लेदर्ले, फादर मॅथ्यू : ( १३ मार्च १९२६—८ जून १९८६ ). ख्रिस्ती धर्मगुरू. त्यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला. प्रत्येक सशक्त तरुणाने काही काळ तरी लष्करामध्ये नोकरी करावी, हा त्या काळातील यूरोपियन राष्ट्रांतील नियम होता. लेदर्ले यांचे कुटुंब नाझी विचारप्रणालीच्या विरुद्ध होते; पण लष्करभरतीच्या सक्तीमुळे मॅथ्यू लेदर्ले यांना नाझी सैन्यात भरती व्हावे लागले. याच काळात दुसऱ्या महायुद्धाने पेट घेतला आणि त्या महायुद्धात लेदर्ले नाझी जर्मनीचे एक सैनिक म्हणून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दोस्त राष्ट्रांविरुद्ध लढले. या महायुद्धात जर्मन सैन्याचा पुरता पराभव होऊन हिटलरने आत्महत्या केली. युद्धबंदी झाली तेव्हा त्यांच्या तुकडीतील ८५ सैनिकांपैकी लेदर्लेंसह केवळ दोनच व्यक्ती जिवंत राहिल्या. युद्धबंदी जाहीर झाली आणि लेदर्ले युद्धकैदी म्हणून पकडले गेले. युद्धकैद्यांच्या छावणीतून सुटण्याचा लेदर्ले यांचा पहिला प्रयत्न असफल ठरला. दुसऱ्यावेळी मात्र त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला. लेदर्ले आपल्या छावणीतून गुपचूप निसटले आणि हिवाळ्यात अत्यंत गारठा असतानाही नदीतून पोहून ते पैलतीरावर पोहोचले. त्यानंतर वेषांतर करून ते स्वगृही आले.

घरी परतल्यानंतर या तरुणाने स्वत:साठी एक वेगळाच जीवनमार्ग निवडला. ‘येशू संघ’ वा ‘सोसायटी ऑफ जिझस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या संघात त्यांनी १९४९ साली प्रवेश केला आणि त्यानंतर दोन वर्षांतच आपली कर्मभूमी म्हणून त्यांनी भारताची निवड केली. हा निर्णय घेतला तेव्हा लेदर्ले यांचे वय अवघे सव्वीस वर्षांचे होते.

भारतात आल्यानंतर धर्मगुरूपदासाठी अभ्यास करत असताना सुरुवातीच्या काळात त्यांचे वास्तव्य अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या शहरात आणि राहाता व केंदळ या खेडेगावांत होते. या ठिकाणीच त्यांनी मराठी भाषेचे धडे आत्मसात केले. त्यानंतर पुणे शहरात १९५७ साली त्यांना गुरुदीक्षा मिळाली.

पुण्यात फादर लेदर्ले यांनी जवळपास पंचवीस वर्षे वास्तव्य केले ते अस्सल पुणेकर म्हणूनच. मराठी भाषेवर त्यांनी प्रभुत्व तर मिळवलेच, याशिवाय या मूळच्या जर्मन नागरिकाने मराठी भाषा हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून एम.ए.ची पदवीही संपादन केली. ‘फिलॉसॉफिकल ट्रेंड्स इन मॉडर्न महाराष्ट्र’ (‘आधुनिक महाराष्ट्रातील तात्त्विक विचारप्रवाह’) या शीर्षकाचा प्रबंध लिहून पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी मिळविली. स्वधर्म आचरण करीत असतानाच इतर धर्मांत जी काही चांगली मूल्ये आणि विचार असतील त्यांचा खुल्या मनाने स्वीकार करावा, ही त्यांची मूलभूत धारणा. धर्मविषयक स्वत:च्या श्रद्धांचा त्याग न करताही इतरांच्या धर्माबद्दल आदर बाळगणे शक्य आहे, हे फादरांनी स्वत:च्या उदाहरणाने सिद्ध करून दाखविले.

एका येशू संघीय धर्मगुरूने हिंदू धर्म-तत्त्वज्ञानात आणि उपासनापद्धतीत रस घ्यावा; नव्हे, त्या धर्मातील काही मूल्यांचा, संकल्पनांचा आपल्या परीने प्रचार करावा आणि स्वत:च्या उपासनापद्धतीत त्यांचा स्वीकार करावा याविषयी कुणालाही आश्चर्य वाटावे यात नवल असे काहीच नव्हते.

धर्मश्रद्धाविषयक तत्त्वे आणि स्थानिक संस्कृती यांची सांगड घालता येते, असे मत फादर लेदर्ले यांनी सातत्याने मांडले. त्यांचे हे मत ख्रिस्ती धर्माच्या जाहीर भूमिकेपेक्षा आगळेवेगळे होते असे मुळीच नव्हते. ख्रिस्ती धर्मातील कॅथलिक पंथाचे सर्वोच्च धर्माधिकारी पोप तेविसावे जॉन यांनी विसाव्या शतकाच्या मध्यंतरानंतर दुसरी व्हॅटिकन परिषद आयोजित करून कॅथलिक धर्मपीठाची कवाडे मुक्त विचारांसाठी खुली करवून दिली. या परिषदेपूर्वी केवळ ख्रिस्ती धर्मच मानवजातीच्या मुक्तीचे द्वार आहे, असे ख्रिस्ती धर्माधिकारी मानत असत. ख्रिस्ती धर्माच्या बाहेर जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांत सत्याची किरणे आहेत, हे कॅथलिक धर्मपीठाने या ऐतिहासिक परिषदेद्वारे पहिल्यांदाच मान्य केले. या तत्त्वाचा स्वीकार केल्यानंतर ख्रिस्ती धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांतील आणि संस्कृतींमधील चिरंतन मूल्यांचा आणि ख्रिस्ती धर्माशी विसंगत नसलेल्या तत्त्वांचा स्वीकार करणे नैसर्गिकच बनले. ‘सांस्कृतिकरण’ अथवा ‘इनकल्चरेशन’ या नावाने हा सिद्धांत नंतर सर्वतोमुखी झाला. जर्मनीतून भारतात आल्यानंतर व या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर, सांस्कृतिकरणाचा प्रचार करणे हे फादर लेदर्ले यांच्या जीवनातील ध्येयच बनले.

“कुठल्याही धर्माने स्थानिक संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनणे, त्या संस्कृतीतील जी चिरंतन मूल्ये असतील त्यांचा नाश न करता त्यांचे संवर्धन करणे म्हणजे सांस्कृतिकरण” अशी फादर लेदर्ले यांनी सुटसुटीत व्याख्या केली होती. सांस्कृतिकरणाचे हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अनेक मार्ग हाताळले. एकदा ते पंढरीच्या वारीतही सामील झाले. प्रत्येक ख्रिस्ती धर्मगुरूस वर्षातून ठरावीक काळात मौन पाळून तप:साधना करावी लागते, या तप:साधनेसाठी फादर लेदर्ले यांनी एकदा रवींद्रनाथ टागोरांच्या ‘शांतिनिकेतन’ ची निवड केली. ख्रिस्ती उपासनापद्धतीत भजन, आरती आणि टाळमृदंग वगैरे संगीतसाधनांचा वापर मराठी ख्रिस्ती समाजात लोकप्रिय करण्यात फादर लेदर्ले यांचा मोठा वाटा आहे.

फादर लेदर्ले यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपले कार्य कुठल्याही एका क्षेत्रापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांचा स्वभाव मूलत:च व्यासंगी, त्यामुळे साहित्य, तत्त्वज्ञान, धर्मज्ञान, भक्तिवाङ्मय, समाजप्रबोधन, कला वगैरे अनेक क्षेत्रांत त्यांनी अमाप संचार केला. आज भारतीय ठशातील ख्रिस्ती कलेस स्वत:चे एक आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले आहे, त्यामागची एक मुख्य प्रेरणामूर्ती म्हणजे फादर लेदर्लेच. ख्रिस्ती धर्म संकल्पनांना भारतीय संस्कृतीच्या आणि तत्त्वज्ञानाच्या चौकटीत चित्रित करण्यासाठी त्यांनी जेमिनी रॉय, ज्योती साही, सिस्टर क्लेर वगैरे अनेक ख्रिस्ती आणि ख्रिस्तेतर चित्रकारांना प्रोत्साहन दिले. भगव्या कफनीतील येशू ख्रिस्त, भारतीय नारीच्या पेहरावातील येशूची आई मेरी (मरिया) आणि समया, रांगोळ्या, स्वस्तिक वगैरे भारतीय प्रतीकांचा अत्यंत कलात्मक रीत्या वापर करून सजविलेली ही चित्रे नाताळ शुभेच्छापत्रांसाठी वापरून त्यांनी येशू संघाच्या ‘आर्ट इंडिया’ या संस्थेद्वारे ही नाताळ शुभेच्छापत्रे भारतात आणि परदेशांतही लोकप्रिय केली. ख्रिश्चन पेंटिंग इन इंडिया थ्रू द सेंच्युरीज  या आपल्या पुस्तकात फादर लेदर्ले यांनी दोन हजार वर्षांपूर्वीपासून ते विसाव्या शतकातील भारतीय ख्रिस्ती कलेविषयी चर्चा केली आहे. मुंबईच्या ‘हेरास इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन हिस्टरी अँड कल्चर’ या संस्थेने १९८४ साली आयोजित केलेल्या ‘फादर हेनरी हेरास स्मृती व्याख्यानमाले’त फादर लेदर्ले यांनी ‘भारतीय ख्रिस्ती कला’ या विषयावर व्याख्याने दिली. ती व्याख्याने संकलित करण्यात आली आहेत. फादर लेदर्ले यांच्या निधनानंतर हे पुस्तक प्रकाशित झाले.

पुण्यातील मुठा नदीच्या तीरावर फादर लेदर्ले यांनी वसवलेल्या ‘स्नेहसदन’ या आश्रमाचे स्वरूप आणि कार्यही असेच अनोखे. पुण्यातील शनिवार पेठेसारख्या अत्यंत मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात निसर्गाशी जवळीक साधीत व्यक्ती आणि संस्थांमध्ये वैचारिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण निर्माण करण्याच्या कार्यात लेदर्ले यांनी आपल्या आयुष्याची जवळजवळ दोन तपे खर्ची घातली.

‘स्नेहसदन’ हा फादर लेदर्ले यांचा आश्रम पुण्यातील सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक देवाणघेवाण यांचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. हा आश्रम येशू संघीय धर्मगुरूंमार्फत चालविला जात असला, तरी आंतरधर्मीय सलोखा आणि देवाणघेवाण हे या आश्रमाचे प्रमुख ध्येय असल्याने कुठल्याही जाती-धर्मांच्या आणि विचारसरणीच्या व्यक्तींना आणि संस्थांना स्नेहसदनच्या सभागृहाचा वापर अगदी नाममात्र शुल्क आकारून करण्यास दिला जात असे. ‘स्नेहसदन’ या आपल्या आश्रमातील व्यक्तींचे आचरण एखाद्या आश्रमवासियांप्रमाणे असावे, असा फादर लेदर्ले यांचा आग्रह असे. या परिसरातील इतर बहुसंख्य रहिवाशांप्रमाणे या आश्रमातील जेवणही शुद्ध शाकाहारीच राखण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. ‘स्नेहसदन’मधील सर्व व्यवहार मराठीतून चालावेत, असा त्यांचा आग्रह होता.

पुण्यात जवळपास पंचवीस वर्षे सातत्याने कार्य केल्यानंतर जून १९८५ मध्ये येशू संघाच्या गोवा-पुणे धर्मप्रांताचे विभागाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. त्या वेळी त्या विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी, म्हणजे पणजी या गोव्याच्या राजधानीस स्थलांतर करणे त्यांना भाग पडले. मात्र त्यांना गोव्यात कार्य करण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही. फादर लेदर्ले पट्टीचे पोहणारे. गोवा-पुणे धर्मप्रांताचे विभागाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर केवळ वर्षभरातच गोव्यातील बागा या समुद्र किनाऱ्यावर पोहताना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांची कर्मभूमी पुणे येथे आणून तिथे त्याचे दफन केले गेले.

संदर्भ :

  • Lederle, Matthew S. J. Christian Paintings In India Through The Centuries, Gujrat, 1987.
  • पारखे, कामिल, उत्तुंग,  पुणे, १९९३.
  • लेदर्ले, फादर मॅथ्यू, ख्रिस्त मंडळाचा संक्षिप्त इतिहास, पुणे, १९६३.