तेरेसा, मदर : ( २७ ऑगस्ट १९१० – ५ सप्टेंबर १९९७ ). एक थोर मानवतावादी समाजसेविका व शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी. ॲग्नेस गोंक्झा बोजाक्किऊ हे मदर तेरेसा यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म युगोस्लाव्हियाच्या स्कोपजे या गावी झाला. निकोलस हे त्यांचे वडील आणि ड्रेनाफाईल बर्नाई या त्यांच्या आई. वयाच्या अठराव्या वर्षी, म्हणजे १९२८ साली, सिस्टर होण्यासाठी ॲग्नेसने आपल्या आईचा आणि भावंडांचा निरोप घेतला आणि ‘सिस्टर्स ऑफ लॉरेटो’ या कॅथलिक सिस्टरांच्या संस्थेत प्रवेश घेतला. सिस्टर होण्यासाठी आपले घर सोडल्यानंतर तिची आपल्या आईशी कधीच भेट झाली नाही. शाळांत शिकविण्यासाठी ॲग्नेसचे १९२९ झाली कोलकात्यात आगमन झाले.
कोलकात्यातील एन्टली या उपनगरातील लॉरेटो संस्थेच्या सेंट मेरीज स्कूल या मुलींच्या शाळेत सुरुवातीला शिक्षिका आणि नंतर प्राचार्य म्हणून सिस्टर तेरेसा यांनी वीस वर्षे काम केले. सेंट मेरीज स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुली समाजाच्या वरच्या थरांतील कुटुंबांतील होत्या. दुर्बल घटकांतील उपेक्षित लोकांशी या काळात सिस्टरांचा फारसा संबंध नव्हता.
कोलकात्यात फिरताना रस्त्यावर भीक मागणारे महारोगी, रिक्षा ओढून पोट भरणारे कृश आणि क्षयरोगाची लागण झालेले रिक्षाचालक, फूटपाथवर अखेरच्या घटका मोजणारे आजारी वृद्ध यांची स्थिती पाहून सिस्टरना कळवळा येत असे. या पददलितांसाठी आपण काही करू शकत नाही या जाणिवेने त्या अस्वस्थ होत. कोलकात्यातील झोपडपट्ट्यांमधील लोकांची सेवा करण्यासाठी लॉरेटो संस्था सोडून स्वत:ची नवी संस्था स्थापन केली पाहिजे, असे १९३९ नंतर त्यांना तीव्रतेने वाटू लागले.
सिस्टर्सची वा धर्मगुरूंची नवीन संस्था सुरू करण्यासाठी कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांची परवानगी मिळणे आवश्यक होते. सुदैवाने रोममधून लेखी परवानगी मिळाली आणि समाजाने टाकून दिलेल्या उपेक्षित लोकांची व गरिबांची सेवा करण्यासाठी सिस्टर तेरेसा लॉरेटो संस्थेतून १९४८ साली बाहेर पडल्या. रस्त्यांवर, फूटपाथवर वा उकिरड्यापाशी पडलेल्या महारोग्यांची, आजाऱ्यांची वा अनाथ अर्भकांची सेवा करण्यासाठी सिस्टर तेरेसा यांनी परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पददलितांची काळजी घेण्यासाठी त्या शब्दश: रस्त्यावर आल्या.
लॉरेटो संस्थेच्या सिस्टर असताना तेरेसा सफेद पायघोळ झगा, डोक्यावरून कमरेपर्यंत पडणारा काळा गाऊन असा पोशाख करत असत. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ (स्था. १९५०) ही नवीन संस्था स्थापन केल्यावर सिस्टर तेरेसा यांनी स्वत:साठी खास बंगाली पद्धतीच्या पेहरावाची निवड केली. जाड्याभरड्या सफेद सुताची आणि निळ्या रंगाची काठ असलेली साडी बंगाली पद्धतीने नेसून त्या काम करू लागल्या. अशा प्रकारची साडी सफाईकाम करणाऱ्या खालच्या वर्गातील स्त्रिया परिधान करत असत.
लॉरेटो संस्थेतून बाहेर पडल्यानंतर रात्रीच्या निवासासाठी सिस्टर तेरेसा काही काळ ‘लिटल सिस्टर्स ऑफ दि पुअर’ या सिस्टर्सच्या कॉन्व्हेंटमध्ये राहत. दिवसभर त्या मोतीझील झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा चालवत. ‘लिटल सिस्टर्स ऑफ दि पुअर’ ही संस्था त्यांच्या ट्रामच्या प्रवासासाठी पैसे देत असे. सुरुवातीच्या काळात झोपडपट्टीतील मुलांच्या अंघोळीच्या साबणासाठी, आजाऱ्यांच्या औषध पाण्यासाठी, भुकेलेल्यांना जेवण देण्यासाठी सिस्टर तेरेसा कोलकाता शहरात भीक मागत.
काही दिवसांनंतर सिस्टर तेरेसा यांना राहण्यासाठी एका जुन्या इमारतीतील एक खोली मिळाली. केवळ एका लाकडी खोक्याशिवाय तेथे इतर काहीही सामान नव्हते. या खोलीत सिस्टरांनी आपल्या एकटीचा संसार थाटला. याच खोलीत त्यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेचा जन्म झाला. मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या सिस्टर्स बनून त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर युवती सुरुवातीला या खोलीतच राहात असत. त्या घरात तेरेसा यांचे चार वर्षे म्हणजे १९५३ पर्यंत वास्तव्य होते.
झोपडपट्टीमध्ये सिस्टर तेरेसा एकट्याने काम करत असताना एक दिवस सेंट मेरीज स्कूलमधील त्यांची जुनी विद्यार्थिनी सुभाषिनी दास त्यांना भेटायला आली. या अठरा वर्षांच्या तरुणीची सिस्टरांच्या बरोबरीने काम करण्याची इच्छा होती. त्यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’मध्ये प्रवेश करणारी ही पहिली मुलगी. सिस्टर बनल्यानंतर सुभाषिनी दास ही सिस्टर ॲग्नेस झाली. कॅथलिक सिस्टरांच्या संघात प्रमुखांना ‘मदर’ या उपाधीने संबोधले जाते. या नियमानुसार सिस्टर तेरेसा आता मदर तेरेसा बनल्या. टाकून दिलेल्या निराश्रित व्यक्तींची मायेने काळजी घेणाऱ्या त्या मदर−आई−बनल्या.
मोतीझील झोपडपट्टीत शाळा सुरू केल्यानंतर मदर तेरेसांनी तेथे दवाखाना सुरू केला. कोलकात्यातील हमाल, रिक्षा ओढणारे लोक आणि गरीब लोक या दवाखान्यात उपचारासाठी यायचे. या लोकांमध्ये क्षयरुग्णांची संख्या अधिक असायची. रस्त्यावर राहणाऱ्या, भुकेने हाडांचे सापळे बनलेल्या लोकांना जेवण देण्यासाठी मदरने अन्नछत्र सुरू केले. कुष्ठरोग्यांसाठी कुष्ठधाम; कचराकुंड्यांत, दवाखान्यांच्या पायऱ्यांवर किंवा गटारापाशी टाकून दिलेल्या अर्भकांचे पालन-पोषण करण्यासाठी त्यांनी शिशुभवन उघडले.
मिशनरीज ऑफ चॅरिटीची जगभर अनेक केंद्रे आहेत. त्यांपैकी सर्वांत नावाजलेले केंद्र म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या निराश्रित व्यक्तींसाठी चालविले जाणारे कोलकात्यातील ‘निर्मलहृदय’ किंवा ‘होम फॉर डाईंग डेस्टिट्यूट’ (स्था. १९५२). भारताचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली मदर तेरेसांच्या दिल्लीतील संस्थेच्या ‘होम फॉर द डाईंग डेस्टिट्यूट’चे उद्घाटन केले. मिशनरीज ऑफ चॅरिटीची ही कोलकाताबाहेरील पहिली शाखा. १९६५ मध्ये व्हेनेझुएला या मागासलेल्या देशात नवे केंद्र सुरू करून या संस्थेने जागतिक पातळीवर आपल्या सेवेची मुहूर्तमेढ रोवली.
मदर तेरेसांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांची खैरात झाली. या पुरस्कारांच्या रूपाने मिळालेल्या लाखो रुपयांच्या रकमेमुळे अधिकाधिक उपेक्षितांच्या, गरजवंतांच्या मदतीस धावून जाणे त्यांना शक्य झाले. मदर तेरेसा यांच्या जगभर पसरलेल्या केंद्रांत दर दिवशी तांदूळ, गहू आणि भाजीपाला वापरला जातो. हे सर्व करण्यासाठी या संस्थेकडे मदतीचा ओघ सदैव चालू असतो.
मदर तेरेसांच्या सेवाकार्याची दखल घेऊन त्यांना १९७९ सालचे शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. याशिवाय त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. त्यांपैकी पद्मश्री पुरस्कार (१९६२), मॅगसेसे पुरस्कार (१९६२), पोपचे शांतता पारितोषिक (१९७१), नेहरू पुरस्कार (१९७२), पद्मश्री देशिकोत्तमा, नॉर्वे लोकपारितोषिक (१९७९), भारतरत्न (१९८०) इ. महत्त्वाची व मानाची होत. विविध मान्यवर विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही सन्मान्य पदवीही दिली. ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी एलिझाबेथ हिने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी त्यांच्या मानवतेच्या श्रेष्ठ सेवेबद्दल त्यांना दिला. मदर तेरेसांचे विचार स्फुटलेखांद्वारे ए गिफ्ट फॉर गॉड (१९७५) या पुस्तकात संकलित केले आहेत. गरजवंतांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसांना देशात कुठेही फिरता यावे यासाठी इंडियन एअर लाइन्स आणि रेल्वे मंत्रालयाने त्यांना प्रवासासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली होती.
मदर तेरेसांनी गर्भपातास नेहमीच विरोध केला. कुठल्याही कारणास्तव गर्भपात करून अर्भकाचा खून करणे हे पाप आहे, असे त्या मानत. जगात अनेक देशांनी गर्भपातास कायद्याने मान्यता दिली तरी त्यांनी आपले मत बदलले नाही. गर्भपाताविषयीची मदरची मते अनेकांना पटली नाहीत तरी आयुष्यभर या मताचा त्या ठामपणे प्रचार करीत राहिल्या.
कोलकात्यात म्हणजे आपल्या कर्मभूमीत मदर तेरेसांचे निधन झाले. मदर तेरेसांच्या निधनानंतर धर्मसभेच्या नियमानुसार त्यांना पोप फ्रान्सिस यांनी ४ सप्टेंबर २०१६ रोजी ‘संत’ म्हणून घोषित केले.
संदर्भ :
- कर्दळे, आशा, मदर तेरेसा, पुणे, १९९४.