येशू ख्रिस्त यांच्या काळी पॅलेस्टाईनमधील समाज हा पुरुषप्रधान होता. त्या काळी चूल आणि मूल हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र मानले जात होते. स्त्री आणि पुरुष समान आहेत, दोघेही देवाची रूपे आहेत, असे क्रांतिकारी विधान बायबयलच्या उत्पत्ती (Genesis) या पहिल्या पुस्तकात केले आहे; परंतु पॅलेस्टाईनमध्ये स्त्रीला कधीही समानतेने वागवले गेले नाही. पत्नी ही पतीच्या मालकीची वस्तू मानली गेली. ‘परस्त्रीचा लोभ धरू नये’ ही दहा आज्ञांपैकी एक प्रमुख आज्ञा होती. स्त्री एक व्यक्ती आहे म्हणून नव्हे, तर ती पित्याच्या किंवा पतीच्या मालकीची असल्यामुळे तिची अभिलाषा धरणे गैर होते. व्यभिचारिणीला दगडधोंड्यांनी ठार करण्याची शिक्षा सांगितली जात होती. वांझ तसेच निपुत्रिक स्त्रीला कमनशिबी समजले जात असे. अशा स्त्रीचा पती रखेल ठेवू शकत असे. पुरुष स्त्रीला कुठल्याही कारणासाठी सहज घटस्फोट देऊ शकत असे; परंतु स्त्री पुरुषाला घटस्फोट देऊ शकत नव्हती. सुदैवाने तिला पुनर्विवाहाचा अधिकार होता (बायबल : अनुवाद, ‘ड्यूटेरोनॉमी’ २४ : १-२). पतिपत्नीला एकत्र घराबाहेर पडता येत नसे. पुरुषाप्रमाणे स्त्रीला कायदेशीर हक्क नव्हते. लहान मुलांप्रमाणे तिला अजाण समजले जात असे. न्यायालयात तिची साक्ष ग्राह्य मानली जात नसे. कार्यक्रमाच्या वेळी पुरुषांची नोंद घेतली जात; मात्र स्त्रियांच्या उपस्थितीची दखल घेतली जात नसे. स्त्रियांना धर्मसभेत मुक्त प्रवेश होता; परंतु मंदिरात पुरुषांनाच प्रथम स्थान होते. त्या काळी श्रद्धावान ज्यू मनुष्य दररोज पुढीलप्रमाणे प्रार्थना करीत असे : “हे देवा, तू मला परराष्ट्रीय, गुलाम किंवा स्त्री म्हणून जन्माला घातले नाहीस म्हणून मी तुला धन्यवाद देतो”. ज्यू लोक परक्या लोकांना आणि गुलामांना कनिष्ठ समजत असतच; परंतु आपल्याच समाजातील स्त्रियांनाही ते कमी लेखीत असत.

या सर्व जाचक नियमांना येशू ख्रिस्त यांनी आव्हान दिले. त्यांनी स्त्रीला स्वयंपाकघरातून बाहेर काढले. ते गावोगावी प्रवचने देत हिंडले. त्यांच्याबरोबर बारा शिष्य होते. त्या काळी कुणीही गुरू स्त्रियांना सोबत घेऊन फिरत नसे. त्यांनी मात्र तो नियम बाजूला सारून स्त्रियांनाही प्रचार-यात्रेत सामील करून घेतले. मेरी माग्दालेना (मॅग्डालीना), सुजान्ना, यहुदी राजा हेरोदचा कारभारी खुझा यांची पत्नी जोहान्ना यांचा त्यांच्यात समावेश होता. त्या आपल्या पैशाअडक्याने येशू ख्रिस्त यांची सेवा करीत असत. (बायबल : ‘लूक’ ८ : ३).

गुरूने स्त्रियांच्या घरी जाणे, त्यांच्याकडून पाहुणचार स्वीकारणे, त्यांच्या संगतीत वावरणे आणि त्यांच्याबरोबर धर्मचर्चा करणे ही गोष्ट तत्कालीन ज्यू समाजाला मुळीच मान्य नव्हती. येशू ख्रिस्त यांनी हाही संकेत मोडला. मार्था आणि मरिया या लाझरसच्या दोन बहिणी. या भावंडांवर त्यांचा भारी लोभ होता. त्यांनी या स्त्रियांच्या घरी जाऊन त्यांच्या आदरातिथ्याचा स्वीकार केला आणि त्यांना अध्यात्म-ज्ञानाचे धडे दिले. (बायबल : ‘लूक’ १० : ३८–४२).

येशू ख्रिस्त यांनी केलेली काही महत्त्वाची स्त्रीविषयक कार्ये :

  • स्त्रीने पुरुषाला स्पर्श करणे ही तत्कालीन ज्यू समाजात आणि सर्वच समाजांत अशक्यप्राय गोष्ट मानली जात होती. एकदा येशू ख्रिस्त सायमन नावाच्या गृहस्थाच्या घरी भोजनास गेले, तेव्हा एक कुप्रसिद्ध महिला तिथे धावत आली. ती ओणवी झाली. तिने आपल्या अश्रूंनी येशू ख्रिस्त यांचे पाय धुतले, आपल्या केशकलापाने ते पुसले आणि सुगंधी अत्तराने ते माखले. येशू ख्रिस्त यांनी अतिशय शांतपणे हे सर्व होऊ दिले. यजमान सायमन आणि जमलेले सर्व पाहुणे यांनी या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त केली; पण येशू ख्रिस्त यांनी त्या महिलेच्या वर्तनाचे समर्थन केले. तिच्या धैर्याबद्दल आणि विश्वासाबद्दल तिची जाहीर प्रशंसाही केली. (बायबल : ‘लूक’ ७ : ३६–५०).
  • एकदा येशू ख्रिस्त हे सॅमेरिया प्रांतातून जात होते. थकल्यामुळे ते विहिरीच्या काठाशी विश्रांती घेत बसले होते. अन्न आणण्यासाठी त्यांचे शिष्य गावात गेले होते. त्या वेळी एक सॅमरिटन स्त्री तिथे आली. तिथे एकांत होता. येशू ख्रिस्त पुरुष होते, ती स्त्री होती. तशात ते ज्यू होते आणि ती सॅमरिटन होती. या दोन समाजांत विळ्या-भोपळ्याचे नाते मानले जात होते. सर्व निर्बंध झुगारून येशू ख्रिस्त यांनी तिच्याशी संवाद सुरू केला. त्यांनी तिच्याशी अध्यात्म विषयावर सखोल चर्चा केली आणि तिला अनुग्रह देऊन पावन केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी तिला आपली प्रेषिता केली. ते दोघे बोलत असताना त्यांचे शिष्य परतले. येशू ख्रित हे एका स्त्रीशी; तशात परजातीतील स्त्रीशी बोलत आहेत, अध्यात्म-ज्ञानाविषयी चर्चा करीत आहेत हे पाहून शिष्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. (बायबल : ‘जॉन’ ४ : १–२७).
  • एक स्त्री रज:स्रावाने खूप हैराण झाली होती. अनेक प्रकारचे इलाज करूनही तिला गुण येत नव्हता म्हणून ती कंटाळली होती. एकदा येशू ख्रिस्त हे तिच्या गावात आले होते. त्यांची कीर्ती तिने ऐकली होती. त्यांच्या वस्त्राला जरी आपण स्पर्श केला, तरी आपण बरे होऊ असा विश्वास तिला वाटत होता; परंतु घराबाहेर पडणे म्हणजे मृत्युदंडाला आमंत्रण देण्यासारखे होते. ऋतुमती स्त्रीचा ज्यांना स्पर्श होतो, ते अशुद्ध होतात असे त्या काळी समज होता. तरीही ती गर्दीत घुसली. येशू ख्रिस्त यांनी तिला आपल्याला स्पर्श करू दिला आणि तिच्या श्रद्धेबद्दल तिचा जाहीर गौरव केला. (बायबल : ‘मार्क’ ५ : २५–३४).
  • जायरस नावाच्या अधिकाऱ्याची बारा वर्षांची मुलगी मरण पावली होती. येशू ख्रिस्त तिच्या घरी जाऊन तिला जिवंत केले आणि पुरुषाइतके स्त्रीचे जीवनही मोलवान आहे, हे सर्वांना दाखवून दिले (बायबल : ‘मॅथ्यू’ ९ : १८–२६). आजच्या स्त्री-भ्रूण हत्येच्या काळात ही बाब लक्षणीय ठरते.
  • व्यभिचार हा जगातील सर्वांत प्राचीन व्यवसाय आहे, असे म्हटले जाते; परंतु त्याची शिक्षा मात्र स्त्रीलाच भोगावी लागते. एकदा व्यभिचारी स्त्रीला मंदिराच्या प्रांगणात उभे करून तिची सुनावणी चालली होती. व्यभिचारिणीला दगडधोंड्यांनी ठार करण्याची शिक्षा धर्मशास्त्राने सांगितली होती. (बायबल : लेवीय, ‘लेव्हिटिकस’ २० : १०.) तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना म्हणाले, “तुमच्यापैकी ज्या कोणी व्यक्तीने एकही पाप केले नाही, त्याने तिला पहिला दगड मारावा”. एकेक करीत सगळे निघून गेले. ती बाई तिथे एकटी उरली. येशू ख्रिस्त तिला विचारले, “तुला कुणी दोषी ठरवले नाही ना?” तिने उत्तर दिले, “कुणीही नाही प्रभुजी”. त्यांनी तिला म्हटले, “मीही तुला दोष देत नाही. जा, पुन्हा पाप करू नकोस”. ‘व्यभिचारिणीला ठार करावे’ हे मोझेस यांनी घालून दिलेले वचन त्यांनी रद्दबातल ठरवले. हातून पाप घडून दोषी ठरलेल्या त्या स्त्रीला त्यांनी दोषमुक्त केले, पावन आणि पवित्र केले. तसेच पुरुषी वासनेची पुन्हा शिकार न होण्याचा प्रेमळ उपदेशही तिला केला. (बायबल : ‘जॉन’ ८ : १–११).

पर्वतावरील प्रवचन (Sermon on the Mount) हा ‘नव्या करारा’तील कळसाध्याय समजला जातो. येशू ख्रिस्त यांनी त्यात नीतिमत्तेची नवी आणि मूलगामी सूत्रे दिली आहेत. व्यभिचाराविषयी बोलताना त्यांनी सांगितले, “व्यभिचार करू नका, असे मोझेस यांच्या धर्मशास्त्रात सांगितले आहे; परंतु मी तुम्हाला सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो, त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे, असा त्याचा अर्थ होतो” (बायबल : ‘मॅथ्यू’ ५ : २७-२८). स्त्रीला भोगदासी समजणाऱ्या पुरुषांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे हे क्रांतिकारी विधान होते आणि आहे.

सर्वच समाजांत विधवांच्या वाट्याला उपेक्षा आलेली आहे. ‘विधवा, पोरके आणि परके यांना न्यायाने वागवावे’ असा आदेश ‘जुन्या करारा’त दिलेला आहे; परंतु व्यवहारात त्याचे नेहमीच पालन झालेले दिसत नाही. येशू ख्रिस्त यांना विधवांबद्दल अतीव करुणा वाटत होती. दानधर्म कसा करावा आणि निराश न होता अव्याहतपणे प्रार्थना कशी करावी, हे शिकवण्यासाठी त्यांनी दोन विधवांचे आदर्श समाजापुढे ठेवले. (बायबल : ‘लूक’ १८ : १–८ व २१ : १–४).

शब्बाथच्या दिवशी कामकाज करण्यास धर्माची सक्त मनाई असताना येशू ख्रिस्त यांनी धर्माचे नियम बाजूला ठेवले आणि एका कुबड्या स्त्रीला बरे केले व धर्माचार्यांचा रोष ओढवून घेतला (बायबल : ‘लूक’ १३ : १०–१७). प्रेताला स्पर्श करणे हा अशुद्धपणा समजला जात होता, तरीही त्यांनी एका विधवेच्या पुत्राच्या मृत देहाला स्पर्श केला आणि त्याला जीवदान दिले. (बायबल : ‘लूक’ ७ : ११–१७).

येशू ख्रिस्त यांनी बारा प्रेषित निवडले आणि त्यांना धर्माधिकार बहाल केला. निवडलेल्या प्रेषितांना त्यांनी एकनिष्ठेचे वचन दिले; परंतु प्रत्यक्ष येशू ख्रिस्त यांच्या दु:खद मृत्यूच्या वेळी त्यांचे शिष्य जॉन यांचा अपवाद वगळता बाकी सारे शिष्य दिल्या वचनाला जागले नाहीत. मात्र त्यांच्या स्त्री-शिष्यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. येशू ख्रिस्त यांनीही त्यांच्या कृतज्ञतेची जाण ठेवली आणि पुनरुत्थित झाल्यानंतर त्यांनी प्रथम मेरी माग्दालेना आणि अन्य स्त्रियांना दर्शन दिले व त्यांच्या निष्ठेचा सन्मान केला आणि मेरी माग्दालेना यांना ‘प्रेषिता’ (येशू ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानाची खबर देणाऱ्या प्रेषिता) म्हणून दर्जा दिला.

संदर्भ :

  • Barker, Kenneth L., Ed., The NIV Study Bible, Michigan, 1984.
  • पंडिता रमाबाई, भाषांतरकर्ती, पवित्र शास्त्र जुना व नवा करार, रमाबाई मुक्ती मिशन, केडगाव, १९२४.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया