खंदकासारखा आकार असणाऱ्या दरीला खचदरी म्हणतात. समोरासमोर असलेल्या हिच्या भिंती एकमेकींना जवळजवळ समांतर असून त्यांचा उतार तीव्र असतो. भूकवचात परस्परांना समांतर असणारे सामान्य विभंग (तडे) निर्माण होतात आणि त्यांच्यादरम्यान असलेली जमीन वा भूकवचाचा ठोकळा खचून खाली जातो व तेथे खचदरी निर्माण होते. ही खचदरी निर्मितीची प्रचलित कल्पना आहे.

पूर्व आफ्रिकेतील खचदऱ्या सर्वपरिचित आहेत. झँबीझी नदीच्या मुखालगतचा प्रदेश ते उत्तरेस तांबडा समुद्र यांच्यामधील सुमारे २,९०० किमी. लांबीच्या प्रदेशात या खचदऱ्या पसरलेल्या आहेत. स्थूलमानाने उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलेल्या या खचदऱ्या एका सरळ रेषेत गेलेल्या नाहीत व त्यांचे फाटेही निर्माण झालेले दिसतात. व्हिक्टोरिया सरोवराच्या पश्चिमेस असलेल्या प्रदेशातील खचदऱ्यांमध्ये टांगानिका, एडवर्ड, अ‍ॅल्बर्ट, किवू वगैरे सरोवरे असून बैकल सरोवरही खचदरीत आहे. व्हिक्टोरिया सरोवराच्या पूर्वेकडील खचदऱ्यांमध्ये रूडॉल्फ, बारिंगो, मागदी, नेट्रॉन वगैरे सरोवरे अशी आहेत. त्यांच्या दक्षिणेकडील निआस सरोवरही एका खचदरीत आहे. खचदऱ्यांची लांबी बरीच जास्त असली, तरी त्या ३० ते ७० किमी. एवढ्याच रुंद असतात.

भूसांरचनिक हालचालींमुळे भूकवचाचा मोठा भाग सामान्य पातळीखाली खचून खंदकासारखी मोठी खचदरी तयार होते. उदा., कॅलिफोर्नियातील ओवेन्स दरी, जॉर्डन व ऱ्हाईन नद्यांची खोरी, अटलांटिक महासागराच्या मध्यस्थ महासागरी पर्वतश्रेणीच्या माथ्यावर मध्य अटलांटिक खचदरी असून तिच्या दोन्ही बाजूंना दोन भूपट्ट आहेत. अनेक खचदऱ्यांची खोली शेकडो मीटर असून काहींचे तळ समुद्रसपाटीच्या खाली ३०० ते १,४०० मी. पर्यंत खोल आहेत. उदा., बैकल सरोवर समुद्रसपाटीच्या वर १,००० मी. पासून सुरू होते व ते समुद्रसपाटीच्या खाली १,४०० मी. इतके खोल आहे. टांगानिका सरोवर समुद्रसपाटीच्या वर २,००० मी., तर खाली ७०० मी. आहे. व्हिक्टोरिया सरोवराच्या पूर्वेस खचदऱ्या असलेल्या प्रदेशात सापेक्षत: अलीकडच्या काळात ज्वालामुखी क्रिया घडली होती. त्या भागातील ज्वालामुखी आता नामशेष होत आलेले आहेत. खचदरीलगत पूर्वेला किलिमांजारो हा ज्वालामुखी पर्वत आहे. पूर्व आफ्रिकेतील खचदऱ्या असलेल्या प्रदेशाच्या उत्तरेस व तांबड्या समुद्राच्या पलीकडे पॅलेस्टाइन, मृत समुद्र व जॉर्डन नदी असणाऱ्या क्षेत्रातही १५ ते २० किमी. रुंदीच्या खचदऱ्या आहेत.

खचदऱ्यांनी व्यापलेले मोठे क्षेत्र पाहता त्यांची निर्मिती ही भूकवचामधील घडामोडींमधील लहानसहान घटना नाही. त्या क्षेत्रात ज्वालामुखी क्रिया घडून आल्याचा पुरावाही आढळला आहे. भूकवचामधील काही तीव्र स्वरूपाच्या खळबळीद्वारे खचदऱ्या निर्माण झाल्या असाव्यात, असे ठामपणे म्हणता येते. अटलांटिक महासागरातील मध्यभागी असलेल्या कटकात म्हणजे मिड-अटलांटिक रिजमध्ये या कटकाच्या मध्याशी असलेली खचदरी १८५३ मध्ये आढळली. ती खचदरी व आफ्रिकेतील टांगानिका खचदरी या दोन्हींमध्ये पुष्कळच सारखेपणा आढळला आहे.

ऱ्हाईन नदीची खचदरी पुढील प्रकारे निर्माण झाली आहे. सुमारे ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या तृतीय कल्प या काळात भूकवचाला घड्या पडून आल्प्स पर्वताच्या रांगा निर्माण झाल्या. त्या निर्माण होताना दाब पडून विक्षोभ निर्माण झाला. या विक्षोभामुळे व्होज व ब्लॅक फॉरेस्ट यांच्यादरम्यान असलेला प्रदेश खचून ऱ्हाईन नदीची खचदरी निर्माण झाली आहे.

पूर्व आफ्रिकेतील खचदरीला जे. डब्ल्यू. ग्रेगरी यांनी द ग्रेट रिफ्ट व्हॅली (महा खचदरी) हे नाव दिले. भूकवचातील हालचालींमुळे त्याच्यावर ताण पडला व त्यात सामान्य विभंग निर्माण झाले. अशा दोन विभंगांच्या मधला खडकाचा ठोकळा खचून खाली सरकला व खचदरी निर्माण झाली. जमीन खचण्याची अशी क्रिया म्हणजे एखाद्या कमानीतील कळीचा (मधला) दगड खाली जाण्याच्या क्रियेसारखी ही क्रिया आहे, असे त्यांचे मत होते.

संपीडनाने म्हणजे दाबले जाण्याने भूकवचात व्युत्क्रमी विभंग निर्माण होतात. अशा दोन विभंगांच्या मधला भूकवचाचा ठोकळा खाली दडपला जाऊन खचदऱ्या तयार होतात, असेही मत असून ते आता मागे पडले आहे.

खचदऱ्या व भूसांरचनिक द्रोणी यांची उत्पत्ती पुढीलप्रमाणे होते, असे मानले जाते. सापेक्षत: तीव्र उताराच्या पर्वतमय (डोंगराळ) बाजू आणि सपाट पृष्ठभाग ही बहुतेक भूसांरचनिक द्रोणी व खचदऱ्यांसह दऱ्यांची गुणवैशिष्ट्ये होत. विभंगांच्या ठिकाणी पुढील प्रकारचे विस्थापन (स्थानांतर) होऊन तीव्र उताराच्या बाजू निर्माण होतात. म्हणजे दरीचा पृष्ठभाग सभोवतालच्या सीमाक्षेत्रांच्या सापेक्ष खाली जातो अथवा याउलट सीमाक्षेत्रे पृष्ठभागाच्या सापेक्ष वर उचलली जातात. दरीचे पृष्ठभाग व सभोवतालचे पर्वत वा पठारे यांच्या उंचीमधील फरकाचा पल्ला प्रमुख खचदऱ्यांच्या बाबतीत फक्त काहीशे मीटर ते २,००० मी. पेक्षा जास्त एवढा आहे. भूसांरचनिक दऱ्या व द्रोणी यांची रुंदी १० किमी. इतकी कमी ते १०० किमी.हून जास्त इतकी आहे. त्यांची नमुनेदार लांबी शेकडो किमी. असून तिचा पल्ला काही दशक किमी. ते हजारो किमी. आहे.

भूकवचाचे विस्तारण आणि नंतर भूकवचाच्या ठोकळ्यांच्या किंवा शिलावरणीय भूपट्टांच्या अपसरणाद्वारे निर्माण झालेल्या मोकळ्या जागेत भूकवचाचा ठोकळा खाली जाणे यांद्वारे बहुसंख्य भूसांरचा

निक द्रोणी व दऱ्या निर्माण झाल्या आहेत. ठिसूळ भूकवचाचे विस्तारण झाल्याने ते भंग पावते व लगतचे भूकवचाचे ठोकळे वा भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात. तेव्हा अशा तऱ्हेने निर्माण झालेल्या मोकळ्या जागेत (फटीत) अधिक लहान ठोकळा खाली सरकतो. या ठोकळ्याच्या सभोवतालच्या विभंग ठोकळ्यांच्या दरम्यान खाली जाण्याने खचदरी वा सांरचनिक द्रोणी निर्माण होते; कारण सभोवतालचे विभंग ठोकळे सामान्यपणे भूकवचाच्या विस्तारणाच्या आविष्कारामध्ये वर आलेले असतात. अशा तऱ्हेच्या भूसांरचनिक खळग्याला ग्राबेन ही संज्ञा आहे. ग्राबेन हा जर्मन शब्द द्रोणी (गर्त) वा खंदक (चर) यांसाठी वापरतात.

भूकवचाच्या क्षितिजसमांतर संपीडनाने (आडव्या दिशेत दाबले जाण्याने) म्हणजे भूकवच आखूड झाल्यानेही भूसांरचनिक खळगे निर्माण होतात. उतरण (ढाळवाट) दऱ्या व अग्रभूमी द्रोणी हे संपीडनात्मक भूसांरचनिक द्रोणींचे दोन प्रकार ओळखले जाऊ शकतात. उतरण दरी ही खचदरीशी समानार्थी संज्ञा आहे; परंतु दरीची सीमाक्षेत्रे तिच्या पृष्ठावर दाबली (रेटली) जाऊन ती निर्माण होते. याउलट संपूर्ण शिलावरण खालील दिशेत सावकाशपणे वाकविले जाऊन किंवा ते वाकविता येण्याजोगे झाल्याने अग्रभूमी द्रोणी निर्माण होते.

सिंधु-गंगा नद्यांच्या मैदानाने एक खोल खचदरी व्यापली आहे, असे कर्नल सर एस. बुरार्ड यांनी सुचविले होते. या मैदानात ओळंब्याच्या आंदोलनात आढळलेल्या त्रुटी व इतर भूगणितीय निरीक्षणे व निष्कर्ष यांवरून त्यांनी ही कल्पना सुचविली होती; मात्र भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेमधील भूवैज्ञानिकांना हे मत मान्य नव्हते. या मैदानाची मध्यम खोली व साध्या जलोढीय निक्षेपणाद्वारे (गाळ साचण्याच्या क्रियेद्वारे) या सपाट मैदानाची झालेली निर्मिती ही बुरार्ड यांच्या मताविरुध्दचे पुरावे देऊन त्यांनी त्याचे खंडन केले होते.

समीक्षण : वसंत चौधरी