, जॉन डिक्स फिशर, रिचर्ड फ्लेचर, ऑलिव्हर डब्ल्यू. बी. पीबॉडी आणि लेम्युएल शाट्टुक या पाच लोकांनी अमेरिकेतील बॉस्टन येथे केली. अमेरिकेचे अध्यक्ष मार्टिन व्हॅन बुरेन, फ्रान्सचे मंत्री लुईस कॅस, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या फ्लोरेंस नाईटिंगेल यांसारख्या नामवंत व्यक्ती कालांतराने संघटनेत सामील झाल्या होत्या.

इ. स. १८८३-९७ दरम्यान ए.एस.ए.चे अध्यक्ष असलेले फ्रान्सिस ए. वॉकर यांनी सरकारी जनगणना संघटनेशी ए.एस.ए.ला जोडून संख्याशास्त्राचा वापर आणि प्रसार याद्वारे तिचा विस्तार अमेरिकाभर केला. त्यामुळे विविध क्षेत्रांतील आणि उद्योगधंद्यांतील व्यावसायिक या संस्थेशी मोठ्या संख्येने जोडले गेले.

शोध आणि सजग निर्णय घेण्याची प्रवृत्ती जोपासण्यासाठी विदा आणि सांख्यिकी विचारांवर अवलंबून असलेले जग हे ए.एस.ए.चे स्वप्न आहे. त्याला अनुलक्षून संख्याशास्त्राच्या नित्य वापराला आणि व्यवसायाला ए.एस.ए. प्रोत्साहन देते. तरी मानवी कल्याणासाठी संख्याशास्त्र राबविणे आणि संख्याशास्त्रीय समस्यांशी संबंधितांमध्ये समन्वय साधून त्यांच्या प्रयत्नांची कार्यक्षमता वाढविणे याबाबतचे कार्यक्रम संस्था सतत हाती घेते.

ए.एस.ए. ना-नफा ना-तोटा या तत्त्वावर चालवली जाते. सांख्यिकीय पद्धतीशास्त्र वा त्याचे उपयोजन यांना वाहिलेली प्रकाशने काढून, संमेलने आयोजित करून संख्याशास्त्राचे विज्ञान आणि योगदान यांची माहिती सार्वत्रिक करुन, ए.एस.ए. आपली उद्दिष्टे साध्य करते. इतर संस्थांशी सहकार्य, संशोधनाला उत्तेजन, संख्याशास्त्राच्या उपयोजनात उच्च व्यावसायिक मानदंडांचा आग्रह, संबंधित शिक्षणाला प्रोत्साहन, इत्यादी मार्ग ही संस्था संख्याशास्त्राच्या विकासासाठी अवलंबते. प्रयत्नांची परिणामकारकता वाढविण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांनुसार एएसएने ७० हून अधिक विभाग स्थापन केले आहेत.

पहिल्या महायुद्धानंतर सर्वच पातळ्यांवरील कामात संख्याशास्त्राची गरज वाढली. या पार्श्वभूमीवर ए.एस.ए.ने संख्याशास्त्राच्या शिक्षणावर विशेष भर दिला. ए.एस.ए.च्या प्रयत्नांनी जैवसंख्याशास्त्रातील पहिला शैक्षणिक अभ्यासक्रम १९१८ मध्ये जॉन हॉपकिन्स विद्यापीठात तर १९२७ मध्ये पहिली संख्याशात्रीय प्रयोगशाळा आयोवा राज्य विद्यापीठात स्थापन झाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अभियांत्रिकी, अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञान आणि शिक्षण यासारख्या विषयांत संख्याशास्त्र वापरण्याची आणि त्यातील तज्ज्ञांची मागणी वाढली. ती लक्षांत घेऊन ए.एस.ए.ने वेळोवेळी विषयानुरूप विभाग स्थापन केले. त्यांची संख्या आता ३० आहे.

ए.एस.ए.ने १८८८ मध्ये Journal of the American Statistical Association (JASA) हे नियतकालिक सुरू केले, जे आता अतिप्रतिष्ठित मानले जाते. सध्या ए.एस.ए १७ नियतकालिके प्रकाशित किंवा सहप्रकाशित करते. या नियतकालिकांचे लक्ष्य व्यवसाय, अर्थशास्त्र, जैवऔषधशास्त्रीथ संशोधन, शेतकी, जीवशास्त्र, पर्यावरण, खेळ, सर्वेक्षणे इत्यादींतील संख्याशास्त्र असे असते. CHANCE आणि Significance या पत्रिका समाजाच्या विकासासाठी सांख्यिकी आणि विदेचा वापर करण्यात रस असणाऱ्या सामान्यांसाठी आहेत. सदस्यांसाठी Amstat News ही पत्रिका असते. शिशु ते बारावी वर्गांसाठी आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक मार्गदर्शन आणि स्रोत देणारी मासिके, ए.एस.ए. प्रकाशित करते. यांत दिग्गज संख्याशास्त्र-शिक्षणतज्ज्ञ लेख लिहितात.

संख्याशास्त्र विषयाचा प्रसार करण्यासाठी ए.एस.ए. पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी काही तासांपासून ते दोन दिवसांच्या सांख्यिकी विश्लेषण, संख्याशास्त्र प्रकल्प, संख्याशास्त्रावरील शोधलेख इत्यादीवरील स्पर्धांचे आयोजन करते. विजेत्यांना प्रवास निधी, अनुदान किंवा शिष्यवृत्तीने गौरवले जाते. व्यवसाय केंद्र (Career center) हे ए.एस.ए.चे ठळक वैशिष्ट्य आहे. यात संस्थेकडून देण्यात येणाऱ्या मान्यता, पुरस्कार, अभ्यासक्रम, व्हिडिओ, वेबिनार यांसारख्या व्यावसायिक विकास कार्यक्रमांची माहिती असते. खास म्हणजे इथे जॉबवेब (व्यवसायजाल) असून तिथे संख्याशास्त्राशी निगडीत मान्यवर संस्थांच्या मनुष्यबळाच्या गरजांसंबंधींच्या जाहिराती असतात. https://www.amstat.org/ हे एएसएचे संकेतस्थळ आहे.

भौगोलिक सीमांपलीकडील विविध विद्याशाखांतील व्यावसायिक संख्याशास्त्रज्ञांशी स्वतःला जोडून घेण्यातील फायदे ओळखून १९२४ मध्ये ए.एस.ए.ने सर्व देशांतील संख्याशास्त्रज्ञांच्या जाहीर बैठका घेण्याचा संकल्प केला. त्यानुसार संख्याशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील देवाणघेवाण वाढविण्यासाठी ए.एस.ए. दरवर्षी सहा परिषदा आयोजित करते. ए.एस.ए.च्या आरोग्य शिक्षण संख्याशास्त्र विभागातर्फे या विषयावर अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले गेले आहे. ए.एस.ए.ने आरोग्य धोरण आणि आरोग्य सेवांशी निगडीत सांख्यिकी वितरीत करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संख्याशास्त्रात महिला आणि विदाविज्ञान परिषद ही संख्याशास्त्र आणि विदाविज्ञान क्षेत्रातील महिलांसाठी खास निर्माण केली आहे. तरीही शिक्षण, व्यवसाय, उद्योग आणि सरकारी पेशांतील सर्व स्तरांवरील महिलांकडेही परिषदेचे लक्ष असते. राष्ट्रीय धोरणे आखण्यातला संख्याशास्त्रज्ञांचा सहभाग वाढविण्यासाठी ए.एस.ए. प्रमुख धोरणकर्त्यांबरोबर सभा आयोजित करते.

खऱ्या व्यावसायिक संस्थेप्रमाणे ए.एस.ए. संख्याशास्त्रातील कळीच्या संकल्पनांबाबत सजग असते. उदाहरणार्थ, शून्य परिकल्पना तपासण्याकरिता एकाच लक्षणीयता पातळीचा (significance level), पी-मूल्य (p-value) = ०.०५ वापर करण्याबाबत असलेले मतभेद लक्षात घेऊन तिने एक तज्ज्ञ समिती नेमली आणि तिच्या अहवालानुसार २०१६ मध्ये सहा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. तसेच त्यासंबंधात चर्चा करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

संस्थेची शताब्दी साजरी करताना १९३९ मध्ये ए.एस.ए.ची सदस्य संख्या होती ३,०००. सध्या ए.एस.ए.कडे शिक्षण, सरकार, संशोधन आणि उद्योगधंदे क्षेत्रांतील एकूण १९,००० सदस्य आहेत.

ए.एस.ए. सरकारमान्यताप्राप्त संस्था असल्याने इथले संख्याशास्त्राचे औपचारिक शिक्षण, कार्यानुभव आणि निरंतर व्यावसायिक विकास कार्यक्रम यांना सर्वांकडून मान्यता मिळते. ए.एस.ए. संपूर्ण PStat मान्यता आणि प्रवेशपातळीवरील GStat मान्यता अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवाराच्या संख्याशास्त्रातील प्राविण्याची, मनुष्यबळाच्या शोधांत असणाऱ्या संस्थाना माहिती मिळते.

ए.एस.ए.ला तसेच सांख्यिकी व्यवसायाला उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संख्याशास्त्रज्ञांचा गौरव ए.एस.ए. पारितोषिके देऊन करते. संख्याशास्त्र आणि संबंधित विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ए.एस.ए. शिष्यवृत्ती देते आणि दरवर्षी काही अधिछात्रवृत्तीही देते.

सरकारी संस्था, आल्फ्रेड स्लोन फाउंडेशनसारख्या ना-नफा संस्था, ॲमेझॉन सारख्या नफा-कंपन्या इत्यादींकडून ए.एस.ए.ला आर्थिक पाठबळ मिळते.

अमेरिकेसह जगभर संख्याशास्त्राच्या वापराला सध्या आलेले महत्त्व हे गेल्या जवळजवळ १८० वर्षांतील ए.एस.ए.च्या अथक प्रयत्नांचे फळ आहे.

संदर्भ :

  समीक्षक : विवेक पाटकर