‘इव्हँजल’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘शुभवार्ता’; म्हणून ‘इव्हँजेलिस्ट’ म्हणजे शुभवर्तमान सांगणारा सुवार्तिक. ‘नव्या करारा’त हा शब्द धर्मोपदेशक याअर्थी वापरला असला, तरी रूढी-परंपरेनुसार येशूच्या शिकवणुकीचे गॉस्पल (गॉस्पेल्स) लिहिणारे चार लेखक संत मत्तय (मॅथ्यू), मार्क, लूक व योहान यांनाच उद्देशून हा शब्द वापरला जातो.

‘परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने त्यासाठी आत्मसमर्पण केले’ हीच ती शुभवार्ता होय. या शुभवार्तेचा सर्वत्र प्रसार वा प्रचार व्हावा, ही ख्रिस्ती धर्मोपदेशाबाबतची तीव्र कळकळ, हे सुवार्तिकांचे जीवनकार्य होय. बायबल  हेच श्रद्धेचे प्रमाण आहे व येशू ख्रिस्ताच्या मुक्तिकार्यावर श्रद्धा ठेवल्यानेच मुक्ती मिळते. या मूलभूत ख्रिस्ती तत्त्वांवर या सुवार्तिकांची नितांत श्रद्धा असते.

मत्तय : चार सुवार्तिकांच्या शुभवृत्तांमध्ये पहिले शुभवर्तमान येते ते मत्तयचे. मत्तय हा येशूच्या १२ प्रेषितांपैकी एक. जकात वसूल करणाऱ्या या माणसाला येशूने सरळ बोलावून आपला अनुयायी बनवले (मत्तय ९:९-१३). त्याचे शुभवृत्त हे शब्द संख्येने सर्वांत मोठे असून २८ अध्यायांत त्याची सांगड घालण्यात आली आहे. ‘तारणहार’ ऊर्फ मसिया हा जन्माला येणार आहे, असे ज्याच्याविषयी भाकीत वर्तविण्यात आले आहे, तोच हा येशू ख्रिस्त होय, हे यहुदी लोकांना सिद्ध करण्याकरता त्याने हा वृत्तांत लिहिला. भारतीय विचारवंत जे येशूच्या गिरीप्रवचनाला ‘गिरीगीत’ या नावाने संबोधितात ते येशूचे प्रवचन या शुभवर्तमानात अध्याय ५,६,७ यांत दिलेले असून त्यातील ‘धन्योद्गार’ जगातील विचारवंतांच्या मनाचा ठाव घेतात.

मार्क : मार्कची ‘सुवार्ता’ तिच्या लेखकाचे नाव प्रकट करत नाही. मार्क नावाची जी व्यक्ती ‘नव्या करारा’त प्रेषितांची कृत्ये  या पुस्तिकेत नमूद केली आहे, मार्क नावाची जी व्यक्ती संत पीटरने आपल्या पहिल्या पत्रात वर्णन केली आहे तीच. मार्कचे येशू ख्रिस्ताविषयीचे शुभवृत्त सर्वांत लहान असून ते १६ अध्यायांत देण्यात आले आहे. ही सुवार्ता त्याने इ. स. ६०‒६५ च्या दरम्यान लिहिली. त्याला येशूबद्दल मिळालेली बहुतेक माहिती ही संत पीटरच्या माध्यमातून मिळाली.

लूक : लूक हा सिरियाची राजधानी अँटिऑक इथला रहिवासी असून व्यवसायाने तो वैद्य होता. त्याच्या ह्या पेशामुळे तो संत पॉलचा मित्र झाला व त्याला येशूविषयी मिळालेली बहुतेक माहिती संत पॉलच्या माध्यमातून मिळाली. फिलिप्पी या गावी तो लोकांना येशूविषयी शुभवर्तमान सांगत असे. पॉल हा सिझरिया येथे बंदिवासात असताना तो त्याला वारंवार भेटी देत असे व त्याच काळात त्याने येशूविषयीच्या माहितीची जमवाजमव केली. त्याला उत्कृष्ट प्रतीचे शिक्षण मिळाल्यामुळे ग्रीक भाषेत उत्कृष्ट शैलीत त्याने त्याचे शुभवर्तमान लिहिले आहे व ते जेरूसलेमभोवती गुंफलेले आहे.

योहान : प्रेषित गणांमध्ये योहान हा वयाने सर्वांत लहान व बहुधा त्यामुळेच येशूचा अगदी जीवलग शिष्य. येशूचा प्रेषित जेम्स हा त्याचा थोरला भाऊ. व्यवसायाने तो मच्छीमार व ते दोघे जब्दीचे पुत्र. ‘नव्या करारा’त त्याच्या नावाने तीन पत्रे असून ‘प्रकटीकरण’ हे बायबलमधील शेवटचे पुस्तकही त्याच्याच हातांतून लिहून निघाले आहे. येशूच्या मृत्यूच्या वेळी तो त्याच्या क्रुसाशी येशूच्या आईसोबत होता व मरताना येशूने आपली आई या जीवलग प्रेषिताच्या स्वाधीन केले. त्याची सुवार्ता ही वरील तीन सुवार्तांपेक्षा वेगळ्या जातीची असून त्याला अध्यात्माची सोनेरी किनार लाभली आहे. येशूच्या अनुयायांच्या आग्रहामुळे त्याने आपल्या उतरत्या वयात इ. स. ९० च्या सुमारास हे शुभवृत्त लिहून ठेवले.

मत्तय हा देवदूत, मार्क हा सिंह, लूक हा बळी देण्यास तयार असलेला बैल व योहान हा विहंग भरारी मारणारा गरुड पक्षी ही त्यांची प्रतिके मानली जातात.