भार्गव, पुष्पा मित्रा : ( २२ फेब्रुवारी १९२८ – १ ऑगस्ट २०१७ ) पुष्पा मित्रा भार्गव, यांचा जन्म राजस्थानमधील अजमेर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील सार्वजनिक आरोग्य सेवेत डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांचे बहुतांश प्राथमिक आणि  माध्यमिक शिक्षण आजोबांच्या मार्गदर्शनाखाली घरी झाले. ते दहा वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब वाराणसीला राहायला आले. त्यांच्या तयारी वरून वाराणसीतील बेझंट थिऑसॉफ़िकल स्कूलमध्ये त्यांना वयाच्या दहाव्या वर्षी थेट नववीत प्रवेश देण्यात आला.

उच्च शिक्षणासाठी त्यांनी क्वीन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९४४ साली भौतिकी, गणित आणि रसायनशास्त्र विषयांत ते बी. एस्सी. झाले. आणखी दोन वर्षानी त्यांनी सेंद्रीय रसायनशास्त्रात एम. एस्सी. पदवी प्राप्त केली. भार्गव यांना लखनौ विद्यापीठाची संश्लेषक सेंद्रीय रसायनशास्त्रात, वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी पीएच.डी. प्रदान करण्यात आली. वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांचे चौदा शोध निबंध प्रकाशित झाले होते.

त्यानंतर काही काळ भार्गव यांनी हैदराबादच्या उस्‍मानिया विद्यापीठात अध्यापन कार्य केले. हैदराबादमध्येच सेन्ट्रल लॅबॉरेटरीज फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चमध्ये १९५३ पर्यंत ते कार्यरत राहिले. पुढे डॉक्टरेटनंतरच्या अभ्यासासाठी ते अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसन येथे गेले. तेथील मॅक् आर्डल मेमोरियल लॅबॉरेटरी ऑफ कॅन्सर रिसर्चमध्ये चार्ल्स हायडेलबर्गर यांच्या नेतृत्वाखाली ते कर्करोगविरोधी औषधांविषयी संशोधन करीत होते. नंतर इंग्लंडमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये त्यांनी वेलकम रिसर्च फेलो म्हणून काम केले. या कालखंडात त्यांना जीवविज्ञानाची आवड निर्माण झाली. १९५८ मध्ये ते हैदराबादला पुन्हा सेन्ट्रल लॅबॉरेटरीज फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चमध्ये वैज्ञानिक पदावर रुजू झाले. मधल्या काळात त्या संस्थेचे नाव बदलून क्षेत्रीय अनुसंधान प्रयोगशाळा (Regional Research  Laboratory – RRL) असे झाले होते. विविध पाश्च्यात्य देशांत संशोधनासाठी केलेल्या वास्तव्यानंतर भार्गव यांना असे तीव्रतेने जाणवत होते की आपल्या देशात जीवशास्त्रात रेण्वीय पातळीवर काम होण्याची गरज आहे. त्यांच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने असा विभाग निर्माण करण्याचे मान्य केले.

१९७७ साली सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायॉलॉजी (CCMB) ची स्थापना झाली. काही सहकाऱ्यांच्या मदतीने, भार्गव यांनी अतिशय विचारपूर्वक आणि मेहनतीने या संस्थेची देखणी वास्तू साकार केली. १९९० मध्ये निवृत्त होईपर्यंत ते संस्थेच्या संचालकपदी राहिले.

सीसीएमबी संस्थेची निर्मिती या एकाच कामगिरीबद्दलही भार्गव यांना भारतातील आधुनिक जीवशास्त्राचे आणि जैवतंत्रज्ञानाचे शिल्पकार म्हणता येईल. परंतु त्यांनी एक स्पष्टवक्ता विचारवंत, लेखक, शास्त्रज्ञ, कुशल प्रशासक, संस्थास्थापक आणि कलासक्त, संवेदनाशील नागरीक या नात्यांनी प्रचंड आणि दर्जेदार काम करून ठेवले आहे.

भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयात स्वतंत्र जैवतंत्रज्ञान (Biotechnology) विभाग स्थापन करण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. सत्तरच्या दशकात जनुकीय अभियांत्रिकी या संकल्पनेचे महत्व समजून तिचे नामकरण करून तो शब्द रूढ करणारे ते भारतीय शास्त्रज्ञ आहेत .

भार्गव यांनी विज्ञान प्रसारासाठी ५५० पेक्षा जास्त लेख आणि सहा पुस्तके लिहिली. शेकडो भाषणे देऊन जनतेत वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा म्हणून प्रयत्न केले. अनेकदा त्यांची मते विद्यमान सरकारच्या विरुद्ध असत पण सरकारी नोकरीत असूनही ते आपले मुद्दे मांडायला कचरत नसत.

भार्गव यांच्या समीक्षक आणि टीकाकार वृत्तीचा सरकारला अनेकदा फायदा झाला. आपल्या देशात जनुकीय अभियांत्रिकी हे नवे तंत्रज्ञान येऊ पहात होते तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांचे नामांकन जनुकीय अभियांत्रिकीचे मूल्यांकन करण्याच्या समितीत तज्ज्ञ म्हणून केले होते.

प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांत भार्गव  यांनी किमान सव्वाशे शोधनिबंध प्रकाशित केले.  २००५ ते २००७ या काळात त्यांनी  राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे (National Knowledge Commission) उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

गुहा रिसर्च सेंटर ही संस्था स्थापन करण्यात आणि तिची नोंदणी करण्यात भार्गव यांनी पुढाकार घेतला. भारतात जीवरसायनशास्त्र विकसित व्हावे यासाठी ही संस्था काम करते. सेंटर फॉर डीएनए फिंगर प्रिंटींग अँड डायगोनिस्टिक्‍स (CDFD), हैदराबाद ही संस्था प्रामुख्याने भार्गव यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आली. तसेच मेडिकली अवेअर अँड रिस्पॉन्सिबल सिटीझन्स ऑफ हैदराबाद, MARCH ही स्वयंसेवी संघटना त्यांनी स्थापन केली. या संघटनेत समाजाभिमुख वैद्यकीय अधिकारी, इस्पितळांचे प्रशासक, समाज सेवी, शास्त्रज्ञ, औषध उद्योगातील तज्ज्ञ आणि उद्योजक यांचा समावेश होता. आरोग्यसेवा स्वयंप्रेरणेने भ्रष्टाचारमुक्त राहाव्या हा या संघटनेचा उद्देश होता. भारतात नव्याने जैव तंत्रज्ञानाने शक्य होणाऱ्या शरीराबाहेर स्त्रीबीज फलन, भ्रूणाचे गर्भाशयात स्थानांतरण, गर्भधारणा, भ्रूणलिंगपरीक्षा, गर्भवाढ इ. सेवा उपलब्ध होऊ लागल्या. MARCH सारख्या स्वयंसेवी संघटनांनी याबाबत जागरूकता निर्माण केली. ग्राहक जनतेची फसवणूक, गैरव्यवहार होऊ नये असे पद्धतशीर प्रयत्न त्यामुळे शक्य झाले.

लीजन द ऑनर हा सन्मान त्यांना फ्रांसच्या राष्ट्रपतींकडून प्रदान करण्यात आला.

जीवनातील शेवटचे दशक त्यांना अनेक शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागले पण तरीही ते सतत कार्यरत राहिले. वयाच्या एकुण नव्वदाव्या वर्षी  त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा